Saturday, 12 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 12.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 12 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ मे २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø  जिल्हा न्यायालयांमध्ये लैंगिक शोषण विरोधी समिती स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश 

Ø  राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

Ø  शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास आपलं नेहमीच प्राधान्य - मुख्यमंत्री

Ø  औरंगाबाद इथं रस्ता अपघातात नऊ जण ठार

आणि

Ø  राज्य राखीव पोलीस दलाच्या हिंगोली जिल्हा भरतीत घोटाळा; २६ जणांविरूध्द गुन्हा दाखल

****



 देशभरातल्या सर्व उच्च न्यायालयांनी जिल्हा न्यायालयांमध्ये लैंगिक शोषण विरोधी समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. नवी दिल्लीतल्या तीस हजारी जिल्हा न्यायालयाच्या आवारात संप करणाऱ्या वकिलांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप एका महिला वकिलानं केला होता, त्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं दोन महिन्यांच्या मुदतीत अशा समिती स्थापन करण्यास सांगितलं आहे.

****



 राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी काल मुंबईत राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गेल्या काही काळापासून ते कर्करोगानं ग्रस्त होते. या आजाराला कंटाळूनच आत्महत्या करत असल्याचं, त्यांनी आत्महत्येपूर्वीच्या पत्रात लिहिलं असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.  हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २०१३ मधल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जे.डे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान दुहेरी हत्या प्रकरण अशी महत्त्वाची प्रकरणं सोडवण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली होती.



 रॉय यांच्या निधनामुळे एका कार्यक्षम अधिकाऱ्याला आपण मुकलो, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

****



 प्रधानमंत्री आवास योजनेला शहरी भागात गती येण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि  क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडा ला नियोजन प्राधिकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत ‘शहरी भागात सर्वांना परवडणारी घरे’ या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. आवास योजनेतली ही घरं, विविध शहरात असल्यानं, वेळेत आराखडे आणि बांधकामांना मंजुरी मिळण्यास विलंब लागतो. तो टाळून योजनेला गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.



 यावर्षी राज्यभरात विविध शहरात दहा लाख घरांच्या बांधणीचं उद्द‍िष्ट पूर्ण करण्यासाठी, गृहनिर्माण विभागानं काम करण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी दिले.

****



 शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राजगुरु नगर - खेड मधल्या निमगाव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार  गावांशी निगडीत विशेष आर्थिक क्षेत्र - सेझ रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला, तसंच या जमिनींचे  प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यासाठीचं शुल्कही माफ केलं. त्यामुळे या चार गावातल्या शेतकऱ्यांनी आभार व्यक्त करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

****



 उरण इथल्या जवाहरलाल नेहरू बंदरातल्या सर्वपक्षीय वीस वाहतूकदार संघटनांनी कालपासून बेमुदत असहकार आंदोलन पुकारल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. भाज्यांसह, हापूस आंबे, द्राक्षं आणि डाळिंबं आदी फळांचे चारशे कंटेनर वाहतुकीअभावी उभे आहेत. जेएनपीटीतल्या कंटेनर्सची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारनं डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी धोरण सुरू केलं आहे. यासाठी जेएनपीटीनं काढलेली निविदा चार मुख्य वाहतूक कंत्राटदारांना मिळाली. यामुळे महामुंबई क्षेत्रातल्या सुमारे १० हजार स्थानिक वाहतूकदांराचा व्यवसाय धोक्यात आल्याचं कारण देत, वाहतुकदारांनी हे आंदोलन पुकारलं आहे. 

****



 रास्तभाव दुकानांमधून तूर डाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी अधिकृत रास्तभाव दुकानदारांना तूर डाळी विक्रीकरता मिळणाऱ्या वाट्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो तीन रुपये एवढा वाटा मिळेल. याबाबतचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला.

****



 उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम - एमसीव्हीसी बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचं, कौशल्य विकास उद्योजकता विभागानं स्पष्ट केलं आहे. हा अभ्यासक्रम आणि योजनेचा दर्जा वाढवण्याबाबत चाचपणी सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत दिली जाणारी अंदाजे नऊ लाख शैक्षणिक प्रमाणपत्रं, राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजिटल पद्धतीनं जतन करुन ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.

