Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date –16 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ सप्टेंबर २०१९ सायंकाळी
६.००
****
हैदराबाद
मुक्तीसंग्राम दिन उद्या सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. मराठवाड्यात
आठही जिल्ह्यात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण
समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता महापालिकेच्या सिद्धार्थ
उद्यानातल्या स्मृती स्तंभाजवळ होणार आहे. शहरातल्या औरंगपुरा इथं उभारण्यात आलेल्या
महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते उद्या सकाळी आठ वाजता होणार आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयुक्त
सुनील अरोरा उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते प्रशासकीय
तसंच पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन, निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेणार आहेत. येत्या
नऊ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होत असून, त्यापूर्वी नवीन विधानसभा स्थापन
होणं आवश्यक आहे. आयोगाच्या या दौऱ्यानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची
शक्यता वर्तवली जात आहे.
****
विधानसभेची आगामी निवडणूक काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षासोबत
आघाडी करून लढवणार असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी
सांगितलं आहे. ते आज नाशिक इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यातल्या २८८ जागांपैकी काँग्रेस
आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १२५ जागांवर निवडणूक लढवणार असून, उर्वरित ३८ जागा
मित्रपक्षाला सोडणार असल्याचं पवार यांनी सांगितलं. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी
काँग्रेस पक्ष नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं, पवार म्हणाले. गेल्या वेळी दोन्ही
पक्षांनी विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवली होती, त्यावेळी काँग्रेसनं ४२ तर राष्ट्रवादी
काँग्रेसनं ४१ जागांवर विजय मिळवला होता.
****
कृष्णा खोऱ्यातलं अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाडा
आणि दुष्काळी भागात नेण्याच्या प्रस्तावाला जागतिक बँकेने मंजुरी दिली असल्याची माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. भारतीय
जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज सांगली जिल्ह्यात दाखल झाली. पलूस इथल्या सभेत बोलतांना
मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, इस्लामपूर-ताकारी रस्त्यावर स्वाभिमानी
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर
कडकनाथ कोंबड्या फेकल्या. कडकनाथ कोंबडी घोटाळ्याची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी
या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं.
****
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माजी खासदार राजू
शेट्टी यांच्या नेतृत्वात आज औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयावर ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’
काढण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान निदर्शनं
करणाऱ्या शेतकऱ्यांना दडपशाहीच्या मार्गानं रोखण्यात येत असल्याचा निषेध यावेळी करण्यात
आला. शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करण्यात यावा, मागील वर्षातल्या खरीप आणि रब्बीच्या
पीकविम्याचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे, शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज द्या
तसंच शेतमुजराच्या हाताला काम आणि राशन देण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांचं निवेदन
यावेळी प्रशासनाला सादर करण्यात आलं.
****
माजी मंत्री बी. जे. खताळ यांच्या निधनाने तत्त्वांशी
प्रामाणिक राहून राजकारण करणारा एक ज्येष्ठ नेता आपण गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी खताळ यांना श्रद्धांजली वाहिली. खताळ यांच्या पार्थिव देहावर
आज सायंकाळी अंत्यसंस्कार होत आहेत. आज पहाटे संगमनेर इथं खताळ यांचं निधन झालं, ते एकशे
एक वर्षांचे होते
****
संभाजी ब्रिगेडनं विधानसभा निवडणुकीसाठी
१४ उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर केली. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून रमेश गायकवाड,
देगलूर बिलोली मतदार संघातून सूर्यकांत चंद्रे, लोहा कंधार मतदार संघातून सुभाष कोल्हे,
माजलगाव छत्रभूज देशमुख, परळी गोविंद पोतंगले तर औसा मतदार संघातून अभिमन्यू शेषराव
पवार यांना संभाजी ब्रिगेडने उमेदवारी जाहीर केली आहे.
****
वस्तू आणि सेवा कर कायद्यांतर्गत २२८ पैकी
१९३ वस्तूंवरचा कर २८ टक्क्यांहून १८ टक्के करण्यात आला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी ही माहिती दिली. ते आज मुंबईत बोलत होते. करकपातीमुळे कर अनुपालनात वाढ होऊन
महसूल वृद्धी होईल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
****
परभणी शहर आणि परिसरात आज दुपारी साडे
तीन वाजेच्या सुमारास दमदार पाऊस झाला. जवळपास अर्धातास झालेल्या या पावसामुळे सखल
भागात पाणी साचलं.
****
No comments:
Post a Comment