Tuesday, 17 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 17.10.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 OCT. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.

****

सातवा वेतन आयोगाच्या मागणी साठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. इंटक आणि महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेसह चार संघटनांनी या संपात सहभाग घेतला आहे. सर्वच स्थानकांमध्ये बस जागेवरच उभ्या असून, दिवाळीसाठी गावी निघालेल्या प्रवाशांचा त्यामुळे खोळंबा होत आहे.

मराठवाडा, विदर्भ आणि पुणे मुंबईला जोडणाऱ्या अहमदनगर इथंही संपामुळे बससेवा ठप्प आहे. धुळे, नाशिक, पुणे, रत्नागिरी इथल्या बस स्थानकांवर प्रवासी काल रात्रीपासून ताटकळत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीडसह बहुतेक सर्वच ठिकाणी बस वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

राज्यातल्या १८ जिल्ह्यातल्या तीन हजार ६६६ ग्राम पंचायतींसाठी काल झालेल्या मतदानाची आज मोजणी होत आहे. काही ठिकाणचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी तालुक्यात शिवसेना आघाडीवर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. तर पंढरपूर तालुक्यातल्या १० ग्रामपंचायतींमध्ये आमदार परिचारक गटाचं वर्चस्व दिसून येत आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, आणि शिवसेनेने आपापल्या जागा राखल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

नाशिक इथं सार्वजनिक बांधकाम खात्याच्या तीन लाचखोर अभियंत्यांच्या घर झडतीत सुमारे २३ लाख रुपयांची मिळकत आढळून आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या वतीनं ही माहिती देण्यात आली. गेल्या शुक्रवारी एका ठेकेदारकडे रस्ता दुरुस्तीचं देयक देण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी करून, त्यापैकी तीन लाख रुपयांची लाच घेतांना कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार तसंच अजय देशपांडे आणि सचिन पाटील या तिघा अभियंत्यांना पकडण्यात आलं होतं, त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली.

दरम्यान, यातील दोषी अभियंत्यांना भाजपचे पदाधिकारी वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बांधकाम कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

****

पुणे अहमदनगर रस्त्यावर काल रात्री झालेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. रांजणगाव इथं गणपती मंदिरासमोर हा अपघात झाला. दोन चार चाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन, त्यांचा दुचाकीला धक्का लागल्यानं, गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

परतीच्या पावसाचा जोर ओसरल्यानं, नाशिक तसंच अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडी धरणात होणारी पाण्याची आवक मंदावली आहे. परिणामी जायकवाडी धरणातून होणाऱ्या विसर्गात कपात करण्यात आली आहे. सध्या धरणाचे सहा दरवाजे अर्धा फूट उघडलेले असून, त्यातून सुमारे तीन हजार दोनशे घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

****

जम्मू-काश्मीरमध्ये सत्ताधारी पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या माजी सरपंचांची काल शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर या सरपंचाच्या कुटुंबीयांनी एका दहशतवाद्याला ठार केलं. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याची ओळख पटली असून शौकत अहमद असं त्याचं नाव आहे.

****

आयुर्वेदाशी संबंधित तज्ज्ञ मंडळींनी आयुर्वेदाचा विस्तार करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं उभारण्यात आलेल्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. आयुर्वेद म्हणजे फक्त उपचार नसून, सामाजिक, सार्वजनिक आणि पर्यारवणाचं आरोग्यही आयुर्वेदाच्या कक्षेत येत असल्याचं ते म्हणाले. देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक आयुर्वेद रुग्णालय असायला हवं, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले.

****

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनाला नवी चालना देण्याच्या उद्वेशानं स्वतंत्र निधी पुरविण्याचं आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातल्या उपक्रमांना केलं आहे. चेन्नई इथं आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाची समृद्व आणि गौरवशाली परंपरा, युवा पिढीनं समर्पित आणि कल्पक प्रयत्नांच्या मार्फत कायम राखणं गरजेचं असल्याचंही उपराष्ट्रपती म्हणाले.

****

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वतीनं डिजिटल क्रांतीविषयक अध्ययनात भारतातल्या मोहिमेची प्रशंसा करण्यात आली आहे. सार्वजनिक वित्तपुरवठयाच्या क्षेत्रात डिजिटल क्रांतीबाबतच्या अध्ययनाचा नियोजित पुस्तकात समावेश असून, या बाबतीत जगभरात हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा गोषवारा त्यात मांडण्यात येत असल्याचं

****

डेन्मार्क खुल्या सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूचा सामना आज चीनच्या चेन युफेयी सोबत होणार आहे. सायना नेहवाल आणि के श्रीकांतही या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

****

१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेत जर्मनी आणि अमेरिकेनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. इराण विरुद्ध मेक्सीको, माली विरुद्ध इराक, ईंग्लंड विरुद्ध जपान, आणि फ्रान्स विरुद्ध स्पेन संघात आज बाद फेरीतले अन्य चार सामने खेळले जाणार आहेत.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 01 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...