Tuesday, 8 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 08.05.2018 - 17.25


 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 8 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ८ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

दूध भुकटी उत्पादनाला चालना देण्यासाठी दूध भुकटी उत्पादकांना दूध खरेदीसाठी प्रतिलीटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, खासगी दूध उत्पादक तसंच सहकारी दूध भुकटी उत्पादक संघांना हे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन निर्णय जारी केल्यापासून तीन दिवसांसाठी हा निर्णय लागू असेल.

राज्य महामार्ग अधिनियमातल्या भूसंपादनविषयक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळानं आजच्या बैठकीत मान्यता दिली.

जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव इथं वरिष्ठ स्तराचं दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला. अकोला जिल्ह्यात अकोट इथंही वरिष्ठ स्तराचं दिवाणी न्यायालय स्थापन करण्यासह पदनिर्मिती करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

****

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. श्रीनिवास वनगा हे भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र आहेत. श्रीनिवास वनगा यांनी आपल्या कुटुंबासह नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.  

काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गावित यांना पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता असून, याबाबत अधिकृत घोषणा आज रात्री होण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिले. 

काँग्रेस पक्षाकडून दामू शिंगडा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे. पालघर पोटनिवडणुकीसाठी येत्या २८ मे रोजी मतदान होणार असून, ३० मे रोजी मतमोजणी होणार आहे.

****

भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं हेमंत पटले यांना उमेदवारी दिली असून, ते उद्या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. पटले हे भाजपचे गोंदिया जिल्हा अध्यक्ष आहेत.

****

जालना जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील इंटरचेंज पाँइंट जामवाडी परिसरात व्हावा या मागणीसाठी जामवाडी, पानशेंद्रा, श्रीकृष्णनगर इथल्या शेतकऱ्यांनी आज जालना-देऊळगावराजा मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीचं निवेदन स्वीकारलं. या आंदोलनामुळे या मार्गावरची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

****

सोलापूर इथल्या उजनी धरणातून कालव्याद्वारे आज पहाटे ४०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात आलं. सध्या भीमा नदीकाठच्या शेतीला पाण्याची गरज असल्याचं हे पाणी सोडण्यात आलं आहे. उजनी धरणात सध्या १४ पूर्णांक ९९ टक्के पाणी शिल्लक आहे. शेतीसाठी पाणी सोडल्यानं शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

दक्षिण मध्य रेल्वेनं उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता नांदेडहून विविध भागात जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेडहून दिल्लीला जाणाऱ्या गाडीच्या २४ फेऱ्या, पुणे आणि पनवेलला जाणाऱ्या गाडीच्या २६ फेऱ्या, तर नांदेड इथून जबलपूर आणि सिकंदराबादला जाणाऱ्या गाडीच्या १७ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

****

पावसाळ्याच्या काळात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याचा सक्षमपणे सामना करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्याचे निर्देश बीडचे जिल्हाधिकारी एम डी सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिले आहेत. बीड इथं आज पावसाळा पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी संभाव्य जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी, असंही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं.

****

भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र - आयसीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल आणि भारतीय शाळा प्रमाणपत्र - आयएससीचा इयत्ता बारावीचा निकाल येत्या १४ मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी तीन वाजता निकाल जाहीर होणार असून, विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर किंवा एसएमएसद्वारे निकाल पाहता येणार आहे.

****

दहावी परीक्षेत नियमबाह्य पद्धतीनं विद्यार्थी बसवल्याप्रकरणी, हिंगोली जिल्ह्यातल्या दोन शाळा मुख्याध्यापक तसंच शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अशा नऊ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेनगाव तालुक्यात कापडसिनगी इथं हा प्रकार घडला होता.

****

जालना इथं औरंगाबाद चौफुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन दुचाकींची धडक होवून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. आज दुपारी हा अपघात झाला. शेख अजहर शेख अस्लम, असं अपघातात ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.06.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 24 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...