Monday, 16 October 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 16.10.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 16 October 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ ऑक्टोबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या अठरा तारखेपासून कर्जमाफीचा लाभ जमा करण्यास प्रारंभ होणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज जालना इथं विकास परिषदेत बोलत होते.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले –

मला सांगताना आनंद वाटतो, की पहिली बॅच कर्जमाफीची १८ तारखेला त्यांच्या खात्यामध्ये आम्ही पैसा जमा करणार आणि त्यानंतर रोज आम्ही हा पैसा जमा करत करत महिन्याभराच्या आत, त्याच्याहीपेक्षा कमी कालावधीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील. आणि त्यातनं आमच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचं कामदेखील राज्य सरकारच्या वतीनं होणार आहे.

दिल्ली मुंबई औद्योगिक मार्गिका डीएमआयसी अंतर्गत भौतिक सुविधा उपलब्ध झाल्यावर मोठे उद्योग येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, पशूसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

****

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनांनी त्यांचा प्रस्तावित संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. आज मुंबईत संबंधित कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्यासाठी परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, ही समिती वेतनवाढीबाबत सादर करेल, तो तोडगा निश्चित मान्य केला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.
दरम्यान, एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची लेखी हमी देऊन दहा हजार रुपये हंगामी वाढ देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी अमान्य केल्यामुळे आज मध्यरात्री पासून संपावर जाणार असल्याचं एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष हनुमंत ताटे यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.

****

तेजस एक्स्प्रेसमध्ये काल २६ प्रवाशांना रेल्वेत देण्यात आलेल्या अन्नातून विषबाधा झाल्याप्रकरणी रेल्वे विभागातर्फे आज संबंधित कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून, आय.आर.सी.टी.सी.चे अधिकारी आणि खानपान सेवा व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आलं आहे.

****

जळगावच्या जैन एरिगेशन कंपनीचे संस्थापक दिवंगत भवरलाल जैन यांना परमार्थ सेवा समितीतर्फे मरणोत्तर ‘परमार्थ रत्न पुरस्कार’ आज प्रदान करण्यात आला. राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते भवरलाल जैन यांच्या मुलांनी हा पुरस्कार स्वीकारला. जैन यांनी कृषी क्षेत्रात मोठी क्रांती केली असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले.

****

अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं सर्व राज्यांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना दिले आहेत. नवी दिल्ली इथं जागतिक अन्न दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना, सणासुदीच्या काळात अन्नपदार्थात भेसळ करणाऱ्यांवर नजर ठेवण्यास सांगितलं आहे.

****

राज्यातल्या तीन हजार ७०० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालं. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १५८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात साडे अकरा वाजेपर्यंत ३२ टक्के मतदान झालं. जिल्ह्यातल्या कनगरा आणि शिराढोण मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्यानं सकाळी काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली होती. काही वेळानं मतदान शांततेत पार पडलं.

****

राज्यातल्या सार्वजनिक ग्रंथालयाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असून, या संदर्भात दिवाळी नंतर राज्य संघाचे पदाधिकारी यांची मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचं कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं आहे. लातूर इथं आज महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या ५४व्या अधिवेशनाचं उद्घाटन निलंगेकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या संदेशाचं वाचनही निलंगेकर यांनी केलं.

****

औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नावरून महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज वादळी ठरली. या प्रश्नावरून झालेल्या गदारोळादरम्यान एमआयएमच्या नगरसेवकांनी खुर्च्या फेकल्याचं वृत्त आहे. या नगरसेवकांचं सदस्यत्व यापूर्वीही एक दिवसासाठी रद्द करण्यात आलं होतं.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 04.10.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 04 October 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...