Sunday, 17 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.11.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 November 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ नोव्हेंबर २०१९ सायंकाळी ६.००
****

 संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात, सर्व पक्षांनी मागील अधिवेशनाप्रमाणेच, सहकार्य करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आज नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. नियमांनुसार सर्व विषयांवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.

 सरकार देत असलेलं सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याचं आश्वासन कधीच पूर्ण होत नसल्याचा मुद्दा संसदेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीत उपस्थित केला. तसंच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांना संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्याची परवानगी देण्याची मागणीही विरोधी पक्षांनी सरकारकडे केली. तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली. या बैठकीला विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.
****

 महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर संभाव्य युतीबाबत चर्चा करण्यासंदर्भात कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात दिल्लीत होणारी बैठक उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. शरद पवार यांनी आज संध्याकाळी पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या गाभा समितीची बैठक बोलवली असून, यात संभाव्य आघाडी सरकारमधील मंत्रीपदाच्या वाटपावर चर्चा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर १२ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
****

 जम्मू-काश्मीरमध्ये आज पाकिस्तानी सैन्यानं भारतीय सैन्याच्या चौक्यांवर हातगोळ्यांचा मारा करत युद्धबंदीचं उल्लंघन केलं. प्रत्त्युतरादाखल भारतीय सैन्यानंही जोरदार गोळीबार केला. नियंत्रण रेषेजवळ शहापूर आणि पूंछ भागात घडलेल्या या घटनेत जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
****

 हिंदुत्त्वाच्या मुद्यावर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं एकमत होणं अशक्य असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. जालना इथं आज झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. शिवसेनेचे, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न टिकणारे नसल्याचं ते म्हणाले.
****

 औरंगाबाद जिल्हा ग्रंथालय संघाचं वार्षिक अधिवेशन आज टिळकनगर इथं ज्ञानसागर वाचनालयात पार पडलं. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचे संचालक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या हस्ते अधिवेशनाचं उदघाटन झालं.  यावेळी अक्ष्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रल्हाद लुलेकर हे होते.
****

 मराठवाड्यातील १३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकांची गरज आहे. त्या उपलब्ध करुन देण्यासाठी १३ कोटी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य आणि आरोग्य विषयक समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक बेलखोडे यांनी केली आहे. मंडळाच्या अपर आयुक्तांकडे त्यांनी याबाबतचं निवेदन दिलं आहे.
****

 हैदराबाद मुक्तिसंग्रामातले स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार अनंत भालेराव यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. यानिमित्त ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना अनंत भालेराव स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. मराठवाठा साहित्य परिषदेच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा समारंभ काही वेळातच सुरू होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन अनंत भालेराव प्रतिष्ठाननं केलं आहे.
****

 उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथं झालेल्या ६५ व्या शालेय राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारतीय खेळ प्राधिकरणाच्या औरंगाबाद केंद्राच्या खेळाडू सिद्धी आणि रिद्धी हत्तेकर यांनी सुवर्णपदकं पटकावली. या स्पर्धेत औरंगाबाद साई केंद्राच्या ५ खेळाडूंनी १० पदकांची कमाई केली. रिद्धी आणि सिद्धी या दोघींचीही सलग तिसऱ्या वर्षी 'खेलो इंडिया' स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
*****
***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...