Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 November 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा.
****
सरकार देशाच्या
विकासासाठी कटीबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली
इथं भारतीय व्यवसायातील सुधारणा या विषयावरच्या चर्चासत्रात ते आज बोलत होते. सुलभतेनं
व्यवसाय करता येण्यासंदर्भातल्या - इझ ऑफ डुईंग बिझनेस उपक्रमामुळे प्रत्येक भारतीयाचं
जीवनही सुलभ होईल, असं ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर - जीएसटी प्रणाली ही अत्यंत महत्वाची
सुधारणा असून, यामुळे इझ ऑफ डुईंग बिझनेसला चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी
व्यक्त केला.
****
दरम्यान, मध्यमवर्गियांच्या संख्येत होत असलेली वाढ आणि
सरकार राबवत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांमुळे अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये अनेक संधी
नर्माण होत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ते काल नवी दिल्लीत खाद्यान्न प्रक्रिया
आणि संबंधित उद्योगांमध्ये काम करणा-या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांशी संवाद
साधताना बोलत होते. वर्ल्ड फूड इंडिया २०१७ चं उद्घाटन केल्यानंतर त्यांनी हा संवाद
साधला.
****
शेतक-यांकडून व्यापा-यांना करण्यात येणा-या दोन लाखांपर्यंतच्या
शेतमाल विक्रीवर कोणत्याही प्रकारचा आयकर भरावा लागणार नसल्याचं आयकार विभागानं स्पष्ट
केलं आहे. दोन लाखांपर्यंतच्या व्यवहारांवर शेतकरी अथवा व्यापा-याला कायम खाते क्रमांक
अर्थात पॅन क्रमांक आणि ६० क्रमांकाचा फॉर्मही द्यावा लागणार नसल्याचं आयकर विभागानं
म्हटलं आहे. शेतीशी संबंधित घटकांनी शेतमाल विक्रीला आयकर कायद्याच्या तरतूदी लागू
होतात का हे जाणून घेण्यासाठी आयकर विभागाला निवेदनं दिले होते. त्यानंतर आयकर विभागानं
हे स्पष्टीकरण जारी केलं आहे.
****
निवडणूक आयोगानं दूरदृष्य संवादप्रणाली द्वारे हिमाचल
प्रदेशमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. हिमाचल प्रदेशमध्ये
संपूर्ण ६० जागांसाठी पुढच्या आठवड्यात गुरूवारी निवडणुका होत आहेत. या आढावा बैठकीला
हिमाचल प्रदेशसह, शेजारील जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणाचे
मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, मुख्य निवडणूक अधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
****
भारतीय
बनावटीच्या कमी वजनाच्या ग्लाईड बॉम्ब ची चाचणी ओडिशातल्या चांदीपूर इथं भारतीय हवाई
दलाच्या एकिकृत परिक्षण केंद्रावर यशस्वीपणे पार पडली. स्मार्ट एअरफिल्ड वेपन नावाचा
हा बॉम्ब लढाऊ विमानातून टाकण्यात आला. वेगवेगळी लक्ष्य तसंच अंतराचा वापर करुन तीन
चाचण्या घेण्यात आल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या प्रसिद्वीपत्रकात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या
आर्थिकदृष्ट्या कमकुवत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत
विलिनीकरण करण्यासाठी राज्य शासनानं नाबार्डचे निवृत्त अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या
अध्यक्षतेखाली एका अभ्यास समितीची स्थापना केली आहे. या समितीला तीन महिन्यांत आपला
अहवाल देण्यास सांगण्यात आलं आहे. सहकार विभागानं याबाबतचा निर्णय जारी केला. राज्यातल्या
३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी काही बँका आर्थिक अडचणीत आहेत. या बँका शेतक-र्यांना
गरजेप्रमाणे पीककर्ज पुरवठा करण्यास असमर्थ आहेत. त्यामुळे संबंधित बॅंकाचे ठेवीदार
आणि शेतक-र्यांचं हित लक्षात घेऊन हे विलिनीकरण करण्याची आवश्यकता निर्माण झाली असल्याचं
शासनाच्या आदेशात म्हटलं आहे.
****
अंधश्रद्धा
निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या
पोलीस अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल सादर करावा, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयानं
केंद्रीय अन्वेषण विभाग आणि राज्य सरकारला दिला आहे. पोलिसांनी अनेक कच्चे दुवे सोडल्यामुळे
दाभोलकर यांचे मारेकरी अद्यापही पकडले जाऊ शकले नाहीत, यात दोषी आढळलेल्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात
कारवाई करण्यात यावी, असंही उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
****
जालना जिल्ह्यात
परतूर तालुक्यातल्या सिरसगावचा हिवरेबाजारच्या धर्तीवर विकास करण्यात येत असल्याचं
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे. काल लोणीकर यांच्या हस्ते सिरसगाव इथं
विविध कामांचं लोकार्पण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यामध्ये जलवाहिनी, उद्यान,
वाचनालय, भूमिगत नाल्या, यासह ई-लर्निंग सुविधांचा समावेश आहे.
****
मनोहराबाद
आणि मेसीपेट स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या रेल्वे रूळांच्या कामामुळे या दोन्ही स्थानकांदरम्यान
उद्या रविवारपासून मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे नांदेड - मेडाचल तसंच मेडाचल-नांदेड
प्रवासी रेल्वे गाडी उद्यापासून येत्या ११ नोव्हेंबर पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
****
औरंगाबाद
शहरातल्या क्रांती चौक परिसरात उभारण्यात आलेल्या २१० फूट उंचीचा ध्वजस्तंभ आणि
स्वातंत्र्य संग्राम स्मारकाचं लोकार्पण राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत
आज होणार आहे. आज संध्याकाळी पाच
वाजून पंधरा मिनिटांनी हा कार्यक्रम होणार आहे.
*****
No comments:
Post a Comment