Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 12 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ मे २०१८ दुपारी १.०० वा.
****
सामूहिक
बलात्काराला बळी ठरलेल्या महिलांना आता किमान पाच लाख रुपये तर कमाल दहा लाख
रुपये मदत मिळू शकेल. राष्ट्रीय विधी सेवा प्रधिकरणानं प्रस्तावित केलेल्या
या योजनेला सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली आहे. लैंगिक छळ आणि इतर गुन्ह्यांमध्ये पीडित महिलेला नुकसान भरपाई
योजना - २०१८ अंतर्गत, दुर्व्यवहार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाच्या प्रकरणात पीडितेला
किमान चार लाख तर कमाल सात लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. ॲसिड हल्ल्यातल्या पीडितेलाही
आर्थिक मदत देण्याची तरतुद या योजनेत करण्यात आली आहे.
****
जम्मू आणि काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात आज पहाटे
सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे
एक जवान शहीद झाले. या चकमकीत एक नागरिक देखील जखमी झाला. या परिसरात दहशतवादी लपले
असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी शोधमोहिम सुरू केली, त्यानंतर ही चकमक झाल्याचं
सुरक्षा दलातल्या सूत्रांनी सांगितलं.
****
भारत आणि नेपाळमधले संबंध हे सौहार्दपूर्ण आणि दोन्ही
देशांतल्या नागरिकांच्या एकमेकांशी खोलवर रुजलेल्या संबंधांवर आधारलेले असल्याचं पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याशी काठमांडूमध्ये
शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर जारी केलेल्या संयुक्त पत्रकात ही माहिती देण्यात आली.
जलमार्ग आणि रेल्वेद्वारे दोन्ही देशांमधलं दळणवळण अधिक प्रमाणात वाढवण्यावर यावेळी
भर देण्यात आला.
दरम्यान, पंतप्रधानांनी नेपाळ दौऱ्याच्या आजच्या
दुसर्या दिवशी मुक्तीनाथ आणि पशुपतीनाथ मंदिरांना भेट दिली.
****
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शांततेत मतदान सुरु
असून, सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत २४ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. उडुप्पी, दक्षिण
कन्नड आणि कुर्ग इथं मतदानाचं प्रमाण सर्वाधिक आहे. या निवडणुकीसाठी दोन हजार सहाशेहून अधिक उमेदवार रिंगणात
आहेत. येत्या १५ तारखेला मतमोजणी होणार आहे.
****
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस आज साजरा होत आहे.
नर्सिंग सेवेच्या संस्थापक फ्लोरिंस नाईटिंगिल यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा
करण्यात येतो. 'परिचारिकांनी आवाज उठवा - आरोग्य हा एक मानवाचा अधिकार', ही यंदाची
परिचारिका दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात राष्ट्रपती
रामनाथ कोविंद फ्लोरिंस नाईटिंगिल पुरस्कार प्रदान करणार आहेत.
यानिमित्त औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय
आणि महाविद्यालय - घाटीमध्ये परिचारिकांना रुग्णसेवेची शपथ देण्यात आली. तसंच परिचारिका
सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
****
राज्यात आज दोन वेगवेगळ्या अपघातात १६ जणांचा मृत्यू
झाला, तर २८ जण जखमी झाले. नांदेड जिल्ह्यात लातूर निझामाबाद रस्त्यावर जांब गावाजवळ
टेम्पो आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ११ वर्हाडी ठार झाले, तर २५
जण जखमी झाले. आज पहाटे हा अपघात झाला. मृत सर्वजण औसा तालुक्यातल्या खरोसा इथले रहीवाशी
आहेत.
तर दुसरा अपघात धुळे जिल्ह्यात जळगाव-धुळे रस्त्यावर पारोळा तालुक्यातल्या दळवेल
गावाजवळ झाला. पहाटेच्या सुमारास कार आणि ट्रकची धडक होऊन झालेल्या या अपघातात पाच
जण जागीच ठार झाले, तर चार जण जखमी झाले. मृत सर्वजण एकाच कुटुंबातले आहेत.
****
औरंगाबाद शहरातल्या मोतीकारंजा, शहागंज, गांधीनगर
या भागात दोन गटात वाद होऊन झालेल्या दंगलीत दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जगनलाल
बन्सीले हे ज्येष्ठ नागरिक, तर अब्दुल हारुन कादरी या १७ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.
दरम्यान, या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव आता कमी
झाला असून, शहरात शांततेचं वातावरण असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्रात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध
असतानाही भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक विभागानं गुजरातमधल्या सुरत
इथून इव्हीएम मशिन मागवल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी
आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणूक निरिक्षक
यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवली आहे. ही पोटनिवडणूक पारदर्शकपणे व्हावी आणि निवडणुकीविषयी
विश्वासार्हता निर्माण होण्यासाठी या मशिनची तपासणी होणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी
व्यक्त केलं.
****
ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत
मनु अत्री आणि बी सुमित रेड्डी या जोडीनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या
उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात या जोडीनं भारताच्याच अर्जुन एम आर आणि रामचंद्रन
श्लोक या जोडीचा १७ – २१, २१ – १९, २१- १८ असा पराभव केला. उपान्त्य फेरीत मनु अत्री
आणि सुमीत रेड्डी यांचा सामना आज इंडोनेशियाच्या जोडीसोबत होणार आहे. पुरुष एकेरीत
समीर वर्मा आणि बी साई प्रणित यांना उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा
लागला.
*****
***
No comments:
Post a Comment