Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ मे २०१८ दुपारी १.०० वा.
*****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयाकडे
वाटचाल करत असल्याचं दिसून येत आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, भाजपनं ३६,
तर काँग्रेसनं १२ जागांवर विजय मिळवला. भाजप १०९, काँग्रेस ७०, जनता दल ४१, तर दोन
जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत.
****
जम्मू कश्मीरमधल्या सांबा इथल्या आंतरराष्ट्रीय सीमेलगत पाकिस्तानी सैन्यानं आज
केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या
पाकिस्तानी सैन्यानं पहाटेच्या सुमारास भारतीय तळाला लक्ष्य करून गोळीबार केल्याची
माहिती सीमा सुरक्षा दलाच्या सूत्रांनी दिली. भारतीय सैन्यानंही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर
दिलं. साधारण तीन तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु होता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मंत्रीमंडळ बदल जाहीर केले. स्मृती इराणी यांच्या जागी माहिती आणि प्रसारण मंत्री
म्हणून कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांना स्वतंत्र कार्यभार देण्यात आला आहे. याआधी राठोड या खात्याचे राज्यमंत्री होते. स्मृती इराणी यांच्याकडे आता फक्त वस्त्रोद्योग मंत्रालयाची
जबाबदारी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर
काल किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे ते बरे होईपर्यंत त्यांच्या खात्याचा कार्यभार रेल्वेमंत्री पियुष गोयल
यांच्याकडे सोपवला आहे. अल्फोन्स कन्नाथनम यांच्याकडून
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्रीपद काढून घेण्यात आलं असून, त्या
जागी एस एस अहलुवालिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहलुवालिया यांच्याकडे पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा कार्यभार होता.
****
वारली या आदिवासी चित्रकलेला वैभव प्राप्त करुन देणारे ख्यातनाम कलाकार पद्मश्री
जीवा सोमा म्हसे यांचं आज पालघर इथं दीर्घ आजारानं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते.
डहाणुतल्या आदीवासी पाड्यावर राहणाऱ्या म्हसे यांना वारली चित्रकार म्हणून
आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली. एकोणिसशे शेहेत्तर मध्ये
त्यांना आदीवासी कलेसाठी राष्ट्रीय पुरस्कारानं, तसंच २०११ मध्ये पद्मश्री पुरस्कारानं
सन्मानित करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसे यांच्या निधनाबद्दल
शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानं आदिवासी समुहाची वैशिष्ट्यपूर्ण कला-संस्कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवणारा उपासक-प्रसारक
आपण गमावला असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, जीवा सोमा म्हसे यांना श्रद्धांजली अर्पण
केली.
****
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी पुढच्या महिन्यात तीन जून रोजी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती अर्थमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं ‘वस्तु आणि सेवा परिषदे’च्या कार्यालयात जीएसटी
अंतर्गत साखरेवर उपकर आकारण्यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते.
****
लातूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात मॉडेल आयटीआय सुरु करण्यात आलं असून, यामधून गुणवत्तापूर्ण
आणि नाविन्यपूर्ण शिक्षण मिळणं आवश्यक असल्याचं कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर
यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं कौशल्य विकास विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मॉडेल
आयटीआय तयार करण्यासाठी राज्य शासनानं १५ कोटी रुपये खर्च केले असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
भाडेकरू लघुउद्योजकांना चिकलठाणा, आणि वाळूज महाराष्ट्र
औद्योगिक विकासमंडळ अर्थात एम आय डी सी मध्ये सहा महिन्यात प्राधान्यानं भूखंड उपलब्ध
करून दिले जातील, असं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं आहे. लघुउद्योजकांच्या
विविध प्रश्नांसंदर्भात मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते.
****
औरंगाबाद शहरात गेल्या शुक्रवारी उसळलेल्या दंगलीनंतर
बंद करण्यात आलेली मोबाईल इंटरनेट सेवा आज पुन्हा सुरु करण्यात आली आहे. याप्रकरणी
पोलिसांनी तीन हजार जणांवर गुन्हे नोंदवले आहेत.
****
औरंगाबाद इथं, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा
५८ वा दीक्षांत समारंभ आज होणार आहे. सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या समारंभात ज्येष्ठ
अणूशास्त्रज्ञ डॉ अनिल काकोडकर यांच्या हस्ते पीएच डी पदवी प्रमाणपत्रं प्रदान केली
जाणार आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातल्या निवडुंगे
इथं एका शिक्षकानं भावावरच गोळीबार केल्याची घटना घडली. पूर्वीच्या वादातून ही हत्या
करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. गोळीबार करणारा शिक्षक उद्धव मरकड आणि त्याच्या
पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.
****
आंतरराष्ट्रीय मानांकन असणाऱ्या वरिष्ठ गटाच्या राज्यस्तरीय
बुद्धिबळ स्पर्धेला कालपासून पुण्यात सुरुवात झाली. पहिल्या फेरीअखेर पुण्याचा केतन
खैरे, आर्यन शहा, नाशिकचा अखिलेश नागरे, हर्षल पाटील आणि हरीकेतन चितळे यांनी विजयी
सुरुवात केली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून १५१ खेळाडू सहभागी झाले असून, गोवा इथं होणाऱ्या
राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ यातून निवडला जाणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment