Friday, 13 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13  September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ सप्टेंबर २०१ दुपारी .०० वा.
****
२०१८ च्या अनुसूचित जाती जमाती संरक्षण ॲट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्र सरकारनं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं तीन सदस्यीय पीठाकडे पाठवली आहे. पुढच्या आठवड्यात ही याचिका तीन सदस्यीय पीठासमोर ठेवली जाईल. गेल्या एक मे रोजी सर्वोच्च न्यायालयानं, या याचिकेवरचा निर्णय राखीव ठेवला होता. या कायद्याचा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात होणारा कथित गैरवापर थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं, या प्रकरणी तत्काळ अटक करण्यास प्रतिबंध घातला होता. याच निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी सरकारनं याचिका दाखल केली आहे.
****
बाबरी मशीद ध्वस्त प्रकरणाची सुनावणी होत असलेल्या विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. या खटल्याची सुनावणी निकालापर्यंत पोहोचेपर्यंत या न्यायाधीशांना मुदतवाढ देण्यात आल्याचं, उत्तर प्रदेश सरकारचे वकील एैश्वर्य भाटी यांनी न्यायालयाला सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह अनेक जणांविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे.
****
अकोले हा बेघर मुक्त तालुका तयार करणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज अहमदनगर जिल्ह्यात अकोले इथं, महाजनादेश यात्रेदरम्यान जाहीर सभेत बोलत होते. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. या यात्रेदरम्यान अहमदनगर शहरासह संगमनेर, राहुरी, श्रीगोंदा इथंही सभा होणार आहेत.
****
जालना जिल्ह्यात अंबड इथं विनापरवानगी पुतळा बसवल्याप्रकरणी भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यासह ४४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्र राज्य पुतळा पावित्र्यभंग प्रतिबंध अधिनियमान्वये आमदार कुचे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड इथं पाचोड चौकात आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विनापरवानगी बसवण्यात आला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, अंबड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात यावा, असा ठराव मंजूर करण्यात आला होता, जनतेची खूप दिवसांची मागणी आज पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया, आमदार कुचे यांनी दिल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव इथल्या बाजारपेठेत आज सकाळी कांद्याच्या भावात क्विंटलमागे साडे तीनशे रुपयांची वाढ झाली असून, कमाल कांदा भाव तीन हजार एकशे पन्नास रूपये जाहीर झाला. बुधवारच्या तुलनेत आज कांदा भावात तेजी आली आहे. त्यामुळे विक्रेत्यांनी कांदा टप्प्या टप्यानं बाजारात विक्रीस आणावा असं आवाहन, बाजार समितीनं केलं आहे.
****
राज्य शासनानं महिला बचत गटांना २०० कोटी रुपयांच खेळतं भांडवल देण्यास मान्यता दिली आहे. यामुळे बचत गटांमार्फत स्वयंरोजगारासाठी सुरु करण्यात आलेल्या विविध उपक्रमांना मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य होणार असल्याचं,जिल्हा माहिती कार्यालयानं कळवलं आहे. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी बचत गटातल्या १ लाख १४ हजार महिलांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षणही देण्यात आलं आहे.
****
वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यात पेन टाकळी प्रकल्प भरला असून या प्रकल्पातून पैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. पैनगंगा नदीवर असलेल्या १२ बंधाऱ्यांपैकी जुमडा बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले असल्य़ाचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड जवळ पर्लकोटा नदीला पूर आला असून, भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. या पावसाळ्यात भामरागड तालुक्याचा संपर्क तुटण्याची ही सातवी वेळ आहे. आपत्ती प्रतिसाद दलासह दहा वैद्यकीय अधिकारी आणि तीस आरोग्य सेवकांचं वैद्यकीय पथक भामरागडला पाठवण्यात आलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात सध्या छत्तीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचा पाणी साठा शहाण्णव पूर्णांक सदतीस टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाच्या उजव्या कालव्यातून ९०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. याशिवाय जायकवाडी धरणातून अद्याप विसर्ग करण्यात येत नसल्याचं, संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे
****
व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मा यानं पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल सौरभनं तिसऱ्या टप्प्यात जपानच्या यू इगार्शी याला २५-२३, २४-२२ अशा फरकानं हरवलं.
****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 22.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 22 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...