Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ मे २०१८ दुपारी १.०० वा.
****
देशात
आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जात आहे. १९९८ मध्ये आजच्या दिवशी भारतानं
राजस्थानातल्या पोखरण इथं अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली होती. संरक्षण मंत्री निर्मला
सीतारामन यांनी हा दिवस देशातले शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि भारताला परमाणु सक्षम राष्ट्र
बनवणार्या लोकांना समर्पित केला आहे. ११ ते १३ मे १९९८ या काळात भारतानं पोखरण इथं
माजी राष्ट्रपती आणि भारतीय संरक्षण आणि संशोधन विकास संस्था - डीआरडीओचे तत्कालिन
अध्यक्ष डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात पाच अणुबॉम्ब चाचण्या केल्या होत्या.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असून, आज सकाळी त्यांचं जनकपूर इथं पारंपारिक
पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. जनकपूर इथल्या रामजानकी मंदिराला पंतप्रधानांनी भेट दिली,
त्यानंतर त्यांनी जनकपूर - अयोध्या या बससेवेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. भारत
आणि नेपाळ दोन्ही देशात पर्यटन वेगानं वाढत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
दरम्यान,
पंतप्रधान आज नेपाळचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार
असून, ‘अरुण ३’ या जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी दोन्ही नेत्यांच्या हस्ते होणार आहे.
****
कर्नाटक
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानाकरता सर्व तयारी पूर्ण झाली आहे. निवडणुका
संपेपर्यंत आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी राजकीय पक्षं आणि प्रसारमाध्यमांकरता
निवडणूक आयोगानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये जनतम कार्यक्रम
घेण्यावरही निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. या निवडणुकीसाठीचा प्रचार काल संध्याकाळी
संपला. २२३ मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होणार असून, मतमोजणी येत्या १५ तारखेला होणार
आहे.
****
भारतीय
जनता पक्षाचे खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समिती, काळ्या
पैशाची वसुली आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचा प्रामुख्यानं अभ्यास
करणार आहे. २०१८-१९ या वर्षात विविध मंत्रालयांशी संबंधित विषयांचा अभ्यास करण्याचा
निर्णयही या ३० सदस्यीय समितीनं घेतला आहे. अणु संयंत्रांसाठी युरेनियमची आयात, उत्खननाशी
संबंधित कामं, पर्यावरण, टपाल खात्यात सुधारणा आणि देशातला दुष्काळ अशा विषयांबाबतही
समिती अभ्यास करणार आहे.
****
सामाजिक
संपर्क माध्यमांशी निगडित प्रकरणांसाठी राज्य महिला आयोगानं स्थापन केलेली सायबर समिती
येत्या तीन महिन्यात आपला अहवाल दाखल करेल, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया
रहाटकर यांनी म्हटलं आहे. त्या मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या. सामाजिक संपर्क माध्यमातून
महिलांविरोधात होणारे अवमानकारक प्रकार रोखण्यासाठी ही सायबर समिती स्थापन केली आहे.
आठ सदस्यांच्या या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर, अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी,
महिला आयोग सरकारकडे शिफारस करेल, असं रहाटकर यांनी सांगितलं.
****
पालघर
लोकसभा पोटनिवडणुकीत श्रजमीवी संघटनेनं भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.
संघटेनेचे अध्यक्ष रामाभाऊ वारणा यांनी ही माहिती दिली. भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित
यांनी काल उमेदवारी अर्ज भरला. येत्या २८ मे रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
****
हिंगोली
जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं येत्या २० मे रोजी होणाऱ्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य
संसदेच्या दुसऱ्या आंबेडकरी विचारवेध संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण
माने यांची निवड करण्यात आली आहे. या एकदिवसीय संमेलनात, प्रबोधन सत्र, कविता क्रांतीच्या
असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. संमेलन स्थळ परिसरास भारतीय संविधान परिसर, विचारमंचाला
प्राध्यापक जैमिनी कडू विचारमंच तर सभागृहाला अस्मितादर्शकार डॉ. गंगाधर पानतावणे सभागृह
असं नाव देण्यात आलं आहे.
*****
बुलडाणा
जिल्ह्यात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आणि मदर डेअरी फ्रुट्स ॲण्ड व्हेजिटेबल्स लिमिटेडच्या
माध्यमातून दुग्धोत्पादन वाढीसाठी उपाययोजना रानबण्यात येणार असून, त्यासाठी जिल्ह्यातल्या
३५२ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पाअंतर्गत दुधाची गुणवत्ता कायम राखण्यासाठी
या गावातल्या साडेतीन हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
****
ऑस्ट्रेलिया
ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणित आणि समीर वर्मा पुरुष एकेरीच्या
उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात प्रणितनं इंडोनेशियाच्या
अहमद मौलानाचा २१ - १२, २१ - १४ असा, तर समीरनं जपानच्या ताकुमा युडाचा २१ - १६, २१-
१२ असा पराभव केला. उपान्त्यपूर्व फेरीत प्रणीतचा सामना इंडोनेशियाच्या ली चेक यियू
सोबत, तर समीरचा सामना चीनच्या लू गुआंगझू बरोबर होणार आहे. पुरुष दुहेरीतही मनु अत्री
आणि बी सुमीत रेड्डी यांच्या जोडीनं उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
****
No comments:
Post a Comment