Sunday, 17 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.11.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 November 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -१७ नोव्हेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही सभागृहांत कामकाज सुरळीत सुरू व्हावं, यासाठी सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला नवी दिल्ली इथं सुरवात झाली आहे. यात गृहमंत्री अमित शहा, संसदीय कार्यमंत्री प्रह्लाद जोशी, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा, तृणमूल कॉंग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय आणि देरेक ओ. ब्रायन, बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्रा, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, द्रमुक पक्षाचे टी. आर. बालू आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुक पक्षाचे नवनीत कृष्णन सहभागी झाले आहेत.
संसदेचं हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
राज्यात १९ ते २५ नोव्हेंबर या काळात कौमी एकता सप्ताह साजरा करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं दिल्या आहेत. त्यानुसार राष्ट्रीय एकता दिवस, अल्पसंख्याक कल्याण दिवस, भाषिक सुसंवाद दिवस, ध्वजदिन, दुर्बल घटक दिवस, सांस्कृतिक एकता दिवस, महिला दिन, जोपासना दिवस साजरे करण्यात येणार आहेत. मंगळवारी विविध कार्यालयांत राष्ट्रीय एकात्मता शपथ दिली जाणार असून, एकात्मता संदेश देणारे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या सप्ताहात दुर्बल घटक व्यक्तींना इंदिरा आवास, तसंच इतर योजनांतील घरांचं वाटप, भूमिहीन मजूरांना शेतजमीन वाटप करण्यात येणार आहे. गरिबांना कायदेविषयक सहाय्य, चर्चा, सभा, संमेलन, मिरवणुका काढणे अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यातला महापूर, अतिवृष्टी आणि लोकसभा-विधानसभा निवडणुकीमुळे लांबणीवर पडलेल्या, सहकारी संस्थांच्या निवडणुका आता टप्याटप्यानं घेण्यात येणार आहेत. कमीत कमी खर्चात आणि जलद गतीनं या निवडणुका होण्यासाठी, मतदान यंत्रांच्या वापराचे प्रयत्न सुरू असल्याचं महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. सहकारी संस्थांच्या निवडणुकांची पात्र मतदार यादी संकेतस्थळावरही टाकणार असल्याचं पाटील यांनी नमूद केलं.
****
सोलापूरहून अक्कलकोटकडे जाणारी चारचाकी आणि त्याच दिशेनं येणाऱ्या ट्रकची धडक झाल्यानं चारचाकीतल्या तीन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी जखमीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. मृतांची ओळख अद्याप पटली नसल्याचंही आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबाद शहरात पुढील आठवड्यात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेच्या जनजागृती निमित्त आज सकाळी शहरातून समता वाहन फेरी काढण्यात आली. भडकलगेट पासून सुरु झालेल्या, शहरभर जाणाऱ्या या फेरीचा मिलकॉर्नर मार्गे नागसेनवन इथं दुपारी समारोप होणार आहे.
२२, २३ आणि २४ नोव्हेंबरला नागसेनवनात होणाऱ्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत देश विदेशातील उपासक सहभागी होणार असून, धम्मगुरु दलाई लामा यांची धम्मदेसना हे या परिषदेचं मुख्य आकर्षण असणार आहे.
****
सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. एक लाख सत्तर हजार शेतकऱ्यांचं एक लाख चार हजार ४४१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालं आहे. त्याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनानं राज्य सरकारकडे पाठवला आहे. कृषी विभाग आणि प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यात ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याच स्पष्ट झालं आहे.
****
औरंगाबाद इथं सुरू असलेल्या 'डायमंड कप इंडिया' या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेला काल सायंकाळी सुरवात झाली. पहिल्याच दिवशी महिलांच्या फिजिकल प्रकारात मुंबईच्या हर्षदा पवार हिनं आपल्या कारकिर्दीतलं पहिलं आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक मिळविलं. तसंच, दीपा सप्रे हिनं रौप्य आणि श्रद्धा आनंदनं कांस्यपदक पटकावलं. पुरुष गटात जेहान मिझामी मोहम्मद आणि पंढरीनाथ पाटील यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली.
विभागीय क्रिडा संकुलावर सुरू असलेल्या या स्पर्धेचा आज सायंकाळी समारोप होणार आहे. त्यानंतर लगेचच विजेत्यांना पारितोषिक वितरण केलं जाणार असल्याचं इंडियन बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिटनेस फेडरेशनच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
****


No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 02.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 02 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...