Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 OCT. 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.
****
** सर्व निकषपात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना सुरू राहणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही; कर्ज माफी प्रमाणपत्रांच्या वितरणास
प्रारंभ
** एसटी
कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; दिवाळीनिमित्त घरी जाणाऱ्या
प्रवाशांचे हाल
** दिपावली सणानिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या
जनतेला शुभेच्छा
आणि
** राज्यात कापूस खरेदीला प्रारंभ
****
सर्व निकषपात्र शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना सुरू राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी दिली
आहे. छत्रपती
शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांच्या
वाटपाचा शुभारंभ काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
कर्जमाफीसाठीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेवर टीका झाली, मात्र योजनेचा लाभ खऱ्या
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफी योजनेपैकी पहिल्या टप्प्यात, आठ
लाख चाळीस हजार शेतकऱ्यांची माहिती आणि चार हजार कोटी रुपये बँकांकडे वर्ग करण्यात
आले असून यापैकी तीन हजार दोनशे कोटी रुपये हे कर्जमाफीसाठीचे तर आठशे
कोटी रुपये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये प्रोत्साहन
भेटीसाठी देण्यात आले असल्याचं
मुख्यमंत्र्यांनी म्हणाले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक
स्वरुपात कर्जमुक्तीची प्रमाणपत्रं वितरित करण्यात आली.
संपूर्ण राज्यासह मराठवाड्यात पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्र
वाटपाला कालपासून सुरूवात झाली. औरंगाबाद इथं पालकमंत्री रामदास कदम, जालना इथं पालकमंत्री बबनराव
लोणीकर, नांदेड इथं पालकमंत्री
अर्जुन खोतकर, लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबाद इथं सहपालकमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते कर्जमाफी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. परभणी आणि बीड इथं
जिल्हाधिकाऱ्यांनी कर्जमाफी प्रमाणपत्रांचं वाटप केलं.
****
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला प्रत्यक्ष सुरुवात केल्याबद्दल
भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांचं अभिनंदन केलं आहे. अत्यंत पारदर्शी पद्धतीने ही प्रक्रिया राबवल्याबद्दल
आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार
मंत्री सुभाष देशमुख यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचं अभिनंदन करतो, असं
दानवे यांनी म्हटलं आहे.
****
संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना
कायदेशीर कारवाईचा इशारा एसटी महामंडळाने दिल्यानंतरही कर्मचारी
संघटना संप सुरूच ठेवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना काल सायंकाळी पाच वाजेपर्यंत
कामावर रुजू होण्यास सांगितलं होतं. महाराष्ट्र शासनानं, राज्य परिवहन मंडळाला लोकोपयोगी सेवा म्हणून
घोषित केलं आहे.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी काल मंडळाच्या
कर्मचारी संघटनेच्या नेत्यांसोबत बैठक घेऊन, संघटनांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
दरम्यान, महामंडळाचे जवळपास एक लाख कर्मचारी या संपात
सहभागी झाल्यामुळे, दिपावली निमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची अत्यंत गैरसोय झाली आहे. प्रवाशांची
गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनं, शाळेच्या बसेस, यांना प्रवासी वाहतूक करण्यास महामंडळानं
तात्पुरती परवानगी दिली आहे.
महामंडळाचे
कार्यकारी व्यवस्थापक रणजित सिंग, वाहतूक आयुक्त प्रवीण गेडाम, आणि वाहतुक विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक
महामंडळाच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यां समवेत काल एक बैठक झाली मात्र, त्यात काही
तोडगा निघू शकला नाही.
महामंडळाच्या
कर्मचाऱ्यांच्या संपा विरुद्ध दोन जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात
आल्या आहेत, त्यांची सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
****
देशभरात आज प्रकाशोत्सव अर्थात दिवाळीचा सण साजरा केला
जात आहे. आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनामध्ये लक्ष्मीपूजन आणि कुबेर पूजन केलं
जाणार आहे. या सणासाठीच्या खरेदी करता गेल्या आठवड्यापासून लोकांनी बाजारात मोठ्या
प्रमाणात गर्दी केली होती. शहर तसंच ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणावर विद्युत
रोषणाई करण्यात आली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती
एम. व्यंकय्या नायडू तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला दिवाळीनिमित्त
शुभेच्छा दिल्या आहेत. प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची गरज त्यांनी आपल्या संदेशात
व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगुलपणाचा
आणि अन्यायावर न्यायाचा विजय सणातून साजरा केला जात असल्याचं म्हटलं आहे. याप्रसंगी
आनंद आणि समृद्धतेनं सर्वांच जीवन उजळून निघावं यासाठी प्रयत्न करण्याचं तसंच गरीबांच्या
जीवनात आनंद निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी केलं.
