आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१५ सप्टेंबर
२०१९ सकाळी ११.००
वाजता
****
वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये
गैरव्यवहार टाळण्यासाठी जानेवारी २०२० पासून नवीन विक्रेत्यांसाठी आधारकार्डाचं प्रमाणीकरण,
तसंच प्रत्यक्ष सत्यता पडताळणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वस्तू आणि
सेवाकर यंत्रणेचे प्रमुख सुशील कुमार मोदी यांनी बेंगळुरू इथं प्रसारमाध्यमांशी बोलताना
ही माहिती दिली. यापूर्वी ही पडताळणी करणं ऐच्छिक होतं, मात्र गेल्या दोन वर्षात बनावट
चलनांची वाढती संख्या बघता हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. ज्यांना आधार प्रमाणीकरण
करायचं नसेल, त्यांच्यासाठी प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल, ही प्रक्रिया ३ वर्षात
पूर्ण होईल, असंही ते म्हणाले.
****
जम्मू-कश्मीरमधे राजधानी श्रीनगरसह खोऱ्यात कालपासून बहुतांश
निर्बंध उठवण्यात आले आहेत. या नंतरच्या काळात अद्याप कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचं
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. कुपवाडा आणि हंदवाडा जिल्ह्यात दूरध्वनी सेवेवरचे
निर्बंध उठवण्यात आले असून, इतरत्र ब्रॉडबँड इंटरनेट आणि मोबाईलवरचे निर्बंध मात्र
कायम आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या
सर्व न्यायालयांत काल राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या अदालतीत तीन
हजार ८३ प्रकरणं निकाली काढली गेली. यामध्ये दिवाणी, फौजदारी आणि अन्य प्रकरणांमध्ये
आठ कोटी १५ लाख रुपयांची तडजोड प्रकरणं निकाली काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
भारताचा बॅडमिंटनपटू
लक्ष्य सेन यानं डेन्मार्कच्या द्वितीय मानांकित व्हिक्टर स्वेंडसेन याचा पराभव करून
बेल्जियन आंतरराष्ट्रीय आव्हान स्पर्धेतलं पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. १८ वर्षांच्या
लक्ष्यने व्हिक्टरचा २१-१४, २१-१५ असा पराभव केला.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका
यांच्यातली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आजपासून सुरू होत आहे. हिमाचल प्रदेशातल्या
धरमशाला इथं संध्याकाळी सात वाजता पहिला सामना सुरू होईल. आकाशवाणीवरुन हिंदी आणि इंग्रजी
भाषेमध्ये सामन्यांचं धावतं समालोचन प्रसारित होईल.
दरम्यान आयसीसी टी-ट्वेंटी मानांकनात भारताचं स्थान दक्षिण आफ्रिकेच्या
खाली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment