Friday, 13 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.09.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१३  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथून सुरूवात होत आहे. माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनामुळे अहमदनगर शहर आणि जिल्ह्याच्या उत्तर भागातल्या या यात्रेच्या सभा रद्द करण्यात आल्या होत्या. आता अहमदनगर शहरासह अकोले, संगमनेर, राहुरी, श्रीगोंदा इथं या यात्रेदरम्यान सभा होणार आहेत.
****
दहा दिवसांच्या उत्सवानंतर राज्यात काल सर्वत्र गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. मात्र मुंबई, आणि पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सकाळपर्यंत सुरू होत्या. राज्यात यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल दिसून आला. शेकडो नागरिकांनी आपल्या घरात किंवा अंगणातच मूर्तींचं विसर्जन केलं.
****
दरम्यान, गणेश विसर्जनादरम्यान राज्यभरात २४ जण बुडाल्याच्या घटना घडल्या. मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळ इथंही गणेश विसर्जनादरम्यान नाव उलटून १३ जण तलावात बुडाले, यापैकी अकरा भाविकांचा बुडून मृत्यू झाला.
****
पुणे - बंगळूर महामार्गावर सातारा जवळच्या लिंब खिंड परिसरात काल पहाटे झालेल्या खाजगी बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला, तर वीस जण जखमी झाले. अपघातग्रस्त बस मुंबईहून बेळगावकडे जात होती.
****
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड जवळ पर्लकोटा नदीला पूर आला असून, भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. या पावसाळ्यात भामरागड तालुक्याचा संपर्क तुटण्याची ही सातवी वेळ आहे. आपत्ती प्रतिसाद दलासह दहा वैद्यकीय अधिकारी आणि तीस आरोग्य सेवकांचं वैद्यकीय पथक भामरागडला पाठवण्यात आलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात सध्या छत्तीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणाची पाणी साठा शहाण्णव पूर्णांक सदतीस टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ९०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...