दिवाळीचा सण हा जनतेत स्नेहभाव आणि सौहार्द निर्माण करण्यात
महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो, हा सण आमचं जीवन उजळून काढतो आणि जीवनात शांती, समृद्धी
आणि आनंद निर्माण करतो, असं उपराष्ट्रपती नायडू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
दिवाळीतलं प्रकाशपर्व समाजमनासाठी चैतन्याचा स्रोत असून या पर्वाने यंदा राज्यातील सर्व
नागरिकांना आनंद आणि सुख-समृद्धी प्रदान करावी, अशा
शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
दिपावली आणि गुरूपुरब महोत्सवानिमित्त नांदेड इथल्या सचखंड
गुरूद्वारात काल गोदावरी नदीतल्या पवित्र जलानं तख्तस्नान करण्यात आलं. काल पहाटे दोन
वाजता भाविकांनी घागरीनं डंकीन इथून डोक्यावर पाणी आणून गुरूद्वारा आणि शस्त्रांची
पूजा केली.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ तारखेला आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ३७वा भाग
असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११
वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. नागरिकांनी येत्या २५ ऑक्टोबरपर्यंत
आपल्या सूचना १८०० ११ ७८०० या निशुल्क क्रमांकावर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवाव्यात
असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
राज्यात कापूस खरेदी सुरू करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र काल मुंबईत सांगितलं. या प्रत्येक कापूस खरेदी केंद्रावर
आधार क्रमांक आधारीत नोंदणी करण्यात येणार असून, शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्रीसाठी
कधी आणायचा याबाबत कळवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.
****
बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे
मराठवाडा आणि विदर्भात येत्या चार दिवसात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होण्याची शक्यता
हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
****
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजना अंतर्गत कार्यान्वित
असलेल्या निशुल्क १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकांवरील संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय
काल राज्य शासनानं घेतला आहे. या योजनेच्या खर्चासाठी पंधरा कोटी चौतीस लाख रूपयांचा
निधी उपलब्ध करून देण्यासही शासनानं मंजूरी दिली आहे. प्रारंभी केंद्र सरकारच्या सहकार्यातून
ही योजना सुरू करण्यात आली होती, मात्र आता केंद्रानं ही योजना राज्य सरकारकडे हस्तांतरीत
केली आहे. राज्यात या योजनेअंतर्गत २३३ अत्याधुनिक
तर ७०२ साधारण रूग्णवाहिका कार्यरत आहेत. १०८ क्रमांकावर दूरध्वनी अथवा मोबाईलवरून
संपर्क केल्यानंतर रूग्णांना दवाखान्यात पोहोचण्यासाठी मोफत उपलब्ध होते.
****
लातूर इथले डॉक्टर दिनकर बाबुराव गोरे
यांचं काल मुंबई इथं उपचारादरम्यान निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. हसतमुख तसंच गरजू
व्यक्तींच्या मदतीला धावून जाणारा डॉक्टर म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख होती. डॉक्टर
गोरे यांनी रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि विविध संस्थांच्या माध्यमातून रुग्णांसाठी
मोफत शिबिरं आयोजित केली होती. ते शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे सहसचिव होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी
अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
आणि रुग्णालय अर्थात घाटीचा बाह्यरूग्ण विभाग आज लक्ष्मीपूजनानिमित्त तर परवा शनिवार
दिनांक २१ ऑक्टोबर रोजी भाऊबीज निमित्त शासकीय
सुट्टी असल्यामुळे बंद राहणार आहे. मात्र उद्या दि. २० ऑक्टोबर आणि रविवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी शासकीय
सुट्टी असली तरी बाह्यरुग्ण विभाग सुरू राहील, असं घाटी प्रशासनानं कळवलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या सेवली पोलिस ठाण्यातले सहाय्यक पोलीस निरीक्षक
भारत बलय्या आणि पोलीस नाईक विष्णू चव्हाण, या
दोघांना पंधरा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल
अटक केली. तक्रारदारावर
दाखल गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी आणि प्रतिपक्षावर मोठं कलम लावण्यासाठी या
दोघांनी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
****
No comments:
Post a Comment