Saturday, 4 November 2017

आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०4 नोव्हेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांची ५४८ वी जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुनानक जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुनानक देव यांनी शांती, सद्भावना आणि मानवाच्या एकतेचा संदेश दिला असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. आपण सर्व जण गुरुनानक देव यांना नमन करुन त्यांची शिकवण स्मरणात ठेऊ असं पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.    
नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाऱ्यातही गुरु नानक जयंतीनिमित्त शबद, कीर्तन, आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
****
माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या जनजागृती संदर्भात विविध उपक्रमांच्या प्रस्तावाला राज्य शासनानं दिलेल्या मंजुरीबाबत कोणतीही खातरजमा न करता प्रसार माध्यमात उपस्थित करण्यात आलेल्या शंका, जनतेत गैरसमज पसरवणाऱ्या असल्याचं, महासंचालनालयानं म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षासाठी महासंचालनालयाच्या विविध उपक्रमांच्या प्रस्तावाला राज्य शासनानं दोन नोव्हेंबर रोजी मंजुरी दिली आहे. ही मंजुरी ‘विशेष प्रसिद्धी मोहीम’ या अर्थशिर्षाअंतर्गत असली तरीही त्याचा राज्य सरकारच्या तीन वर्षपूर्तीशी संबंध नसल्याचं, महासंचालनालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
परभणी महापालिकेच्या काल बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेवर काँग्रेसच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला, त्यामुळे गणपूर्ती अभावी ही सभा होऊ शकली नाही. या सभेत स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार होती, मात्र सदस्यांच्या निवडीवरून नाराज काँग्रेस सदस्यांनी सभेवर बहिष्कार टाकल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बीड जिल्ह्यात कपिलधार इथं काल त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं हजारो भाविकांनी बंकटस्वामी महाराज यांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. शिवा संघटनेच्या वतीनं घेण्यात आलेल्या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मार्गदर्शन केलं. या तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती देणं आवश्यक असल्याचं धोंडे यांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद इथं काल कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सीटूच्या वतिनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यात महिला कामगारांचा मोठा सहभाग होता. सीटूच्या देशभरात प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला. यात राष्ट्रीय १२ आणि चार स्थानिक मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 10 April 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...