Wednesday, 9 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 09.05.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद



संक्षिप्त बातमीपत्र



 मे २०१८ सकाळी ११.०० वाजता

****

 भारतीय बँकांचं दीड अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकं कर्ज बुडवून परदेशात पळालेला मद्य उद्योजक विजय मल्ल्या याच्या विरोधात भारतीय बँकांनी ब्रिटनच्या न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचा निर्णय बँकांच्या बाजूनं लागला आहे. मल्ल्या यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा अधिकार बँक़ांना आहे, असं सांगत, मल्ल्याची जगभरातली संपत्ती जप्त करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही या न्यायालयानं नकार दिला. या निर्णयामुळे, मल्ल्यानं बुडवलेले पैसे वसूल करण्याचा बँकांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, परदेशी चलन विनिमय अधियमाचा भंग केल्याप्रकरणी नवी दिल्लीतल्या न्यायालयानं मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याचा नवीन आदेश काल जारी केला.

****

 गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर यांची जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गुरुदेव टागोर यांना आदरांजली वाहिली असून, आशिया खंडातले पहिले नोबेल विजेते आणि भारतीय राष्ट्रगीताचे जनक म्हणून रविन्द्रनाथ टागोर हे देशाचे अग्रिम सांस्कृतिक आदर्श आहेत, असं आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांच्या बंगाली कवितांचा इंग्रजीसह अनेक भाषांमधून अनुवाद झाला असून, त्यांच्या गीतांचा संग्रह रविंद्र संगीत नावानं प्रसिद्ध आहे. गीतांजली, या त्यांच्या काव्यसंग्रहाला १९१३ साली साहित्याच्या नोबेल पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होतं.

****

 देशाच्या उत्तर भागात काल अनेक ठिकाणी झालेल्या वादळ आणि पावसामुळे कित्येक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं. जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये पाऊस आणि हिमवृष्टी झाली, तर दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी धुळीचं वादळ आणि पाऊस झाला. या भागात आजही वादळ आणि पाऊस होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामानखात्यानं म्हटलं आहे.

****

 दक्षिण मध्य रेल्वेनं उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नांदेडहून विविध भागात जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. नांदेडहून दिल्लीला जाणाऱ्या गाडीच्या २४ फेऱ्या, पुणे आणि पनवेलला जाणाऱ्या गाडीच्या २६ फेऱ्या, तर जबलपूर आणि सिकंदराबादला जाणाऱ्या गाडीच्या १७ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 23.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 23 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...