Friday, 13 October 2017

Text-AIR NEWS BULLETIN AURANGABAD 13.10.2017 13.00

Regional Marathi Bulletin, Aurangabad, Dt.12.10.2017, Time - 13.00 to 13.05, Language - Marathi Text (PDF) & Aud
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 OCT. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ दुपारी १.०० वा.

****

केरळमधल्या ऐतिहासिक शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर बंदीचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयानं संविधान पीठाकडे पाठवलं आहे. ही बंदी म्हणजे महिलांवर होणारा अन्याय किंवा संविधानाच्या अधिकाराचं उल्लंघन आहे का, यावर हे पीठ विचार करणार आहे. या मंदीरात महिलांना प्रवेशबंदीच्या विरोधात दाखल याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे.

****

केंद्र शासनाच्या पर्यटन पर्वाअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार आणि सिंदखेड राजा इथं पर्यटन पर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पर्यटकांनी या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांना भेट द्यावी, असं आवाहन बुलडाण्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज वार्ताहर परिषदेत केलं आहे. या पर्वा अंतर्गत लोणार इथल्या भगवानबाबा महाविद्यालयात चर्चासत्र, तर सिंदखेड राजा इथं पर्यटन जागृती अभियान आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे.

****

सातारा शहरापासून जवळ असणाऱ्या लिंब गावच्या हद्दीत महामार्गावर कोल्हापूरकडे निघालेला पेट्रोल टॅंकर आज पहाटे उलटला. टँकरमधून पेट्रोल गळती होत असल्यानं महमार्गावरची वाहतूक  पर्यायी मार्गानं वळवण्यात आली होती. काही वेळानं गळती थांबवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतात होत असलेल्या सुधारणा महत्त्वपूर्ण असून, या सुधारणांचे परिणाम मध्य आणि दीर्घकालीन विकासदराच्या आकड्यांमध्ये दिसतील, असं जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किंग यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टन इथं आंतराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते. विकासदर वाढीच्या दृष्टीनं वस्तू आणि सेवा कर कायदा लाभदायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

****

गेल्या ऑगस्ट महिन्यात देशाच्या औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक चार पुर्णांक तीन दशांश टक्क्यांवर पोहोचला. गेल्या नऊ महिन्यांच्या काळातला हा उच्चांक असून, खाण आणि ऊर्जा क्षेत्रातल्या उत्तम कामगिरीच्या बळावर त्यात वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, किरकोळ बाजारातील किंमतीवर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या सप्टेंबर महिन्यात तीन पूर्णांक २८ शतांश टक्क्यांच्या पातळीवर कायम राहिला.  गेल्या वर्षी त्याच महिन्यात हा दर चार पूर्णांक ३९ शतांश टक्क्यावंर होता.

****

सध्या पाकिस्तानमध्ये भारतीय दुतावासात आयुक्तपदी कार्यरत असलेले अनुभवी राजनयिक अधिकारी गौतम बंबावाले यांची चीनमधले राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र सेवेच्या १९८४ च्या तुकडीचे अधिकारी असलेले बंबावाले लवकरच सध्या तिथं कार्यरत विजय गोखले यांच्याकडून कार्यभार स्वीकारणार आहेत.

****

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यंदाची दिवाळी अंदमान आणि निकोबार इथल्या सैन्यदल मुख्यालयात कार्यरत लष्करी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत साजरी करणार आहेत. येत्या १८ तारखेला त्या अंदमानला जाणार आहेत. देशातल्या तिन्ही सैन्यदलांच्या एकमेव संयुक्त मुख्यालयाच्या अखत्यारीत कार्यरत विविध केंद्राच्या परिचालनात्मक तयारीचा आढावा देखील यावेळी घेण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं.

****

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आयोजित करत असलेली ३४वी राज्य पात्रता परिक्षा - सेट २८ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. याबाबतची अधिसूचना विद्यापीठाकडून काल जारी करण्यात आली. या परिक्षेसाठी आजपासून ते २६ ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. ही परिक्षा राज्यातल्या १४ जिल्ह्यांसह गोव्यामधल्या पणजी इथं होणार आहे.

****

मार्च २०१८ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावीच्या परीक्षेचे अर्ज १६ ऑक्टोबर ते सहा नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीनं भरावे, असं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं एका पत्रकाद्वारे कळवलं आहे. सात ते १४ नोव्हेंबर पर्यंत विलंबित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत. डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा एस एस सी बोर्ड डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर हे अर्ज भरता येणार आहेत.

****

बांगलादेशात सुरू असलेल्या पुरुष हॉकी आशिया चषक स्पर्धेत आज ढाका इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात भारताचा सामना यजमान बांगलादेशसोबत होणार आहे. त्यापूर्वी झालेल्या सामन्यात भारतानं जपानवर एकहाती विजय मिळवला. हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक जोर्द मरीजने यांच्या प्रशिक्षणाखालील भारतीय संघाचा हा पहिलाच विजय होता.

****

इंग्लंडमध्ये मँचेस्टर इथं होणाऱ्या यूसीआय ट्रॅक सायकल विश्वचषक स्पर्धेत देबोराह हेरॉल्ड आणि अलीना रेजी ही भारताची  सायकलपटू जोडी पात्र ठरली आहे. १० ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. नवी दिल्ल्लीत झालेल्या आशियायी सायकल स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यामुळे आवश्यक गुणांच्या आधारे हे दोन्हीही सायकलपटू विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले.

****
io

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 09.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 09 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...