Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 10 May 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १० मे २०१८ सकाळी ६.५० मि.
*****
Ø १६ ते १८ वर्षांच्या मुलामुलींना विना परवाना इलेक्ट्रिक
स्कूटर चालवण्यास परवानगी देण्याचा सरकारचा विचार
Ø औद्योगिक बर्फ ओळखण्याचा महाराष्ट्र पॅटर्न आता देशात
लागू करण्यात येणार
Ø दूध उत्पादकांसाठी किमान आधारभूत दराचा कायदा आणण्याचा प्रयत्न
-पशू संवर्धन मंत्र्यांची ग्वाही
Ø ओजस आंतरराष्ट्रीय शाळा उपक्रमात मराठवाड्यातल्या दोन
शाळांची निवड
आणि
Ø औरंगाबाद जालना इथं अपघाताच्या दोन घटनांत दोन ठार तर
४६ जखमी
*****
१६ ते १८ वर्ष वयोगटातल्या किशोरवयीन मुलामुलींना
विना परवाना इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यास परवानगी देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल नवी दिल्लीत पीटीआय या वृत्तसंस्थेला
ही माहिती दिली. या संदर्भात आठवडाभरात अध्यादेश जारी केला जाईल, असं ही गडकरी यांनी
सांगितलं. इलेक्ट्रॉनिक दुचाकींच्या वापराला चालना मिळावी, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं,
गडकरी म्हणाले.
दरम्यान, इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या नंबर
प्लेट आता हिरव्या रंगाच्या असतील, खासगी वाहनांसाठी हिरव्या पट्टीवर पांढऱ्या रंगाने
क्रमांक टाकलेला असेल, तर व्यावसायिक वाहनांसाठी हिरव्या पट्टीवर पिवळ्या रंगाने क्रमांक
टाकलेला असेल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
****
औद्योगिक बर्फ ओळखण्याचा महाराष्ट्र पॅटर्न आता देशात
लागू करण्यात येणार आहे. याबाबतचं निवेदन विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात
आलं होतं. या पॅटर्नला केंद्रीय अन्न संरक्षण प्राधिकरणानं मंजुरी दिली असून, हा पॅटर्न
देशातल्या सर्वच राज्यांना लागू केला आहे.
यानुसार खाण्यास अयोग्य बर्फ फिकट निळ्या
रंगाचा दिसेल, तर खाण्यास योग्य बर्फ सामान्य म्हणजेच, पारदर्शक दिसेल. या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या बर्फ उत्पादकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
****
दूध उत्पादकांसाठी किमान आधारभूत दराचा कायदा आणण्याचा
प्रयत्न करत असल्याची ग्वाही, पशू संवर्धन, आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी
दिली आहे. आमदार बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली प्रहार संघटनेच्या शिष्टमंडळानं दूध
दर तसंच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अन्य समस्यांबाबत जानकर यांची काल भेट घेतली. त्यावेळी
जानकर यांनी उत्पादन खर्चावर आधारित दर देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं आश्वासन दिलं.
दुधाचा उत्पादन खर्च निश्चित करण्यासाठी
नियुक्त समितीमध्ये कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ तसंच दूध उत्पादकांच्या प्रतिनिधींचा
समावेश असेल, असं जानकर यांनी सांगितलं.
****
राज्यात ओजस आंतरराष्ट्रीय शाळा उपक्रमाच्या
पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातल्या दोन शाळांची निवड झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्याच्या
कळंब तालुक्यातल्या शिराढोण इथली जिल्हा परिषद प्रशाळा आणि परभणी जिल्ह्याच्या पाथरी
तालुक्यातल्या माळीवाडा इथली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, यांचा या उपक्रमात समावेश
करण्यात आला आहे. राज्यात अशा तेरा शाळांची या उपक्रमांतर्गत निवड झाली आहे. येत्या
शैक्षणित वर्षात सुरु होणाऱ्या या सर्व शाळांसाठी सत्तर शिक्षकांची निवड करण्यात आली
असून त्यांना दर्जेदार प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
****
केंद्र शासनानं इमारत आणि बांधकाम कामगार अधिनियमानुसार
बांधकामाची व्याख्या निश्चित केली असून यामध्ये वन मजुरांचा समावेश करावा, असं अर्थ
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे, काल मुंबई इथं यासंदर्भात आयोजित बैठकीत
मुनगंटीवार यांनी, अशी मागणी करणारं पत्र केंद्रीय कामगार मंत्र्यांना पाठवण्याच्या
सूचना दिल्या.
