Wednesday, 18 October 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 18.10.2017 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 OCT. 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ ऑक्टोबर २०१७ सकाळी ६.५० मि.

****

** एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणं शक्य नाही मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, संपावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप

** कर्जमाफीची रक्कम आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार 

** ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांचे सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचे दावे

** बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला मदत करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य अपात्र

** आणि

** शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य भास्करराव बोरावके आणि गड किल्ल्यांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रमोद मांडे यांचं निधन

****

राज्य परीवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणं शक्य नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल स्पष्ट केलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. सातवा वेतन आयोग लागू केला तर एसटीला डिझेल भरायला देखील पैसे उरणार नाहीत अशी भिती त्यांनी व्यक्त केली. मात्र यातून तोडगा काढून लवकरच हा संप मिटेल असं ते म्हणाले.

कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आजपासून सरकार कर्जमाफीची रक्कम जमा करणार आहे. महिनाभरात ७७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे भरून कर्जमाफीचा विषय निकालात काढू असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

दरम्यान, सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पुकारलेल्या बेमुदत संपामागे काँग्रेस पक्षाचा हात असल्याचा आरोप परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार हा संप बेकायदेशीर असल्याचं रावते यांनी नमूद केलं. कर्मचारी संघटनांनी चर्चेला यावं, आपण वेतनवाढ देण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेस पक्षाचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संपाबाबत बोलताना, राज्याचं परिवहन खातं शिवसेनेकडे असल्यानं भाजपनं जाणीवपूर्वक या आंदोलनाबाबत उदासीन भूमिका घेतल्याची शंका व्यक्त केली, ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शिवसेना सर्वसामान्य प्रवाशांच्या बाजूनं असेल तर तातडीनं एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटवावा, अन्यथा सत्तेतून बाजुला व्हावं, असंही विखे पाटील म्हणाले. सर्वसामान्यांना ऐन दिवाळीत त्रासाला सामोरं जावं लागत असल्यानं, सरकारनं एस टी कामगार संघटनांना विश्वासात घेऊन हा संप मिटवावा आणि प्रवाशांना दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी विखेपाटील यांनी केली.

दरम्यान, एस टी कामगारांच्या या संपाला सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं. राज्यातल्या बहुतेक जिल्ह्यात बस स्थानकांमध्ये काल बस सेवा पूर्णपणे ठप्प होती, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीडसह बहुतेक सर्वच ठिकाणी बस वाहतूक पूर्णपणे ठप्प असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. या संपामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल झाले. अनेकांना इच्छित स्थळी वेळेवर पोहोचता आले नाही तर काहींना आपला प्रवास रद्द करावा लागला. अनेक ठिकाणी खाजगी वाहनधारकांनी भाडेवाढ करून संधीचा फायदा घेतल्याचंही चित्र दिसून आलं.

****

राज्यातल्या १८ जिल्ह्यातल्या तीन हजार ६६६ ग्राम पंचायत निवडणुकीची मतमोजणी काल करण्यात आली. यामध्ये मतदारांचा संमिश्र कौल दिसून आला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी आपले सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचा दावा केला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १६१ ग्रामपंचायतींची मतमोजणी काल झाली. या निवडणुकीमध्ये  भारतीय जनता पक्षाचे ३२ सरपंच आणि ३०९ सदस्य विजयी झाल्याचा तर शिवसेनेचे ४८ सरपंच निवडून आल्याचा दावा संबंधित पक्षांनी केला आहे. कॉंग्रेसचे ५४ सदस्य विजयी झाले असल्याचं काँग्रेसच्यावतीनं सांगण्यात आलं.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य निवडून आल्याचा दावा केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या तरंगफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्ञानदेव कांबळे हे तृतीयपंथी उमेदवार निवडून आले आहेत. भाजप पुरस्कृत उमेदवार असलेले कांबळे सोलापूर जिल्ह्यातले पहिलेच तृतीय पंथी सरपंच ठरले आहेत.

