Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 15 May 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक १५ मे २०१८ सकाळी ६.५० मि.
*****
Ø येत्या खरीप हंगामात कापूस
लागवडीसाठी कपाशी बियाणांची दोन कोटी पाकीटं उपलब्ध करुन देणार - कृषीमंत्र्यांची
ग्वाही
Ø विधानपरिषदेच्या शिक्षक,
आणि पदवीधर मतदार संघाची निवडणूक स्थगित
Ø औरंगाबाद इथं गेल्या आठवड्यात झालेली
दंगल पूर्व नियोजित - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा आरोप
Ø दंगलीतल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पाच पथकं नियुक्त
आणि
Ø मराठवाडा साहित्य परिषदेचे २०१८चे ग्रंथ पुरस्कार जाहीर
****
येत्या खरीप हंगामात कापूस लागवडीसाठी राज्यात, ४२ कंपन्यांच्या माध्यमातून कपाशी बियाणांची दोन कोटी
पाकीटं कपाशी बियाणं उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी,
काल मंत्रालयात खरीप हंगामाच्या नियोजनासाठी, कापूस बियाणं उत्पादक कंपन्यांसोबत झालेल्या
बैठकीनंतर ही माहिती दिली. यंदा साधारणत: ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाचं नियोजन
करण्यात आलं आहे. या वर्षी प्रथमच सुमारे ५ हजार बियाणे नमुन्यांच्या पेरणीपूर्व तपासणीचं
नियोजन करण्यात आलं आहे, असं फुंडकर यांनी सांगितलं. शेतकरी बांधवांनी परवानगी असलेल्या
वाणांचाच वापर करावा, पूर्वहंगामी लागवड करु नये, असं आवाहन, कृषी मंत्र्यांनी केलं.
****
राज्यातल्या
महामार्गासाठी आता शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेताना, त्यांची सहमती
अनिवार्य राहणार नाही, अशी तरतूद करणाऱ्या शासन निर्णयाला,
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विरोध केला आहे. सरकारनं गेल्या
आठवड्यात सात मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतल्याबद्दल, मुंडे यांनी काल ट्विटरवर त्यांचं मत व्यक्त केलं. शेतकऱ्यांच्या
सहमती शिवाय त्यांची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ देणार नाही, असा
इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
****
सांगली जिल्ह्याच्या पलूस-कडेगाव विधानसभा मतदार
संघाच्या पोटनिवडणुकीतून भारतीय जनता पक्षानं माघार घेतली आहे. भाजप उमेदवार संग्रामसिंह
देशमुख यांनी अर्ज मागे घेतल्यानं, आता काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांची बिनविरोध
निवड निश्चित आहे. डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी,
येत्या २८ मे रोजी मतदान, तर ३१ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कदम यांना श्रद्धांजली
म्हणून, शिवसेनेनं यापूर्वीच, विश्वजित कदम यांना पाठिंबा जाहीर केला होता.
****
भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानपरिषदच्या
शिक्षक, आणि पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित केला
आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकरता लागू करण्यात आलेली आचारसंहिता मागे घेण्यात आली आहे,
असं, राज्याचे उप सचिव, आणि सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
कळवलं आहे.
****
औरंगाबाद इथं गेल्या आठवड्यात झालेली दंगल पूर्व
नियोजित असल्याचा आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला आहे. ते
काल नाशिक इथं बोलत होते. निवडणूक जवळ आली की, जातीय दंगली घडवल्या जातात. तसंच, ही
दंगल हाताळण्यात सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप करत, पवार यांनी, औरंगाबाद शहराचे पोलीस
आयुक्तपद दोन दोन महिने रिक्त राहतं कसं, असा प्रश्न उपस्थित केला.
राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री पाहीजे या मागणीचा त्यांनी
पुनरुच्चार करून, दंगलग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.
या दंगलीतल्या नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पाच पथकं
नियुक्त करण्यात आली आहेत. महसूल, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, नगर भूमापन, प्रादेशिक
परिवहन तसंच महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. कामाचं गांभीर्य
आणि कालमर्यादा लक्षात घेऊन, या पथकांनी काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या दंगलीवेळी काही दंगेखोरांसोबत पोलिस
चालत असल्याची चित्रफीत, सामाजिक संपर्क माध्यमांवरून प्रसारित झाल्याचं वृत्त आहे.
या कथित चित्रफीतीसंदर्भात चौकशी करणार असल्याचं, अतिरिक्त पोलिस महासंचालक बिपीन बिहारी
यांनी पी टी आय ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. सत्यता पडताळणीनंतर पोलिस दोषी आढळल्यास,
योग्य कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
दंगल प्रकरणी आतापर्यंत ७० जणांना अटक
करण्यात आली आहे, आज दिवसभरात परिस्थितीचा आढावा घेऊन, इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात
येईल, असं पोलीस महानिरीक्षक तथा प्रभारी पोलिस आयुक्त मिलींद भारंबे यांनी काल पी.टी.आय या वृत्त संस्थेला सांगितलं.
