Monday, 14 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 14 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ४ मे २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø विवाह  संपुष्टात आल्यानंतरही पूर्वाश्रमीच्या पतीच्या क्रूर वागणुकी विरोधात तक्रार दाखल होऊ शकते,  सर्वोच्च न्यायालय

Ø शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टर तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं प्राधान्यानं भरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

Ø औरंगाबाद शहरात उसळलेल्या दंगलीनंतर परिस्थिती आता पूर्वपदावर

आणि

Ø डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा उद्या ५८ वा दीक्षांत समारंभ

*****



 विवाह कायद्यानं संपुष्टात आल्यानंतरही एखादी महिला आपल्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या क्रूर वागणुकी विरोधात तक्रार दाखल करू शकते, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत तिला असा हक्क असल्याचं मत न्यायालयानं नोंदवलं आहे. वैवाहिक संबंध सध्या अस्तित्वात नसल्याच्या कारणावरुन पीडित महिलेला न्यायापासून वंचित ठेवता येणार नाही, हा राजस्थान उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला. न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती आर बानूमथी आणि न्यायमूर्ती नवीन सिन्हा यांच्या पीठानं हा निर्णय दिला.

****



 अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अटक होण्यापासून संरक्षण मिळण्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवण्यासाठी एक विधेयक आणण्याचा विचार सरकार करत आहे. तसंच यासंदर्भातील मुद्यांना न्यायालयीन हस्तक्षेपापासून दूर ठेवण्याच्या दृष्टीनंही या विधेयकात तरतूद असेल असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य घटनेच्या नवव्या अनुसूचिमध्ये हा कायदा अंतर्भूत करण्यासाठी हे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे. या कायद्यातील तरतूदी यानंतर शिथील केल्या जाऊ नयेत यासाठी या विधेयकात कायमस्वरूपी नियम केले जाईल.

****



अनुसूचित जातींसाठी केंद्र सरकारची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना किमान ५० टक्के लाभार्थी विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढच्या इयत्तेत जाण्याची काळजी घेणं यापुढं अनिवार्य ठरणार आहे. अन्यथा या संस्थांचा समावेश काळया यादीत केला जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. बनावट प्रवेश दाखवून मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत मोठया रकमा स्वतःच्या पदरात पाडून घेणाऱ्या काही संस्थांचा गैरकारभार उघडकीला आल्यानं या योजनेच्या नियमांमध्ये सुधारणा केल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. सुधारित नियमांनुसार देखभाल खर्चासाठी अनिवार्य रक्कम आणि विनापरतावा शुल्क यापुढे फक्त लाभार्थी विद्यार्थ्याच्या खात्यावरच जमा होईल, अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली.

****



 वैद्यकशास्त्रातल्या अन्य शाखां प्रमाणेच होमियोपॅथीचा विविध शासकीय योजनांमध्ये समावेश करण्याबाबत केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. होमिओपॅथी उपचारांसंदर्भात आरोग्य विमा कवच देण्याबाबतही आयुष मंत्रालय विचार करत असल्याची माहिती या खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. ते कोल्हापूर इथं एका रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

****



 शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टर तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं प्राधान्यानं भरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. यासाठी सर्व रुग्णालयांचं सर्वेक्षण करून, रिक्त पदांचा आढावा घ्यावा, असं न्यायालयानं यासंदर्भात दाखल जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान सांगितलं. राज्य सेवा आयोगानं या रुग्णालयांमधल्या वरिष्ठ डॉक्टर तसंच इतर कर्मचाऱ्यांच्या भर्तीचे प्रस्ताव तातडीनं मंजूर करावेत, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात येत्या १५ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं सरकारला दिले आहेत.

*****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 औरंगाबाद शहरात उसळलेल्या दंगलीनंतर परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. शहरातल्या काही भागात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षानं दिली आहे. शहरातील जनजीवन सुरळीत असून दंगलग्रस्त भागातील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी सुमारे तीन हजार दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. २४ जणांना अटक केली आहे.  त्यांना न्यायालयाने येत्या १७ तारखे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शहरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी तसंच मोबाईल इंटरनेट सेवा अद्याप बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी दिली आहे. शहरात तणाव कायम असून दंगलग्रस्त राजाबाजार, शहागंज, मोतीकारंजा, नवाबपुरा, चेलीपुरा आदी भागात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.



 दरम्यान, काल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि एम आय एम चे आमदार इम्तीयाज जलील आदी  नेत्यांनी दंगलग्रस्त भागांची पाहणी करुन नागरिकांशी चर्चा केली. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी जखमी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर विखे पाटील यांनी पत्रकारांशी बातचित केली. दंगलीची घटना निषेधार्ह असल्याचं सांगत, याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकारला अपयश आलाचा आरोप करत दंगलग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही पाटील यांनी केली.



 खासदार दानवे यांनी प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेऊन चर्चा केली. दंगलीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन वाढीव पोलिस कुमक पाठवल्याचं त्यांनी सांगीतलं.

****



 पैसे भरल्यानंतरही वीज जोडणी प्रलंबित असलेल्या सुमारे दोन लाख २४ हजार कृषीपंप ग्राहकांना आता उच्च दाब वितरण प्रणालीतून वीज जोडण्या देण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे प्रकल्प संचालक दिनेशचंद्र साबू यांनी दिली आहे. लातूर इथं महावितरणच्या लातूर परिमंडळातील अधिकारी आणि ठेकेदारांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या प्रणालीतून एक किंवा दोन शेतकऱ्यांसाठी दहा ते पंचवीस केव्हीचं एक स्वतंत्र रोहित्र मिळणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना अधिक दर्जेदार, अखंडित, पुरेशा दाबाची आणि अपघातमुक्त वीज सेवा मिळेल आणि वीज चोरीलाही आळा बसेल असं त्यांनी यावेळी सांगितलं

****



 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारंभ उद्या मंगळवारी होत आहे. कार्यक्रमाला जेष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची उपस्थिती रहाणार असून दुपारी तीन वाजता समारंभाला सुरूवात होणार आहे.

या वेळी २३९ विद्यार्थ्यांना पीएचडी. प्रदान केली जाणार आहे. यंदा एकूण ६१ हजार विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.

****



 औरंगाबाद शहरातल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं प्रक्रिया करण्यात येणार असून त्यासाठी आजपासून औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन कचरा संकलन करणार आहे .या संदर्भात विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या संनियंत्रण समितीनं ठरवून दिलेल्या चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी इथल्या जागांवर बायोकल्चर पद्धतीनं कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.

****



 औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. निपुण विनायक आज आपल्या  पदावर रूजू होणार आहेत. शहरातल्या कचरा समस्येवरून तत्कालीन आयुक्त डी.एम.मुगळीकर यांची बदली करण्यात आली होती. त्या नंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.

****



 शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असलेल्या  शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या नेतृत्वाखाली आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी ११ वाजता सहा ठिकाणी रास्ता रोको करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कन्नड , लासूर स्टेशन ,सिल्लोड, पैठण, पैठण शहागड रस्त्यावरील टाकळी अंबड आणि घेवारी तसंच फुलंब्री तालुक्यातल्या चिंचोळी आणि वाघोळा ग्रामपंचायतीसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, दुधाला प्रति लिटर २७ रूपये भाव आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

****



 परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होत आहे. रामप्रसाद बोर्डीकर, आणि सुरेश वरपुडकर या दोन्ही माजी अध्यक्षांमध्ये चुरस असून बहुमत गाठण्यासाठी दहा जागा जिंकाव्या लागणार आहेत. सध्या बँकेच्या संचालकांची संख़्या १८ असून हिंगोली जिल्ह्यातल्या संचालकांची मतं निर्णायक ठरणार आहेत.

****

 औरंगाबाद शहराला तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचं नियोजन कोलमडलं असून नागरिकांना अनेक ठिकाणी चौथ्या दिवशीही पाणी मिळत नसल्याची तक्रार केली आहे. दोन दिवसांआड मिळणारं पाणी आठवडाभर मिळत नसल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे. या  पार्श्वभूमीवर , महापालिकेत आज सकाळी साडे नऊ वाजता आढावा बैठकीचं आयोजन करण्यात  आलं आहे.

****



 जालना-राजूर रस्त्यावर तपोवन फाट्यावर जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक ठार तर अन्य एकजण जखमी झाला. वऱ्हाड घेवून जाणारी जीप भोकरदनकडे जात असताना काल पहाटे हा अपघात झाला. जीपमधील काही प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे.

****



 परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान सतत ४४ अंश सेल्सिअसच्या आसपास कायम असल्याने उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. शासकीय रूग्णालयात उष्णताविकारग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाली असून त्यात वृद्ध आणि बालकांचं प्रमाणा अधिक असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****



 वाढत्या तापमानामुळे जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जलसाठ्यात झपाट्यानं घट होत असल्यानं अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून जिल्ह्याच्या ५४ गावांमध्ये ६२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसंच पाणीपुरवठ्यासाठी २०५ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे.

****



 जालना जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्त्रोत नसलेल्या टंचाईग्रस्त गावांना प्रस्ताव सादर केल्यापासून २४ तासाच्या आत टँकरनं पाणी पुरवठा करण्याच्या सूचना पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्याच्या पाणी टंचाईचा आढावा लोणीकरांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतला त्यावेळी ते बोलत होते.

*****

***

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.06.2026 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 18 June 2026 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रप...