Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 15
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
निर्यात आणि गृहनिर्माण क्षेत्रासाठी केंद्र सरकारनं
सुचवलेल्या उपाय योजनांचं उद्योग क्षेत्रानं स्वागत केलं आहे. अर्थमंत्र्यांनी सुचवलेले
उपाय अर्थव्यवस्थेला चालना देणार असल्याचं भारतीय उद्योग महासंघाचे सरसंचालक चंद्रजीत
बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. आसोचेमचे अध्यक्ष बी. के. गोएंका यांनी, या उपाययोजनांमुळे
निर्यातीला मदत होणार असून, भविष्यात भारतीय निर्यातदार जागतिक स्तराच्या दर्जाचे होतील,
असं मत व्यक्त केलं आहे.
निर्यातक्षम वाणिज्यिक वस्तूंच्या शुल्क आणि करांमध्ये
सूट, निर्यातदारांना ५० हजार कोटी रुपयांपर्यंत प्रोत्साहन अशा अनेक उपाययोजना सरकारनं
केल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं
होतं. जीएसटीमधे जमा झालेला कर परतावा स्वयंचलित असेल, या महिन्याच्या शेवटी तो लागू
केला जाईल, असं सांगतानाच, निर्यातदारांसाठी प्राथमिक क्षेत्र कर्ज प्रणालीत ३६ हजार
कोटी ते ६८ हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आल्याचं त्या म्हणाल्या होत्या.
****
थोर अभियंते सर मोक्षगुंडम् विश्वेश्वरैय्या यांची
जयंती अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते. आज देशभर साजऱ्या होत असलेल्या अभियंता
दिनानिमित्त उपराष्ट्रपति एम. वैंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सर्व अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. स्वतंत्र
भारताच्या पायाभरणीत विश्वेश्वरैया यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ असल्याचे उद्गार
उपराष्ट्र्पती नायडू आणि पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे.
****
गंगा नदीच्या स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी
आज नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू मैदानात ग्रेट गंगा रन-२०१९ या मॅरेथॉनचं आयोजन करण्यात
आलं होतं. केंद्रीय जलशक्ती आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी या मॅरेथॉनला हिरवा
झेंडा दाखवला. सर्व वयोगटातल्या लोकांनी यात सहभाग घेतला.
****
दैनंदिन व्यवहारात राष्ट्रभाषा हिंदीचा प्रभावी वापर
केल्याबद्दल राज्यातल्या आठ केंद्रीय संस्थांना काल नवी दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री
अमित शाह यांच्या हस्ते हिंदी राजभाषा पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
हिंदी भाषा दिनाचं औचित्य साधून वर्ष 2018-19 च्या
राजभाषा किर्ती पुरस्कार, तसंच राजभाषा गौरव पुरस्कारांचं यावेळी वितरण करण्यात आलं.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातल्या ग्यारापत्ती
जंगलात आज पहाटे झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकातील जवानांनी दोन नक्षलवाद्यांना
ठार केलं. कालपासून या जंगलात पोलिसांचं नक्षलविरोधी अभियान सुरू होतं.
यादरम्यान, आज पहाटे एका
ठिकाणी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल
पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघे मारले गेले, तर इतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार
झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्या दोघांचे मृतदेह आणि काही साहित्य ताब्यात
घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या नेत्तृत्वाखाली सुरू असलेली भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज
सातारा जिल्ह्यात जाणार आहे. या यात्रेदरम्यान वाई इथं स्वागत सभा होणार असून, त्यानंतर
दुपारी साडे तीन वाजता सातारा इथं पहिली, तर कराड इथं दुसरी सभा होणार आहे. ही यात्रा
वाई, कोरेगाव, सातारा, कराड उत्तर आणि कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघांतून जाणार
असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पोलिस
दलानं पूर्वतयारी सुरू केली आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या समाजकंटकांची यादी तयार करण्यात
येत असून, बंदोबस्तासाठी तैनात करण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं देखील निश्चित
करण्यात येत आहेत. मुंबई पोलिसांव्यतिरिक्त निमलष्करी दलांनाही सुरक्षेसाठी बोलावण्यात
येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
****
अमरावती इथल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या
वतीनं काल सीताफळ संशोधन केंद्राचा कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात
आला. सीताफळ हे पीक कोरडवाहू क्षेत्राला तारून नेणारं असल्यानं या केंद्रानं सीताफळाच्या
विविध वाणांवर संशोधनासह प्रक्रिया, साठवणूक आणि विपणनासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन
बोंडे यांनी यावेळी केलं. देशातल्या सीताफळ उत्पादनापैकी ३१ टक्के उत्पादन महाराष्ट्रातच
होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
मुंबई, ठाण्यासह पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून
पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या मुळे वसई, पालघर आणि भिवंडीसह अनेक भागांत पुन्हा
पाणी तुंबल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं
बदलापूर गावाकडे जाणारा ब्रिटिशकालीन छोटा पूल पाण्याखाली गेल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
दरम्यान, अकोला जिल्ह्यातही पावसामुळे मन नदीचं पात्र
फुगलं आहे. लोहारा येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे अकोट-देवरी-शेगाव मार्ग वाहतुकीसाठी
बंद झाल्याचं वृत्त आहे.
*****
***
No comments:
Post a Comment