*****

 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

*****



 ऑस्ट्रेलिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणित आणि समीर वर्मा पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात प्रणितनं इंडोनेशियाच्या अहमद मौलानाचा २१ - १२, २१ - १४ असा, तर समीरनं जपानच्या ताकुमा युडाचा २१ - १६, २१- १२ असा पराभव केला. उपान्त्यपूर्व फेरीत प्रणीतचा सामना इंडोनेशियाच्या ली चेक यियू सोबत, तर समीरचा सामना चीनच्या लू गुआंगझू बरोबर होणार आहे. पुरुष दुहेरीतही मनु अत्री आणि बी सुमीत रेड्डी यांच्या जोडीनंही उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

****



 माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. भुजबळ यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यावेळी उपस्थित होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सुमारे दोन वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर भुजबळ यांची चार मे रोजी जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

****



 औरंगाबाद इथं काल पाण्याचा टँकर आणि ॲपे रिक्षाच्या अपघातात नऊ जण ठार तर दोन जण जखमी झाले, काल सायंकाळच्या सुमारास पैठण रस्त्यावर गेवराई तांड्याजवळ हा अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्यानं, नियंत्रणाबाहेर गेलेला टँकर ॲपे रिक्षावर धडकून अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.



 औरंगाबाद जिल्ह्यातै काल झालेल्या अन्य एका अपघातात ३० वऱ्हाडी जखमी झाले. वैजापूर तालुक्यात ट्रक आणि बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला.

****



 राज्य राखीव पोलीस दलाच्या हिंगोली जिल्हा भरतीत घोटाळा झाल्याचं निदर्शनास आलं आहे. भरती प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना, आर्थिक व्यवहारानंतर गुणवाढ देवून भरती केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त समादेशक जयराम फुफाटे, काही पोलिस कर्मचारी आणि सॉफ्टवेअर कंपनीचे कर्मचारी, अशा एकूण २६ जणांविरूध्द हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

****



 जालना जिल्ह्यात मागील खरीप हंगामात पाच लाख २८ हजार ८७३ शेतकऱ्यांच्या तीन लाख ७२ हजार हेक्टरवरील कपाशीचं बोंडअळीमुळे नुकसान झालं होतं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्यशासनानं २६३ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यापैकी ७३ कोटी ४३ लाख रुपये निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं.

****



 लातूर जिल्हा स्वावलंबी व्हावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवण्यात येणार आहे. काल या अभियानाची घोषणा करतांना निलंगेकर यांनी अभियानाद्वारे, पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण, विहिरींचं पुनर्भरण, घर तिथं शोषखड्डा, तसंच घर तिथे झाड, हे उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं. या अभियानाबाबत 20 मे पर्यंत जनजागृती करण्यात येणार असून हा दिवस स्वावलंबन दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

****



 परभणी इथं अवैध वाळू उपसा करणारी २१ वाहनं जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी जप्त केली आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली. रहाटी ते भारसावडा दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: ही कारवाई केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

 जालना इथं महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला पाच हजार रुपये लाच घेताना काल अटक करण्यात आली. पंडित राठोड असं त्याचं नाव असून, नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलून देण्यासाठी त्यानं शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल त्याला रंगेहाथ अटक केली.

****



 नांदेड वाघाळा महापालिकेच्या राममनोहर लोहिया वाचनालयाचे माजी ग्रंथपाल तथा शिक्षण अधिकारी गंगाधरराव कल्याणकर यांच काल निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. आज सकाळी अकरा वाजता गोवर्धन घाट स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

****



 भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड - बीएसएनएल कंपनीच्या ६६ हजार मोबाईल टॉवरची स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काल औरंगाबाद इथं बीएसएनएल कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी रस्त्यावर उतरत निदर्शनं केली. ग्राहकांना स्वस्तात आणि कमी किंमतीत सेवा देणारे बीएसएनल बंद पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप, संघटनांनी केला आहे.



*****

***

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 19 جون 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 19 June-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ...