Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 14 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
औरंगाबादमध्ये
गेल्या शुक्रवारी उसळलेल्या दंगलीवेळी दंगेखोरांसोबत काही पोलिस चालत असल्याचं दाखवणाऱ्या
कथित चित्रफित प्रकरणी चौकशी होणार आहे. समाज माध्यमांमध्ये अशी चित्रफित प्रसारित
झाल्यानं अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला. राज्याचे कायदा आणि सुव्यवस्था अतिरिक्त पोलिस
महासंचालक बिपीन बिहारी यांनी पीटीआयला या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, ज्यांच्याकडे
या चित्रफिती आहेत त्यांना त्या पोलिसांना देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यांची
सत्यता पडताळण्यात येणार असून त्यात पोलिस दोषी आढळल्यास योग्य कारवाई केली जाणार असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या
महामार्गासाठी आता शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेताना त्यांची सहमती अनिवार्य राहणार
नाही अशी तरतूद करणाऱ्या शासनाच्या आदेशाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
यांनी विरोध केला आहे. सरकारनं गेल्या आठवड्यात सात मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या
बैठकीत हा आदेश काढल्याबद्दल मुंडे यांनी आज ट्विटरवर त्याविरुद्ध टीका केली. शेतकऱ्यांच्या
सहमतीशिवाय त्यांची एक इंचही जमीन ताब्यात घेऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला
दिला आहे.
****
संपूर्ण
कर्जमुक्तीसह विविध आठ मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे आज राज्यव्यापी
सविनय जेलभरो सत्याग्रह करण्यात आला. धुळे जिल्ह्यातल्या साक्री आणि गरताड या दोन ठिकाणी
हजारो शेतकरी या जेलभरो आंदोलनात सहभागी झाले होते.
****
राज्यातली
पाण्याची परिस्थिती सुधारल्यानंतर शेतकरी आत्महत्या कमी होतील, असा विश्वास अभिनेता
आमीर खाननं व्यक्त केला आहे. आज नंदुरबार जिल्ह्यातल्या दहिंदुले आणि उमर्दे गावात
त्यांनी वॉटरकप स्पर्धेअंतर्गत श्रमदान केलं, त्यावेळी ते बोलत होते. अमिर खानसह पत्नी
किरण राव आणि अभिनेता रणबीर कपूर यावेळी उपस्थित होते.
****
अहमदनगरमधल्या
केडगाव दुहेरी हत्याकांडातला संशयित आरोपी भानुदास कोतकर याला पोलिसांनी आज पुण्यात
अटक केली. अशोक लांडे खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना कोतकर उपचारासाठी
जामीनावर बाहेर होता. केडगाव इथं सात एप्रिल रोजी शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर आणि
वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या झाली. या प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह
नऊ जणांना अटक झाली आहे.
****
केंद्रीय
अन्वेषण विभाग-सीबीआयनं आभुषणांचा अब्जाधीश व्यापारी नीरव मोदी याच्याविरुद्ध पंजाब
नॅशनल बँकेच्या अकरा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पहिलं आरोपपत्र दाखल केलं
आहे. मुंबईतील विशेष न्यायालयात देशातील या सर्वात मोठ्या आर्थिक घोटाळ्यासंदर्भात
हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं. बँकेच्या काही अधिकाऱ्यांची नावंही या आरोपपत्रात आहेत.
****
कर्नाटक
विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची उद्या मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजेपासून
मतमोजणीला सुरुवात होईल. विधानसभेच्या २२२ जागांसाठी परवा १२ तारखेला ७२ पूर्णांक ३६
टक्के मतदान झालं.
****
भारतीय
शाळा प्रमाणपत्र परीक्षा - आयसीएसईचा इयत्ता दहावीचा आणि भारतीय शाळा प्रमाणपत्र -
आयएससीचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत मुंबईचा स्वयम दास
९९ पूर्णांक चार टक्के गुण मिळवून पहिला आला. तर बारावीच्या परीक्षेत सात विद्यार्थ्यांनी
९९ पूर्णांक पाच टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला.
****
मराठवाडा
साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारे २०१८चे ग्रंथ पुरस्कार आज जाहीर झाले. नरेंद्र
मोहरीर वाङमय पुरस्कार डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्या ‘लक्षणीय असे काही’ या ग्रंथाला,
नरहर कुरुंदकर वाङमय पुरस्कार प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’
या कथासंग्रहाला, प्राचार्य म.भि.चिटणीस वाङमय पुरस्कार डॉ.कैलास इंगळे यांच्या ‘वाङमयीन
मराठवाडा’ या ग्रंथाला, कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार डॉ.पी विठ्ठल यांच्या ‘एक शून्य
मी’ या कवितासंग्रहाला, बी रघुनाथ कथा/कांदबरी पुरस्कार कृष्णात खोत यांच्या ‘रिंगाण’
या कादंबरीला, कुमार देशमुख नाट्य पुरस्कार राजीव नाईक यांच्या ‘लागलेली नाटकं’ या
पुस्तकाला, तर रा.ज.देशमुख स्मृति पुरस्कार नांदेडच्या निर्मल प्रकाशनचे प्रवर्तक निर्मलकुमाल
सूर्यवंशी यांना जाहीर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या पुरस्कारांची
घोषणा केली.
****
हिंगोली
शहरात गांधी चौक भागातल्या कस्तुरी कापड दुकानास पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागली.
दुकानातलं साहित्य पूर्णपणे खाक झालं असून, इमारतही क्षतीग्रस्त झाली आहे.
****
येत्या
दोन दिवसात राज्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची
शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची
लाट येण्याची शक्यता असल्याचंही वेधशाळेनं म्हटलं आहे.
****
No comments:
Post a Comment