Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मे २०१८ दुपारी १.०० वा.
*****
पेट्रोल कंपन्यांनी
आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात आज प्रति लिटर १७ पैशांची तर डिझेलच्या दरात
प्रति लिटर २१ पैशांची वाढ करण्यात आली. दिल्लीत पेट्रोलचे दर ७४ पूर्णांक ६३ रुपयांवरुन ७४ पूर्णांक
८० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर ६५ पूर्णांक ९३ रुपयांवरुन ६६ पूर्णांक
१४ रुपये प्रति लिटरवर गेले आहेत. या दर वाढीमुळे डिझेलच्या दरानं उच्चांक गाठला आहे,
तर पेट्रोलनंदेखील ५६ महिन्यांमधला सर्वाधिक दर नोंदवला आहे. दरवाढीनंतर मुंबईत
पेट्रोलचा दर प्रति लिटर ८२ रुपये ६५ पैसे इतका, तर
डिझेलचा दर प्रति लिटर ७० रुपये ४३ पैसे इतका झाला आहे.
****
उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमधल्या
चक्रीवादळानं मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ५३ झाली आहे. तर यात ६५ जण जखमी झाले.
केंद्रीय गृहमंत्रालयानं आज दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधे ३९ लोक मृत्युमुखी
पडले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये नऊ, पश्चिम बंगालमध्ये चार आणि दिल्लीत एकाचा चक्रीवादळात
मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांतल्या या तुफानी वादळात मोठी वित्तहानीही झाल्याची माहिती
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दिली आहे. महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, उत्तराखंड,
पंजाब, हरियाणा, चंडीगढ, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, मेघालय, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूतील
तुरळक भागालाही काल चक्रीवादळाचा फटका बसल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या कठुआ सामुहीक बलात्कार आणि हत्या
प्रकरणातल्या साक्षीदारांनी, राज्य पोलिसांकडून आपला छळ होत असल्याचा आरोप करणारी याचिका
सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यावर न्यायालय येत्या बुधवारी १६ मे रोजी सुनावणी
घेणार आहे. पोलिस आणि दंडाधिकाऱ्यांसमोर यापूर्वीच आपण साक्ष दिली असून, पोलिस पुन्हा
पुन्हा साक्ष देण्यास सांगत असल्याचं या याचिकेत
म्हटलं आहे.
****
भारतीय
सैन्याला लागणारी महत्त्वाची शस्त्रास्त्र आणि रणगाडे भारतातच तयार करण्यासाठीच्या
१५ हजार कोटींच्या महत्त्वाकांशी प्रकल्पाला भारतीय सैन्य दलानं मान्यता दिली आहे.
या प्रकल्पात ११ खाजगी कंपन्यांना सहभागी करून घेतलं जाणार असल्याचं अधिकृत सुत्रांनी
सांगितलं. सुरुवातीच्या टप्प्यात रॉकेट, हवाई सुरक्षा प्रणाली, तोफा, युद्धासाठीची
शस्त्र सज्ज वाहनं, ग्रेनेड लाँचर आणि इतर शस्त्रास्त्रांसाठी लागणाऱ्या दारुगोळ्याची
निर्मिती करण्यात येणार आहे. तीस दिवसांच्या युद्धासाठी महत्त्वाच्या शस्त्रास्त्रांचा
साठा तयार करणं, आयात नियंत्रण यासाठी हा प्रकल्प
आहे.
****
राज्यातल्या
महत्वाच्या व्यक्तींची हत्या करण्याचा कट रचण्याच्या आरोपावरुन राज्य दहशतवाद विरोधी
पथकानं काल एकाला अटक केली. संबंधित आरोपी पाकिस्तानमधल्या कराची इथं दहशतवादी संघटनेकडून
स्फोटकं हाताळण्याचं, तसंच आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवण्याचं प्रशिक्षण घेऊन आला
होता. त्याला काल दहशतवादी विरोधी पथकानं मुंबईतल्या जूहू परिसरातून
अटक केली. काल त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं
त्याला २१ मे पर्यंत दहशतवाद विरोधी पथकाची कोठडी सुनावली आहे.
****
ओडीशातल्या
कंधमाल आणि बालनगीर इथं सुरक्षा दलांसोबत झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले असून, त्यात दोन महिलांचा समावेश आहे. चकमकीच्या
ठिाकाणाहून आठ रायफल्स, दारुगोळा सापडल्याचं अतिरिक्त
पोलिस महासंचालक आर. पी. कोचे यांनी सांगितलं. बालनगीर जिल्ह्यातल्या दुदकमल गावात
दोन नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केलं. या
दोघांवर नऊ लाख रुपयांचं बक्षिस होतं.
****
महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी
मंडळाच्या बांधकाम कामगार विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत ४० दिवसात सुमारे सव्वा दोन
लाख जणांची नोंदणी झाली आहे. सहा विभागांत मुंबई विभागात सर्वाधिक ७६ हजार २०६, तर
सगळ्यात कमी नाशिक विभागात १८ हजार २२४ इतकी नोंदणी झाली आहे. विशेष नोंदणी अभियानाअंतर्गत
कामगारांना २८ योजनांचा लाभ घेता येणार आहे.
****
१६ मे या जागतिक कृषी पर्यटनदिनी मुंबई इथं शेतकऱ्यांची
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण पर्यटन परिषद, तसंच कृषी पर्यटन पुरस्कार वितरण समारंभ
आयोजित करण्यात आला आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन
मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे.
****
भारतानं
सर्बिया इथं पार पडलेल्या १६ वर्षांखालच्या मुलांच्या चार राष्ट्रांच्या फुटबॉल स्पर्धेचं
विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं ताजिगिस्तानचा चार
– दोन असा पराभव केला. स्पर्धेच्या साखळी फेरीतल्या तीन सामन्यांत
एक बरोबरी आणि दोन विजयांसह सात गुणांची कमाई करणारा भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित
राहिला.
*****
***
No comments:
Post a Comment