आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१५ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी
झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भारतीय
जनता पक्ष १०९, काँग्रेस ७०, तर जनता दल ४० जागांवर आघाडीवर आहे. मुख्यमंत्री सिद्धरामैय्या
चामुंडेश्वरी मतदारसंघातून ११ हजार मतांनी मागे असल्याचं, तसंच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे
उमेदवार बी एस येडीयुरप्पा शिकारपुरा मतदारसंघातून नऊ हजार मतांनी आघाडीवर असल्याचं
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद महाराष्ट्र दौऱ्यावर असून,
काल सायंकाळी त्यांचं मुंबईत आगमन झालं. राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर राष्ट्रपतींचं स्वागत केलं. मुंबईत सेवा क्षेत्राशी
संबंधित प्रदर्शनाचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते भाभा अणुसंशोधन
केंद्राला भेट देऊन अणु ऊर्जा विभागाच्या दक्षता केंद्रांचं उद्घाटन करतील.
****
लातूर मधल्या आलमला इथल्या विवेकानंद
वाचनालयास, २०१५-१६ या वर्षाचा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय
पुरस्कारानं काल उच्च, आणि तंत्र शिक्षणमंत्री
विनोद तावडे यांच्या हस्ते मुंबईत सन्मानित करण्यात आलं. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ,
आणि ३० हजार रुपये असं या पुरस्कराचं स्वरुप आहे.
****
हिंगोली राज्य राखीव पोलीस दल भरती घोटाळा प्रकरणी
निलंबित २० जवानांच्या उत्तरपत्रिका पोलिसांनी काल जप्त केल्या. या वीस जणांनी चाचणीतले
गुण वाढवून घेत, नोकरी मिळवल्याचं समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
****
आयपीएल क्रिक्रेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या पाच
जणांना काल सातारा पोलिसांनी अटक केली. सातारा जिल्ह्यात कराड इथं काल ही कारवाई करण्यात
आली. या पाच जणांकडून दोन लाख रुपये किमतीचे आठ मोबाइल, तसंच काही रोकड़ जप्त करण्यात
आली.
****
भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र
विधानपरिषदच्या शिक्षक, आणि पदवीधर मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम
स्थगित केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाकरता लागू करण्यात आलेली आचारसंहिता मागे घेण्यात
आली आहे, राज्याचे उप सचिव, आणि सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे
माहिती दिली.
*****
***
No comments:
Post a Comment