आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१६ एप्रिल २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
२००७ साली झालेल्या मक्का
मस्जिद बाँब स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेचं हैदराबादमधलं विशेष न्यायालय आज
निर्णय देण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात नऊ जणांचा
मृत्यू झाला होता, तर २८
जण जखमी झाले होते. राष्ट्रीय
तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं गेल्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली
होती.
****
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला मिळालेल्या यशाबद्दल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. भारतानं मिळवलेल्या
यशामुळे आधिकाधिक युवकांना खेळांकडे वळण्याची प्रेरणा मिळेल आणि रोजच्या जीवनात शारिरिक
आरोग्याच्या महत्त्वाबाबत जागरुकता निर्माण होईल,
असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ नं आणखी जोर धरावा यासाठी
सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही या खेळाडूंची प्रशंसा
केली आहे. २०२४ आणि २०२८
च्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अशीच कामगिरी
कायम ठेवली जाईल, तसंच खेळाडूंनी दाखवलेल्या जिद्द आणि सातत्याचा राष्ट्राला
अभिमान आहे असं त्यांनी व्हिडियो संदेशात म्हटलं आहे. काल संपलेल्या या स्पर्धेत भारतानं २६ सुवर्ण पदकांसह एकूण
६६ पदकं जिकंले.
****
नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातल्या सिंदखेड
पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या सारखाणी गावच्या
बाजारपेठेत कृषी विभाग आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथकानं आज ३२ लाख १० हजार, २४० रुपये किमतीचे चार हजार २२४
बोगस बियाण्यांची पाकीटं जप्त केली आहेत. याठिकाणी बोगस बियाणे दाखल झाल्याची माहिती
मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागात काल वादळ वारा
आणि विजेच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. यामध्ये वीज पडून जवळपास आठ जणांचा मृत्यू
झाला. शेतातल्या फळपिकांचही मोठं नुकसान झालं. मराठवाड्यातल्या
नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काल काही भागात पाऊस पडला.
विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातल्या वेणी वाकोडी शिवारात काल वीज कोसळून
चार ठार तर, चार जण जखमी झाले. तसंच दोन बैल
आणि सात शेळ्याही यात दगावल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment