Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 4 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
सध्याच्या
सरकारनं मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष केंद्रीत केलं असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज जालना इथं मुंबईतल्या रसायन तंत्रज्ञान संस्था-आयसीटीच्या
मराठवाड्यातल्या उपकेंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. सिरसवाडी शिवारात हे उपकेंद्र
उभारलं जाणार आहे. या संस्थेमुळे कुशल मनुष्यबळ निर्मितीला चालना मिळेल, तसंच मराठवाड्यातल्या
उद्योगांना मदत होईल असं ते म्हणाले. या संस्थेमुळे शेती, ग्रामविकास, शहर विकास आणि
आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीमधील प्रयोगशीलता मिळेल असंही त्यांनी नमूद केलं. देशातला
सर्वोत्कृष्ट उद्योग पार्क हा शेंद्रा इथं होत असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, येत्या
पाच वर्षात औरंगाबाद आणि जालना राज्याच्या विकासाचं केंद्र बनेल असा विश्वास व्यक्त
केला.
जालना
इथं देवगिरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीचं उद्घाटनही आज मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं. राज्याच्या प्रगतीत वित्तीय संस्थांचा मोलाचा वाटा असून, नागरिकांच्या
आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या संस्था महत्वाची भूमिका बजावत असल्याचं मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले.
****
राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना आज जामीन मंजूर करण्यात आला
आहे. मुंबई उच्च न्यायालयानं भुजबळ यांना पाच लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
केला. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून ते तुरुंगात होते. भुजबळ यांनी
दोन एप्रिल रोजी पुन्हा एकदा न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर
काल सुनावणी पूर्ण झाली. १४ मार्च २०१६ रोजी त्यांना अटक करण्यात आली होती.
****
एक
अधिकारी, एक राज्य आणि एक सरकारी घर या नियमानुसार सरकारी योजनेतून घर देण्यासाठी नियमात
बदल करणार असल्याची माहिती राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. सरकारी योजनांमध्ये
एकापेक्षा अधिक घरं देण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी याचिका दाखल
केली आहे. यावर आज झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं, पदाचा गैरवापर करुन एकापेक्षा
अधिक सरकारी घरं मिळवणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता स्वत:च्या नावावर
सरकारी योजनेतून एक घर असताना, कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला दुसरं घरं कोणत्याही सरकारी
योजनेतून मिळणार नाही, अशी नियमावली लवकरच तयार करणार असल्याचं महाधिवक्त्ता आशुतोष
कुंभकोणी यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ
रंगकर्मी दिलीप कोल्हटकर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक
कार्यमंत्री विनोद तावडे यांनी शोक व्यक्त केला आहे. कोल्हटकर यांच्या निधनानं आपण
एक प्रतिभासंपन्न दिग्दर्शक आणि अभिनेता गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांना
श्रद्धांजली अर्पण केली, तर कोल्हटकर यांच्या निधनानं रंगभूमीवर मुशाफिरी करणारा दिग्दर्शक
गमावला असल्याची भावना तावडे यांनी व्यक्त केली. कोल्हटकर यांचं आज सकाळी पुण्यात निधन
झालं, ते ७२ वर्षांचे होते.
****
अहमदनगर
जिल्ह्यातल्या जामखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या प्रकरणातला
मुख्य आरोपी गोविंद गायकवाड याला जिल्हा आणि सत्र न्यायालयानं सात दिवसांची पोलिस कोठडी
सुनावली आहे. याप्रकरणी आणखी एका अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली आहे. जामखेड इथं
गेल्या महिन्यात योगेश आणि राकेश राळेभात यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
****
परभणीचे
जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी
म्हणून त्यांची ओळख असून, त्यांची बदली रद्द करण्याची मागणी सामान्य जनता तसंच काही
सामाजिक संघटनांनी केली होती. शिवशंकर यांची नाशिकला बदली करण्यात आली होती.
****
ग्राम
स्वराज अभियानांतर्गत राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील विविध योजना ग्रामीण
भागातल्या लोकांपर्यंत पोहचवाव्यात, असे निर्देश ग्राम स्वराज अभियानातले केंद्रीय
पथकाचे निरीक्षक सुब्रमण्यम रेड्डी यांनी दिले आहेत. नांदेड इथं या अभियानांतर्गत संबंधित
विभागांनी राबवलेल्या उपक्रमाचा आढावा घेताना ते बोलत होते. उद्या या अभियानाचा समारोप
होत आहे. नांदेड जिल्ह्यात राबवलेल्या या कार्यक्रमाबाबत रेड्डी यांनी समाधान व्यक्त
केलं असून, याबाबतचा संकलीत अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येत असल्याची माहिती
त्यांनी दिली.
****
दक्षिण
मध्य रेल्वेनं उन्हाळी सुट्टीनिमित्त नांदेड ते हजरत निजामुद्दीन दिल्लीला जाणाऱ्या
विशेष रेल्वे गाडीच्या २४ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दर गुरुवारी
नांदेडहून निघते, तर परतीच्या प्रवासात दर शनिवारी दिल्लीहून निघते. मे, जून आणि जुलै
महिन्यात या फेऱ्या वाढवण्यात आल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं
कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment