आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१२ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी
आज सकाळी मतदान सुरु झालं. सकाळी नऊ वाजेपर्यंत ११ टक्के मतदान झाल्याचं पीटीआयचं वृत्त
आहे. एकूण २२४ जागांपैकी २२२
जागांसाठी मतदान होत आहे. जयनगर विधानसभा
मतदारसंघात भाजपा उमेदवार बी. एन. विजय यांचं निधन झाल्यामुळे तिथली निवडणूक रद्द करण्यात
आली आहे. तर राजराजेश्वरी नगर मतदारसंघात पैसे, भेटवस्तू
आणि इतर सामग्रीचं वाटप झाल्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्यामुळे तिथली
निवडणूकही पुढे ढकलण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी दोन हजार सहाशेहून अधिक उमेदवार
रिंगणात आहेत. येत्या १५ तारखेला मतमोजणी होणार आहे.
****
मुक्त शाळा आणि खाजगी पद्धतीनं बारावीची परीक्षा
देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही आता वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठीची राष्ट्रीय प्रवेश
पात्रता परीक्षा -नीट देता येणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईनं यावर
घातलेली बंदी दिल्ली उच्च न्यायालयानं उठवली आहे.
****
औरंगाबाद शहरातल्या मोतीकारंजा, शहागंज, गांधीनगर
या भागात दोन गटात झालेल्या वादानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता. मध्यरात्रीनंतर
झालेल्या या वादात जाळपोळ आणि दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. यात १० पोलिस, तर तीस नागरिक
जखमी झाले. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, तसंच शांतता राखण्याचं आवाहन औरंगाबादचे
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी केलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरात १४४ कलम
लागू करण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आली असून, या भागात आता वाहतूक सुरळीत
सुरु झाली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वैजापूर नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे साबेर
खान यांची बिनविरोध तर स्वीकृत नगरसेवकपदाच्या दोन जागांवर सचिन वाणी आणि राजूसिंह
राजपूत यांची निवड झाली आहे. पालिकेच्या काल झालेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेत ही निवड
प्रक्रिया पार पडली.
*****
***
No comments:
Post a Comment