****
अहमदनगर मधल्या केडगाव दुहेरी हत्याकांडातला
संशयित आरोपी, भानुदास कोतकर याला पोलिसांनी काल पुण्यात अटक केली. या प्रकरणी आमदार
संग्राम जगताप यांच्यासह नऊ जणांना अटक झाली आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद
केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध
आहे.
****
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती काल सर्वत्र उत्साहात
साजरी करण्यात आली. विविध पक्ष संघटनांच्या वतीनं महाराजांच्या प्रतिमांना अभिवादन
करण्यात आलं.
****
भाडेकरू लघुउद्योजकांना चिकलठाणा, आणि वाळूज महाराष्ट्र
औद्योगिक क्षेत्रात, सहा महिन्यात प्राधान्यानं भूखंड उपलब्ध करून दिले जातील, असं
आश्वासन, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं आहे. लघुउद्योजकांच्या विविध प्रसंदर्भात
मुंबईत, देसाई यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी आमदार सतीश चव्हाण
यांच्या शिष्टमंडळाला त्यांनी हे आश्वासन दिलं.
****
भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा - आय सी एस ई चा
इयत्ता दहावीचा आणि भारतीय शाळा प्रमाणपत्र - आय एस सी चा इयत्ता बारावीचा निकाल काल
जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत मुंबईचा स्वयम दास ९९ पूर्णांक चार टक्के गुण मिळवून
पहिला आला. तर बारावीच्या परीक्षेत सात विद्यार्थ्यांनी ९९ पूर्णांक पाच टक्के गुण
मिळवून पहिला क्रमांक पटकावला
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे २०१८चे ग्रंथ पुरस्कार
काल जाहीर झाले. नरेंद्र मोहरीर वाङमय पुरस्कार डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या, 'लक्षणीय
असे काही' या ग्रंथाला, नरहर कुरुंदकर वाङमय पुरस्कार प्रसाद कुमठेकर यांच्या 'बारकुल्या
बारकुल्या ष्टोऱ्या' या कथासंग्रहाला, प्राचार्य म. भि. चिटणीस वाङमय पुरस्कार डॉ.
कैलास इंगळे यांच्या, 'वाङमयीन मराठवाडा' या ग्रंथाला, कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार
डॉ. पी विठ्ठल यांच्या 'एक शून्य मी' या कवितासंग्रहाला, बी रघुनाथ कथा/कांदबरी पुरस्कार,
कृष्णात खोत यांच्या 'रिंगाण' या कादंबरीला, कुमार देशमुख नाट्य पुरस्कार राजीव नाईक
यांच्या 'लागलेली नाटकं' या पुस्तकाला, तर रा. ज देशमुख स्मृति पुरस्कार, नांदेडच्या
निर्मल प्रकाशनचे प्रवर्तक निर्मलकुमाल सूर्यवंशी यांना जाहीर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष
कौतिकराव ठाले पाटील यांनी काल या पुरस्कारांची घोषणा केली.
****
औरंगाबाद इथं, डॉ बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत समारंभ आज होणार आहे. सायंकाळी चार वाजता होणाऱ्या
या समारंभात ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्या हस्ते पीएच डी पदवी प्रमाणपत्रं
प्रदान केली जाणार आहेत.
****
राष्ट्रीय रुरबन मिशन या प्रकल्पांतर्गत कामं वेळेत
न करणाऱ्या, तसंच कामात हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा
इशारा, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे. परतूर तालुक्यात आष्टी इथं आयोजित बैठकीत,
लोणीकर बोलत होते. या मिशन अंतर्गत आष्टी परिसरातल्या १६ गावांची निवड करण्यात आली आहेत. ही कामं
दर्जेदार, आणि गुणवत्तापूर्ण करण्याबरोबरच या कामांना गती देण्याचे निर्देश, लोणीकर
यांनी दिले.
****
बदलत्या स्वरूपानुसार उद्भवू शकणारी आपत्तीजनक परिस्थिती
हाताळण्यासाठी, अद्ययावत, प्रभावी आपत्ती व्यवथापन कृती आराखडा तयार ठेवण्याचे निर्देश,
विभागीय आयुक्त पुरूषोत्तम भापकर दिले आहेत. काल औरंगाबाद इथं विभागीय आयुक्त कार्यालयात
मान्सूनपूर्व आढावा बैठकीत दूरदृष्य संवाद प्रणाली मार्फत विभागात जिल्हा प्रशासन आणि
पोलिस प्रशासनाशी, संवाद साधताना त्यांनी हे निर्देश दिले. नालेसफाई, कचरा व्यवस्थापनासह,
जलसंधारणाची कामं तत्परतेनं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
****
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात समाधानकारक
काम न केल्याच्या निषेधार्थ काल परभणी इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं, जिल्हा
उपनिबंधकांच्या खूर्चीवर तूर टाकून, आंदोलन करण्यात आलं.
दरम्यान, पीकविमा देण्याच्या मागणीसाठी
गंगाखेड तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे. ४५ टक्के आणेवारी
असूनही शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिल्यानं, संबंधित विमा कंपनीवर कारवाईची मागणी
करण्यात येत आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ओल्या कचऱ्यापासून
खतनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या दहा तालुक्यातल्या गावांची निवड
करण्यात आली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment