Sunday, 13 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 13.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 13 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

औरंगाबाद शहरात दोन दिवसांपूर्वी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्र्वभूमीवर परिस्थिती आता पूर्वपदावर येत आहे. शहरातल्या काही भागात तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात क्रांती चौक पोलिसांनी आज २५ जणांना अटक केली. या दंगलीवेळी पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडल्याचा आरोप असलेल्या १७ वर्षीय मुलावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी तसंच मोबाईल इंटरनेट सेवा अद्याप बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली.

****

विधान परिषदेच्या नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या आठ जून रोजी या मतदार संघासाठी मतदान होणार आहे. तर २२ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. गेल्या वेळी या मतदार संघातून अपूर्व हिरे हे अपक्ष निवडून आले होते, नंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. यंदा या मतदार संघासाठी भाजपनं अनिकेत पाटील यांना उमेदवारी दिली असून, शिक्षक मतदार संघाच्या वतीनं संदीप बेडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

****

काँग्रेस पक्षानं भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची उमेदवारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट काम करणार नाही या भीतीमुळं सोडल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. भाजपकडून निवडून आलेले नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेतकऱ्यांचे प्रश्र्न तसंच अन्य विविध मुद्यांवरून टीका करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळं रिक्त झालेल्या या जागेसाठी येत्या २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. पटोले ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी उत्सूक होते, मात्र काँग्रेसनं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडली आहे.

****

भारतरत्न लता मंगेशकर यांचा काल मुंबई इथं शंकराचार्य विद्यानरसिंह भारती स्वामी यांच्या हस्ते `स्वर माऊली` पदवी देऊन गौरव करण्यात आला. गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर तसंच भाऊ हृदयनाथ मंगेशकर यावेळी उपस्थित होते. कोल्हापूर करवीर मठाच्या शंकराचार्यांनी सन्मानित केल्यानं भारावल्याची भावना लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. प्रत्येक पुरस्कार मोठा असतो आणि त्यांचा स्वीकार प्रेमानं व्हायला हवा. हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. लता मंगेशकर यांना शंकराचार्यांनी यापूर्वी स्वरभारती पुरस्कारानं गौरवलं आहे.

****

हिमाचल प्रदेशमधल्या सिरमौर जिल्ह्यातल्या राजगढच्या नेई-नेती भागात आज सकाळी एक खासगी बस खोल दरीत कोसळल्यानं सात जणांचा मृत्यू झाला. ही बस मनवा इथून सोलनला चालली होती. अपघातातल्या बारा जखमींना सोलम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.   

****

जालना-राजूर रस्त्यावर तपोवन फाट्यावर जीप आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक ठार तर अन्य एकजण जखमी झाला. वऱ्हाड घेवून जाणारी जीप भोकरदनकडे जात असताना आज पहाटे हा अपघात झाला. जीपमधील काही प्रवासी जखमी झाल्याचं वृत्त आहे.

****

अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातल्या धामोरी फाटा इथं नगर-मनमाड महामार्गावर बिबट्याला अज्ञात वाहनानं दिलेल्या धडकेत तीन वर्षांचा बिबट्या जागीच ठार झाला. आज पहाटे हा अपघात झाला. पंचनामा करुन, मृत बिबट्या बारागाव नांदूर इथल्या वन खात्याच्या रोपवाटीकेत आणण्यात आला.

****

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या अनिश भानवालासह आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत देशाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांची दहावी आणि बारावीची स्वतंत्ररीत्या परीक्षा घेण्याचा निर्णय केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ-सीबीएसईनं घेतला आहे. हे सहा विद्यार्थी क्रिडा स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे परीक्षेला बसू शकले नव्हते, मात्र, त्यांच्यातल्या क्रीडा नैपुण्याला प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं मंडळानं हा निर्णय घेतला.

****

दक्षिण कोरियामधल्या तुंगहे इथं सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियन्स चषक महिला हॉकी स्पर्धेत आज भारतीय संघानं पहिल्या सामन्यात जपानचा चार - एक असा पराभव केला. भारताकडून नवनीत कौरनं तीन, तर अनुपा बारलानं एक गोल केला. भारतीय संघाचा दुसरा सामना येत्या बुधवारी चीन सोबत होणार आहे. भारतासह जपान, चीन, दक्षिण कोरिया, मेलशिया या देशांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

****

देशाच्या वायव्य भागात अनेक ठिकाणी जोरदार वादळ होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. नव्यानं निर्माण झालेल्या पश्चिमी क्षोभाच्या प्रभावामुळे हा परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातही येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची, तर काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 18 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...