Wednesday, 9 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 09 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०९ मे २०१ सकाळी .५० मि.

****



Ø दूध भुकटी उत्पादकांना दूध खरेदीसाठी प्रतिलीटर तीन रुपये अनुदान देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय  

Ø केंद्र  सरकारची भूमिका आरक्षण विरोधी नाही - केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा पुनरुच्चार

Ø राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी येत्या २५ मे पासून ई-वे बिल पद्धती अनिवार्य

Ø येत्या सोमवारी शेतकरी संघटनांचं राज्यभरात जेलभरो आंदोलन

आणि

Ø बोगस परीक्षार्थी प्रकरणी हिंगोली इथं दोन मुख्याध्यापकांसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

****



 दूभुकटी उत्पादनाला चालना देण्यासाठी दूध भुकटी उत्पादकांना दूध खरेदीसाठी प्रतिलीटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, खासगी दूध उत्पादक तसंच सहकारी दूध भुकटी उत्पादक संघांना हे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन निर्णय जारी केल्यापासून तीस दिवसांसाठी हा निर्णय लागू असेल.



 राज्य महामार्ग अधिनियमातल्या भूसंपादनविषयक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव इथं वरिष्ठ स्तराचं दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा तसंच अकोला जिल्ह्यात अकोट इथंही वरिष्ठ स्तराचं दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासह पदनिर्मिती करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

****



पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. श्रीनिवास वनगा हे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र आहेत. श्रीनिवास वनगा यांनी आपल्या कुटुंबासह नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.



 दरम्यान, काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी काल मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गावीत यांना पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. 

 पालघर पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान तर, ३० मे रोजी मतमोजणी होणार आहे.

****



केंद्र सरकारची भूमिका आरक्षण विरोधी नसल्याचा, केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी पुनरुच्चार केला आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - अॅट्रोसिटी कायद्याच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले..



सरकार रिर्जवेशनचं पुर्ण प्रोटेक्शन करणार, अशी भूमिका घेणारे सरकार आहे. हे ॲट्रोसिटीच्या ॲक्टच्या संदर्भामध्ये या ॲक्टचं पूर्णपणे संरक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. मी सर्व देशातल्या दलितांना आवाहन करतो, की आपण चिंता करण्याचं काही कारण अजिबात नाही. आणि सरकार हे दलित विरोधी नाही. सरकार हे दलितांना न्याय देण्याच्या संबंधातली भूमिका घेणारं सरकार आहे. प्रमोशन मध्ये आरक्षण देण्याचा कायदा करावा, पार्लियामेंन्ट मध्ये बिल आणावं, अशा पध्दतीची भूमिका आमची आहे. आणि त्या संबंधामध्ये प्रधानमंत्र्यांनी सुध्दा पॉझिटिव्ह अशा पद्धतीचं मत व्यक्त केलेलं आहे.



 दरम्यान काल सायंकाळी औरंगाबाद इथं, आठवले यांच्या हस्ते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत घरगुती वापराच्या गॅस जोडण्यांचं वाटप करण्यात आलं.

****

 राज्यामध्ये ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या राज्यांतर्गत मालवाहतुकीसाठी येत्या २५ मे पासून ई-वे बिल पद्धती अनिवार्य करण्यात येत आहे. २६ व्या वस्तू आणि सेवा कर परिषदेत झालेल्या निर्णयानुसार, राज्य कर आयुक्तांनी काल ही अधिसूचना जारी केली. राज्यातले करदाते आणि वाहतुकदार यांनी यासाठीची आवश्यक ती नोंदणी अद्याप केली नसल्यास, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई वे बिल जीएसटी डॉट जी ओ व्ही डॉट ईन या संकेतस्थळावर तत्काळ नोंदणी करावी, असं आवाहन राज्य वस्तू आणि सेवा कर विभागाकडून करण्यात आलं आहे.

****

 रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतुक नियमांचं सजगपणे पालन करण्याचं आवाहन, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केलं आहे. रस्ते सुरक्षा पंधरवाड्याच्या समारोप कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते. दुचाकीवर हेल्मेटचा तसंच चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्टचा वापर केल्याने, जीवितहानी टाळता येऊ शकेल, असं रावते म्हणाले.

*****

 राज्य शासनानं सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाज आणि संवादासाठी मराठी भाषा वापरण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भातला शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या सोमवारी चौदा तारखेला शेतकरी संघटना, जेलभरो आंदोलन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ जिल्हा तसंच तालुका पातळीवर हे आंदोलन केलं जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 राज्यातल्या १९२ तूर खरेदी केंद्रांवर परवा सोमवारपर्यंत दोन लाख ३० हजार ३४८ शेतकऱ्यांची  २८ लाख ८८ हजार ९१८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. राज्याचे सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल ही माहिती दिली. येत्या मंगळवारपर्यंत तूर खरेदी सुरू राहणार आहे

****



 दहावी परीक्षेत नियमबाह्य पद्धतीनं विद्यार्थी बसवल्या प्रकरणी, हिंगोली जिल्ह्यातल्या दोन शाळा मुख्याध्यापक तसंच शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अशा नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनगाव तालुक्यात कापडसिनगी इथं हा प्रकार घडला होता. इथल्या दोन शाळांनी पटसंख्येवर दहावीचे एकूण १७८ विद्यार्थी असताना, ५५६ विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेसाठी ऑनलाईन  अर्ज  भरल्याचं समोर आलं होतं.

****



 तीन वर्षांपूर्वी रेल्वेने पाणी आणावं लागलेल्या लातूर जिल्ह्यात आजघडीला लातूर शहरात एक आणि संपूर्ण जिल्ह्यात एक असे केवळ दोनच टँकर सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर....



जलयुक्त शिवारच्या कामाची किमया लातूर जिल्ह्यातील लोक अनुभवत आहेत. मे महिना असतांना सुध्दा जळकोट तालुक्यातील पाटोदा खुर्द या गावासाठी एक टँकर सुरु असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिली. लातूर शहरात फक्त एक टँकर सुरु आहे. टँकर बंद झाल्यामुळे डिझेलचा वापर कमी झाला. त्यामुळे प्रदुषणाला आळा घातला जात असून कोट्यावधी रुपयांची बचत होत आहे.

                             -अरुण समुद्रे, आकाशवाणी  बातम्यासाठी लातूर.

****

 राज्यातील प्राचार्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयाप्रमाणे वेतनश्रेणी द्यावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे एका पत्राव्दारे केली आहे. सहयोगी प्राध्यापक आणि प्राचार्य यांची वेतनश्रेणी सारखीच असल्यानं प्राचार्यपद स्वीकारण्यास कोणीही सहजासहजी तयार होत नाही. त्यामुळं राज्यात प्राचार्यांची ८०० पदं रिक्त असल्याचं आमदार चव्हाण यांनी पत्रात नमूद केलं आहे.

****



 जालना जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज पाँइंट जामवाडी परिसरात व्हावा, या मागणीसाठी जामवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्णनगर इथल्या शेतकऱ्यांनी काल जालना-देऊळगावराजा मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

****



दक्षिण मध्य रेल्वेनं उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नांदेडहून विविध भागात जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेडहून दिल्लीला जाणाऱ्या गाडीच्या २४ फेऱ्या, पुणे आणि पनवेलला जाणाऱ्या गाडीच्या २६ फेऱ्या, तर नांदेड इथून जबलपूर आणि सिकंदराबादला जाणाऱ्या गाडीच्या १७ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

****



 पावसाळ्याच्या काळात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिले आहेत. बीड इथं काल पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. संभाव्य हानी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

****



 जालना इथं औरंगाबाद चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन दुचाकींची धडक होवून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. काल दुपारी हा अपघात झाला. शेख अजहर शेख अस्लम, असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे.

****

 वीज महावितरण कंपनीच्या औरंगाबाद विभागातल्या ११ जिल्हयात गेल्या वर्षभरात २२ हजार ३८८ वीज चोऱ्या उघडकीस आल्या. यापैकी साडे चार हजारावर वीज चोरांकडून पाच कोटी २२ लाख ३२ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला तर तीन हजार ३३४ वीज चोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबाद  विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी काल ही माहिती दिली.

****

 परभणी तालुक्यातल्या पारवा गावाजवळ काल कडब्याच्या गंजीला मोठी आग लागल्याची घटना घडली. अग्नीशामक दलाच्या दोन बंबांनी ही आग विझवली, मात्र कडब्याच्या पेंड्या जळून मोठं नुकसान झालं, सुदैवाने आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...