Regional
Marathi Text Bulletin,Aurangabad
Date – 19 OCT. 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज
तीसरा दिवस असून, अद्यापही तोडगा निघालेला नाही. कर्मचारी सातव्या वेतन आयोगाच्या मागणीवर
ठाम असल्यामुळे काल मुख्यमंत्री आणि कर्मचारी संघटनांमध्ये झालेली चर्चा निष्फळ ठरली.
दरम्यान, एसटी
कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात दोन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या असून,
उद्या या याचिकांवर सुनावणी होणार आहे. संपामुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणींकडे या
याचिकेत लक्ष वेधलं आहे. एसटीची प्रवासी वाहतूक ही अत्यावश्यक सेवा असल्यानं सरकारच्या
अधिसूचना आणि न्यायालयाच्या आदेशानुसार हा संप बेकायदेशीर ठरत असल्याचं याचिकाकर्त्यानं नमूद
केलं आहे.
****
दुर्गम भागात तैनात असलेले लष्कर
तसंच निमलष्कर दलांचे अधिकारी आणि कर्मचारी वापरत असलेल्या डिजिटल सॅटेलाईट फोन टर्मिनलचं
मासिक शुल्क केंद्र सरकारनं रद्द केलं आहे. केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा
यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. आतापर्यंत या सेवेसाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना
५०० रुपये मासिक शुल्क आणि प्रतीमिनीट पाच रुपये शुल्क आकारलं जात
होतं. यापुढे ही सेवा वापरताना मासिक शुल्क द्यावं लागणार नाही, तसंच दुरध्वनी वापराचं
शुल्कही प्रतीमिनीट एक रुपया करण्यात आल्याचं सिन्हा यांनी सांगितलं.
****
परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज
यांनी पाकिस्तानातल्या भारतीय उच्चायुक्तांना,
पाकिस्तानातल्या एका मुलाला भारतात उपचार करण्यासाठी व्हीसा देण्याचे निर्देश दिले
आहेत. या मुलाच्या वडीलांनी स्वराज यांना ट्विटरवरुन आपल्या मुलाच्या उपचारासाठी
व्हीसा देण्याची वनंती केली होती. यकृताच्या प्रत्यारोपणानंतर या मुलाला उपचाराची
आवश्यकता आहे. कोणत्याही मुलाला आरोग्य सेवा मिळण्यात अडचण येऊ नये, असं परराष्ट्र
मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
प्रत्यक्ष करासंदर्भात करदात्यांचे मुलभूत प्रश्न तसंच शंकांचं
निरसन करण्यासाठी आयकर विभागानं ऑनलाईन चॅट सर्व्हिस सुरु केली आहे. विभागाच्या डब्ल्यू
डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाच्या मुख्य
पानावर यासाठी लाईव्ह चॅट ऑनलाईन - आस्क युवर क्वेरी असा स्वतंत्र आयकॉन दिलेला आहे.
करदात्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी विभागातले तज्ञ अधिकारी तसंच स्वतंत्र कर व्यवसायिक
यांचं पथक तयार केलं आहे.
****
आधार क्रमांक सार्वत्रिक
खाते क्रमांकाशी जोडण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना - ई पी एफ ओनं आपल्या
ग्राहकांसाठी ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई पी एफ इंडिया
डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध आहे. यामुळे ईपीएफओची सेवा अधिक
जलद मिळण्यास मदत होईल.
****
कापुस आणि सोयाबीनवर
फवारल्या जाणाऱ्या पाच प्रकारच्या किटकनाशकांवर यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशिम आणि अमरावती
या जिल्ह्यांमध्ये ६० दिवसांची बंदी घालण्याचा कृषी विभागाचा विचार आहे. त्यासाठी विभागानं
सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. यासंदर्भात नागपूरच्या केंद्रीय कापुस संशोधन संस्थेचे
संचालक, तसंच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आणि महात्मा
फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंकडून अभिप्राय मागवला आहे.
****
देशभरात आज प्रकाशोत्सव
अर्थात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये
लक्ष्मीपूजन आणि कुबेर पूजन केलं जाणार आहे. दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी दिवाळी पहाट यासारख्या
सांगितीक कार्यक्रमांचं आयोजनही केलं जातं. लातूर इथं आज अष्टविनायक प्रतिष्ठाणच्या
वतीनं आग्रा ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका मंजुषा पाटील यांच्या गायनाचा कार्यक्रम
आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.
****
डेन्मार्क ओपन बॅडमिंटन
स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं पहिल्या फेरीत फ्रान्सच्या कॉरोलिना मरिनचा
२२ - २०, २१ - १८ असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. पुरुष एकेरीत के
श्रीकांतनं पहिल्या फेरीत भारताच्याच शुभांकर डे चा पराभव केला, तर एच एस प्रणयनं डेन्मार्कच्या
एमिल होल्स्टचा पराभव केला. मिश्र दुहेरीत मात्र सात्विक साईराज आणि अश्विनी पोनप्पा
या जोडीचा पहिल्या फेरीत पराभव झाला.
****
आशिया चषक हॉकी
स्पर्धेत आज भारताचा सामना मलेशिया विरुद्ध होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी
पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारत आणि कोरियामध्ये काल झालेला सामना एक एकनं
बरोबरीत संपला. भारताचा या स्पर्धेत आतापर्यंत एकाही सामन्यात पराभव झाला नाही.
****
१७ वर्षांखालील
फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपान्त्यपूर्व फेरीतले सामने निश्चित झाले आहेत. येत्या शनिवारी
माली विरुद्ध घाना आणि अमेरिका विरुद्ध इंग्लंड हे सामने तर रविवारी स्पेन विरुद्ध
इराक आणि जर्मनी विरुद्ध ब्राझील हे सामने होणार आहेत.
****
No comments:
Post a Comment