****
सामाजिक संपर्क माध्यमं सोशल मीडियावरून महिलांबाबत
होणारी अवमानकारक वक्तव्यं रोखण्यासाठी विशेष सायबर डेस्क उभारण्याचा निर्णय राज्य
महिला आयोगानं घेतला आहे. याबाबतीत जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर परिषद घेण्याचंही
आयोगानं ठरवलं आहे. यासंदर्भात स्थापन समितीची पहिली बैठक काल राज्य महिला आयोगाच्या
अध्यक्ष विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, क़ृषी शास्त्र पदवी
आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक एम एच टी- सी ई टी आज होणार आहे. राज्यभरातले
४ लाख ३५ हजार ६०६ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. सकाळी सव्वा ९ वाजेपासून या परीक्षेला
सुरुवात होईल.
****
आरक्षित संवर्गातल्या शिक्षक तसंच शिक्षकेतर रिक्त
जागा भरण्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी सूचना करत असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे
उपसचिव सिध्दार्थ खरात यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाच्या आरक्षण कक्षातर्फे, ‘आरक्षण ध्येय धोरण आणि अंमलबजावणी’ या
विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली, या कार्यशाळेच्या उद्धाटनपर भाषणात खरात
बोलत होते. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. पुरण मेश्राम
यांनी यावेळी घटनात्मक आरक्षणाची जबाबदारी या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं.
****
औरंगाबाद तसंच जालना जिल्ह्यात काल अपघातांच्या दोन
घटनांमध्ये दोन जण ठार तर जवळपास ४६ जण जखमी झाले.
जालना जिल्ह्यात काल एका जीप आणि दुधाच्या टँकरची
धडक होऊन दोन जण ठार तर तिघे जखमी झाले. नवविवाहित दांपत्य तुळजापूरहून दर्शनानंतर
औरंगाबादकडे परतत असताना हा अपघात झाला, यात नवविवाहित तरुण आणि त्याच्या बहिणीचा मृत्यू
झाला, तर नववधूसह तिन जण जखमी झाले.
औरंगाबाद नजिक सावंगी इथं राज्य मार्ग परिवहन मंडळाची
बस आणि ट्रक यांच्यात अपघात होऊन ४३ प्रवासी जखमी झाले. सिल्लोडकडे जाणारी बारामती
– रावेर बस आणि औरंगाबादच्या दिशेने येणारा ट्रक यांच्यात दुपारी दीड वाजेच्या दरम्यान
हा अपघात झाला. जखमींपैकी काही प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त आहे.
****
लातूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला २०१८-१९
या शैक्षणिक वर्षासाठी भारतीय वैद्यक परिषद – एम.सी.आय नं १५० विद्यार्थ्यांना प्रवेश
देण्यासाठी परवानगी दिली आहे. या संस्थेनं त्यांच्या तपासणीत १५० विद्यार्थ्यांसाठी
लागणाऱ्या काही सुविधा, तांत्रिक त्रुटी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्या बाबीची
प्रशासनानं पुर्तता केल्यामुळे एमसीआयनं १५० जागा कायम ठेवण्यास मंजुरी दिली आहे.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या
औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातल्या ३ युवकांना पोलीसांनी काल अटक केली.
सिल्लोड नगरपालिका परिसरात रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पोलीसांनी ही कारवाई केली.
या युवकांकडून एक लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला.
****
जालना शहरातल्या बालाजीनगर इथला रास्त
भाव दुकानदार नंदकिशोर अग्रवाल आणि त्याचा मुलगा स्वप्नील अग्रवाल यांच्यावर तीनशे
रुपये लाच घेतल्याबद्दल जालन्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गुन्हा दाखल केला
आहे. तक्रारदाराला धान्याचं वाटप सुरू करण्यासाठी या दुकानदारानं ही लाच मागितली होती.
****
प्रधानमंत्री राष्ट्रीय स्वास्थ्य सुरक्षा मिशन,
या योजनेच्या लाभार्थींची पडताळणी आणि लाभार्थींच्या कुटुंबांच्या अतिरिक्त माहितीचं
संकलन करण्याचं काम सुरू असून, लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या लाभार्थी कुटुंबांनी
या कामात सहकार्य करावं, असं आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉक्टर विपिन ईटनकर यांनी केलं आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थींना प्रती वर्ष पाच लाख
रुपयांपर्यंत आरोग्य विमा सुरक्षा देण्यात येणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या २१९ सिंचन प्रकल्पात सध्या
१७ पूर्णांक ९३ शतांश इतका पाणी साठा आहे. तेरणा मध्यम प्रकल्पात ५८ टक्के, रुईभर प्रकल्पात
२५ टक्के, तर तुळजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कुर्नूर प्रकल्पात ३३ टक्के पाणी
साठा शिल्लक असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment