Sunday, 13 May 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 13.05.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 13 May  2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ मे २०१ सकाळी .५० मि.

*****



Ø २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला, पाकिस्तानातले दहशतवादी जबाबदार - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची कबुली

Ø शासकीय रुग्णालयातले डॉक्टर तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं प्राधान्यानं भरण्याचे  मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

Ø औरंगाबाद दगलीसंदर्भात राज्यस्तरीय चौकशी समितीमार्फत तपास

Ø राज्यात काल अपघाताच्या विविध घटनांमध्ये २० जणांचा मृत्यू तर ४० हून अधिक जखमी

आणि

Ø हिंगोली राज्य राखीव दलात घोटाळा करून नोकरी मिळवणारे वीस जवान निलंबित

*****



 २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला, पाकिस्तानातले दहशतवादी जबाबदार असल्याची कबुली, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरीफ बोलत होते. मुंबई दहशतवादी हल्ल्यात हात असल्याचा पाकिस्ताननं वारंवार इन्कार केला आहे, त्या पार्श्वभूमीवर शरीफ यांचं हे वक्तव्यं महत्त्वाचं आहे.

****

 शासकीय रुग्णालयातल्या डॉक्टर तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांची रिक्त पदं प्राधान्यानं भरण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. यासाठी सर्व रुग्णालयांचं सर्वेक्षण करून, रिक्त पदांचा आढावा घ्यावा, असं न्यायालयानं यासंदर्भात दाखल एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान सांगितलं आहे. राज्य सेवा आयोगानं या रुग्णालयांमधल्या वरिष्ठ डॉक्टर तसंच इतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचे प्रस्ताव तातडीनं मंजूर करावेत, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. यासंदर्भात येत्या १५ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत.

****



 राजस्थानात खासगी शाळांच्या क्रमिक पुस्तकात लोकमान्य टिळकांबाबत आक्षेपार्ह लिखाणाबाबत भारतीय जनता पक्षानं माफी मागावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. राजस्थान सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असं, चव्हाण यांनी म्हटलं आहे. हा फक्त देशाचा नव्हे तर कोट्यवधी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान असून, भाजपनं या प्रकरणी माफी मागावी, असं चव्हाण म्हणाले.

****



 इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा कल चाचणी २०१८ चा अहवाल काल शिक्षण विभागानं जाहीर केला. एकूण १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी कल चाचणी दिली होती, त्यापैकी सर्वाधिक विद्यार्थ्यांचा वाणिज्य क्षेत्राकडे कल दिसून येत असल्याचं, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या कल चाचणीचा सविस्तर अहवाल डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा करीयरमित्र डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली.

****

 औरंगाबाद इथं उसळलेल्या गलीसंदर्भात राज्यस्तरीय चौकशी समिती नेमणार असल्याची माहिती, गृह राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी दिली आहे. काल औरंगाबाद इथं, नुकसानग्रस्त भागात पाहणी करून, नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या घटनेमध्ये ज्यांची वित्तहानी झाली आहे, त्याचे पंचनामे करून शासनाच्या वतीनं मदत दिली जाणार असल्याचंही रणजीत पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले……



 साधारणपणे  ३०-३५  लोकांना ताब्यात घेतले आहे. आता सध्या परिस्थिती सगळीकडे शांतता आहे. सायबरला सुध्दा सूचना दिलेल्या आहेत की, या परिस्थिती मध्ये जर कोणी अशा काही चुकीच्या पध्दतीचे काही टॅग गेले असतील , फेसबुकच्या काही पोस्ट गेल्या असतील त्या सुध्दा आम्ही पाहण्यास सांगितल्या आहेत. या सर्व इनसिडन्सची पूर्ण चौकशी होणार. ज्यांना – ज्यांना मदत लागेल त्यांना सरकार निश्चितचं मदत करेल. कोणाचं काय नुकसान झालं याचा देखील आम्ही सर्वे करून घेऊ.



 महापौर नंदकुमार घडेले, जिल्हाधिकारी उदय चधरी, प्रभारी ोलिस आयुक्त मिलिंद भारंबे ावेळी उपस्थित होते.



 रम्यान, शहरातला तणाव आता निवळत असून, खबरदारीचा उपाय म्हणून, शहरातली मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक दिव्यांग ज्येष्ठ नागरिक, तर एका १७ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. तर एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह अनेक लोक जखमी झाले आहेत. वाहनं तसंच मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनकाल सर्वत्र साजरा करण्यात आला. दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी, आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कार्याबद्दल ३५ जणांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार देऊन गौरव केला, यामध्ये मुंबईच्या बी.जे. वाडिया बाल रूग्णालयातल्या मुख्य परिचारिका आशा महाजन, तसंच जळगाव जिल्ह्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहायक परिचारिका शोभा पाटील यांचा समावेश आहे.



 औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय - घाटी रुग्णालयात परिचारिकांना रुग्णसेवेची शपथ देण्यात आली. तसंच परिचारिका सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

****



 राज्यात काल अपघाताच्या विविध घटनांमध्ये २० जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जखमी झाले.



 नांदेड जिल्ह्यात लातूर निझामाबाद रस्त्यावर जांब गावाजवळ टेम्पो आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात १० वऱ्हाडी ठार झाले, तर २५ जण जखमी झाले. काल पहाटे हा अपघात झाला.



 जळगाव-धुळे रस्त्यावर पारोळा तालुक्यात दळवेल गावाजवळ झालेल्या अन्य एका अपघातात पाच जण जागीच ठार, तर चार जण जखमी झाले. कार आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला.



 औरंगाबाद जिल्ह्यात पैठण शेवगाव रस्त्यावर अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं दुचाकीवरच्या दोघांचा मृत्यू झाला.



 बीड जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात ॲपे रिक्षा आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार आणि तिघे गंभीर जखमी झाले, तर गेवराई तालुक्यात मादळमोही इथं काल वादळी वाऱ्यामुळे मंगल कार्यालयाची भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला, भिंतीखाली दबल्यानं, नऊ जण जखमी असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 हिंगोली इथं राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीत घोटाळा करून नोकरी मिळवणाऱ्या वीस जवानांना समादेशक योगेशकुमार यांनी निलंबित केलं आहे. गट क्रमांक १३ च्या पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षेत अधिकारी-परीक्षेसाठी नियुक्त सॉफ्टवेअर कंपनीसोबत संगनमत करून, सन २०१३ च्या भरतीमध्ये चार, २०१४ ला १० तर २०१७ मध्ये झालेल्या भरतीत सहा उमेदवारांनी गुण वाढवून नोकरी मिळवल्याचं प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं, त्यानंतर समादेशकांनी काल या सर्वांचे निलंबन आदेश जारी केले.

****



 नाशिक इथं कॉम्बॅट आर्मी एव्हीएशनचा २७ वा दीक्षांत सोहळा काल झाला. ३७ वैमानिकांची तुकडी यावेळी हवाई दलात दाखल झाली. यावेळी चित्ता आणि चेतक या हेलिकॉप्टरच्या ताफ्यांनी रोमांचक प्रात्यक्षिकं सादर केली. उल्लेखनीय कामगिरीसाठी यावेळी सिल्वर चित्ता चषक आणि पदकं देऊन गौरवण्यात आलं.

****



 परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या सावरगाव इथं जलसंधारणासाठी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेअंतर्गत श्रमदान करण्यात आलं. गावकऱ्यांसह जिल्हा परिषद कर्मचारी यात सहभागी झाले होते. यावेळी चार दगडी बांध तयार करण्यात आले. जिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांनी या कामाची पाहणी केली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं या कामासाठी मदत म्हणून पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला.

****

 काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया यांचं काल औरंगाबाद इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी ९ वाजता औरंगाबाद इथं प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 

****

 औरंगाबाद जिल्ह्यात कापूस पिकावरील बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत ९८ कोटी ७५ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. संबंधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर निधी जमा करण्यासाठी तालुका निहाय नियोजन करण्यात आलं आहे. याबाबतचा अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला.

****   



 औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात काल संध्याकाळी वादळी पाऊस झाला. त्यामुळे वीज पुरवठा काही काळासाठी विस्कळीत झाला होता. या पावसामुळे टमाटा आणि इतर पिकाचं नुकसान झालं आहे.



 जालना जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास पावसानं तुरळक हजेरी लावली, जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...