Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 11 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
देशभरातल्या
सर्व उच्च न्यायालयांनी लैंगिक शोषण विरोधी समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च
न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक न्यायाधीश
न्यायमूर्ती गीता मित्तल यांना, दिल्लीतल्या सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये एका आठवड्यात
अशी समिती स्थापन करण्यास सांगितलं आहे.
****
राज्याचे
अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी आज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
गेल्या काही काळापासून ते कर्करोगानं ग्रस्त होते. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या
केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते.
२०१३ मधल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारासिंहला त्यांनी अटक
केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील
गोळीबार प्रकरण, पत्रकार जे.डे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान दुहेरी हत्या
प्रकरण अशी महत्त्वाची प्रकरणं सोडवण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती. दहशतवादविरोधी
पथकाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली होती.
****
उरण
इथल्या जवाहरलाल नेहरू बंदरातल्या सर्वपक्षीय वीस वाहतूकदार संघटनांनी कालपासून बेमुदत
असहकार आंदोलन पुकारल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. भाज्यांसह, हापूस आंबे, द्राक्षं
आणि डाळिंबं आदी फळांचे चारशे कंटेनर वाहतुकीअभावी उभे आहेत. जेएनपीटीतल्या कंटेनर्सची
वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारनं डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी धोरण सुरू केलं आहे. यासाठी
जेएनपीटीनं काढलेली निविदा चार मुख्य वाहतूक कंत्राटदारांना मिळाली. यामुळे महामुंबई
क्षेत्रातल्या सुमारे १० हजार स्थानिक वाहतुकदांराचा व्यवसाय धोक्यात आल्याचं कारण
देत, वाहतुकदारांनी हे आंदोलन पुकारलं आहे.
****
शेतकऱ्यांच्या
हिताचे निर्णय घेण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. राजगुरु नगर - खेड मधल्या निमगाव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार
गावांशी निगडीत विशेष आर्थिक क्षेत्र - सेझ रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी
घेतला, तसंच या जमिनींचे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यासाठीचं शुल्कही
माफ केलं. त्यामुळे या चार गावातल्या शेतकऱ्यांनी आभार व्यक्त करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची
भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
****
भारतीय
दूरसंचार निगम लिमिटेड - बीएसएनएल कंपनीच्या ६६ हजार मोबाईल टॉवरवर स्वतंत्र उपकंपनी
स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आज औरंगाबाद इथं विविध ठिकाणी ‘बीएसएनएल
बचाओ’च्या घोषणा देत, कर्मचारी आणि युनियनच्या सदस्यांनी रस्त्यावर उतरत निदर्शनं केली.
ग्राहकांना स्वस्तात आणि कमी किंमतीत सेवा देणारे बीएसएनल बंद पाडण्याचा हा डाव असल्याचा
आरोप, संघटनांनी केला आहे. यासाठी सर्वत्र सभा, बैठका घेण्यात येत असल्याचंही आंदोलनकर्त्यांनी
सांगितलं.
****
राज्य
शासनाच्या सर्व इमारती हरित इमारत करण्याच्या दृष्टीकोनातून या इमारतींचं मानांकन करण्याबाबतचं
प्रशिक्षण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी राज्य
शासन आणि केंद्र शासनांतर्गत ग्रीहा कौन्सील यांच्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत
पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. हरित इमारतींच्या बांधकामामुळे
जागतिक तपमानवाढीला कारणीभूत पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या वायूंचं उत्सर्जन कमी होण्यास
मदत होईल, असं पाटील यावेळी म्हणाले.
****
राज्य
तंत्र शिक्षण मंडळामार्फत दिली जाणारी अंदाजे नऊ लाख शैक्षणिक प्रमाणपत्रं, राष्ट्रीय
शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजिटल पद्धतीनं जतन करुन ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात आज
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात
आला.
****
रास्तभाव
दुकानांमधून तूर डाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी अधिकृत रास्तभाव दुकानदारांना
तूर डाळी विक्रीकरता मिळणाऱ्या वाट्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता रास्तभाव दुकानदारांना
प्रतिकिलो तीन रुपये एवढा वाटा मिळेल. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला.
****
जालना जिल्ह्यात मागील खरीप हंगामात पाच लाख २८ हजार ८७३ शेतकऱ्यांच्या तीन
लाख ७२ हजार हेक्टरवरील कपाशीचं बोंडअळीमुळे नुकसान झालं होतं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना
मदत म्हणून राज्य शासनानं २६३ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यापैकी ७३ कोटी ४३ लाख
रुपये निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात
जमा करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात ट्रक आणि बसची समोरासमोर धडक होऊन ३० वऱ्हाडी जखमी
झाले. आज सकाळी हा अपघात झाला. जखमींना वैजापूर इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी
दाखल करण्यात आलं आहे.
****
No comments:
Post a Comment