Thursday, 3 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 03.05.2018 13.00


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 3 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक मे  २०१ दुपारी १.०० वा.

****



सामाजिक माध्यमं आणि ऑनलाईन वृत्त वाहिन्यांवर आधार एनरोलमेंट सॉफ्टवेअर वापरुन त्याचा अवैधरित्या वापर केल्याचा आरोप भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं फेटाळून लावला आहे. काही वृत्त वाहिन्यांवरुन प्रसारित झालेल्या अशा आशयाच्या बातम्या चुकीच्या असल्याचं प्राधिकरणानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कोणत्याही व्यक्तीचं बायोमेट्रिक झाल्याशिवाय आधारची माहिती मिळू शकत नसल्यामुळे आधार प्रणाली पूर्णपणे सुरक्षित असल्याचं प्राधिकरणानं स्पष्ट केलं आहे.

****



 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते कलाकार या पुरस्कारांवर बहिष्कार टाकणार असल्याचं वृत्त आहे. हे पुरस्कार आज नवी दिल्ली इथं प्रदान केले जाणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद फक्त ११ पुरस्कारांचंच वितरण करणार असून, बाकीचे पुरस्कार केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते प्रदान केले जाणार असल्यानं कलाकारांनी या पुरस्कारावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे संयोजक, राष्ट्रपती कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला यासंदर्भात पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

****



 कावेरी नदी पाणी वाटप प्रश्नी कावेरी व्यवस्थापन मंडळ स्थापनेसंदर्भात केलेल्या उपाययोजनांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडे विचारणा केली आहे. येत्या आठ मे रोजी यासंदर्भात उत्तर द्यावं, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. व्यवस्थापन मंडळ स्थापनेचा आराखडा तयार असून, तो केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आल्याचं महाधिवक्त्यांनी आज न्यायालयात सांगितलं. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर यावर सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे.

****

 देशभरात २० अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था उभारण्याच्या आणि ७३ वैद्यकीय महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्याच्या आराखड्याला, केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेचा हा भाग असून, त्यासाठी १४ हजार ८३२ कोटी रुपयांची तरतूद आहे. देशभरात आरोग्यसेवा क्षेत्रातल्या व्यावसायिकांची आणि सुविधांची कमतरता लक्षात घेत, या योजनेला २०२० पर्यंत, म्हणजेच दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आल्याचं, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. आतापर्यंत २० पैकी सहा वैद्यकीय विज्ञान संस्था स्थापन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

****



 उत्तर आणि पश्चिम भारतात अनेक ठिकाणी काल मुसळधार पाऊस झाला. उत्तर प्रदेशात धुळीचं वादळ आणि पावसामुळे ४५ जण ठार झाले. राजस्थानातही २१ जणांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक जण जखमी झाले. यात अनेक जनावरंही दगावल्याचं वृत्त आहे. पंजाब, हरियाणा आणि चंदीगढ मध्येही वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. यामुळे शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं.

****



 वाङ्मयचौर्य करणाऱ्या किंवा अशा कृत्यात सहभागी असणाऱ्या प्राध्यापक आणि संशोधकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या नियमांनुसार शिक्षा केली जाईल, असं अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांनी म्हटलं आहे. यामुळे अशा प्रकारांना आळा बसून, देशातल्या संशोधनाची विश्वासार्हता वाढेल, असं त्यांनी सांगितलं.

****



 बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या मध्य प्रदेशातल्या उज्जैनच्या महांकालेश्वर मंदिरातल्या धार्मिक विधींबाबत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या मंदिरात शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी केवळ अर्धा लिटर आणि तेही यंत्रातून शुद्ध झालेलं पाणी वापरावं, असा ठराव मंदिर समितीनं संमत केला आहे. त्याचा वेगळा अर्थ माध्यमांनी काढू नये, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

****



 चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकांनी भारतीय रेल्वेच्या सर्वात सुंदर स्थानकांच्या गटात १० लाख रुपयांचं पहिलं बक्षीस पटकावलं आहे. रेल्वेच्या इन-हाऊस सुशोभिकरण स्पर्धेत या दोन्ही स्थानकांची निवड करण्यात आल्याचं मध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मधुबनी आणि मदुराई स्थानकांना पाच लाखांचं दुसरं बक्षीस मिळालं. गांधीधाम आणि कोटा स्थानकांनी संयुक्तपणे तीन लाख रुपयांचं तिसरं बक्षीस पटकावलं.

****

 गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी मारले गेल्याच्या घटनांची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दिले आहेत. ही एक नियमित प्रक्रिया असल्याचं सिंग यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. या चकमकींमध्ये सैन्याचा एकही जवान जखमी झाला नाही, यावरुन या चकमकींच्या वैधतेबद्दल काही मानवी हक्क कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 31 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...