****

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला मदत करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी अपात्र ठरवले आहेत. या निवडणुकीदरम्यान या सहा सदस्यांनी पक्षाच्या उमेदवाराला मतदान न करता भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. त्यांच्या या पक्ष विरोधी कारवायाविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य बजरंग सोनवणे, पराभूत उमेदवार मंगला सोळंके आणि अजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवून त्यांचं जिल्हा परीषद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली होती. अपात्र ठरवण्यात आलेल्या सदस्यांमध्ये शिवाजी पवार, प्रकाश कवठेकर, अश्विनी जरांगे, संगीता महारनवर, मंगल डोईफोडे, आणि अश्विनी निंबाळकर यांचा समावेश आहेत. यात माजी मंत्री सुरेश धस यांच्या गटाचे ५ तर जयदत्त क्षीरसागर गटाच्या एका सदस्याचा समावेश आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

औरंगाबादमध्ये देशातलं पहिलं ई-रिक्षा चार्जिंग सेंटर आणि राज्यातलं पहिलं ई-रिक्षा ट्रेनिंग सेंटर सुरू करण्यात आलं आहे. या सेंटर्सचं उद्घाटन काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झालं. पर्यटन राजधानीतल प्रदूषण कमी करण्यास ई-रिक्षाची मदत होईल असं बागडे यावेळी म्हणाले. या रिक्षामुळे पेट्रोल-डिझेलचा वापर टाळण्यासाठी आणि शहरवासियांना स्वस्तात प्रवास मिळवून देण्यास मदत होणार आहे. शहरातल्या जाधववाडी इथल्या सनी सेंटरमध्ये सुरू झालेल्या या केंद्रात एका दिवसात ५० ई-रिक्षांची बुकिंग झाली आहे.

****

राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी दीपावलीनिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा सण ज्ञानाचा अज्ञानावर, प्रकाशाचा अंध:कारावर तसंच इष्ट प्रवृत्तींचा अनिष्ट प्रवृत्तींवर विजयाचं प्रतिक आहे. हा उत्सव सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि संपन्नता घेऊन येवो तसेच सर्वांमध्ये एकात्मतेची भावना वृद्धिंगत करो असं राज्यपालांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. 

****

औरंगाबाद शहरातल्या पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातला शिपाई राजूअप्पा नाडार याला २५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल रंगेहाथ अटक केली. चोरीला गेलेल्या गाडीचा विमा उतरवण्यासाठी नाडार यानं ही लाच मागितली होती. परभणी इथला पोलीस कर्मचारी नेताजी गीते यालाही काल लाचलुचपत प्रतिबंधक विभानानं अटक केली. मागसवर्गीय अत्याचार प्रतिबंधक- ॲटॉसिटीच्या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी त्यानं ३० हजार रुपयांची लाच मागितली होती.

****

शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य भास्करराव बोरावके यांचं काल हृदयविकारानं अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव इथं निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या प्रत्येक लढ्यात बोरावके यांनी त्यांना साथ दिली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेवून त्याची अभ्यासु वृत्तीनं मांडणी करणारं व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा लौकीक होता. त्यांच्या पार्थिवावर काल कोपरगाव इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

गड किल्ल्यांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रमोद मांडे यांचं काल सकाळी पुण्यात निधन झालं. ते ६३ वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र आणि गड किल्ल्यांचे गाढे अभ्यासक असलेले मांडे यांची स्वातंत्र्य संग्रामातील समिधा, स्वातंत्र्य संग्रामातील अग्निशलाका, स्वातंत्र्य संग्रामातील अंगार, महाराष्ट्रातील रत्नभांडार गड किल्ले ही पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वरचे माजी आमदार मुसा अली मोडक यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. आधी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते कार्यरत होते. राज्य परिवहन महामंडळाचे महामंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं.

****

जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव जवळ ट्रक आणि खाजगी वाहनात टक्कर होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सात जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. आजारी मुलाला उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना हा अपघात घडला.

****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.10.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 October 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत...