Saturday, 12 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 12.05.2018 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 12 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १२ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

भारत हा नेपाळच्या विकास प्रवासामध्ये खांद्याला खांदा लाऊन साथ देईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांच्या नेपाळ दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस असून काठमांडूमध्ये एका शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते. नेपाळने स्वत:च्या गरजा आणि प्राथमिकतेनूसार मार्गक्रमण करावे आणि यामध्ये भारत शेर्पाप्रमाणे नेपाळला साथ देईल, असंही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. सर्वांना सोबत घेऊन चालणं हे भारताचे परकीय धोरण असून ‘सब का साथ सब का विकास’ हे भारताच्या विकासाबरोबरच जागतिक कल्याणासाठीचंही ब्रीद असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.

****

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेपाळ दौऱ्याचा कार्यक्रम हा अगोदरच ठरलेला असून त्याचा कर्नाटक विधानसभेशी काहीही संबंध नसल्याचं, परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी हे मुद्दामहून कर्नाटक विधानसभा मतदानाच्या दिवशी नेपाळमध्ये मंदिरांना भेटी देऊन देवदर्शन घेत कर्नाटकमधल्या हिंदू जनतेला संदेश देत असल्याचा आरोप केला आहे. तसंच मोदी यांचे हे देवदर्शन दिवसभर दूरचित्रवाणीवर दाखवण्यात येत असून हे आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोपही काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी केला आहे.

****

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान पार पडलं. दुपारी तीन वाजेपर्यंत ५६ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. येत्या १५ तारखेला मतमोजणी होणार आहे.

****

राज्यातल्या सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांसंदर्भात सर्वेक्षण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी विशेष भरती मोहीम राबवण्यासही न्यायालयानं सांगितलं आहे. न्यायालयानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देखील, अशा रुग्णालयांमध्ये वरीष्ठ डॉक्टर, विभाग प्रमुख आणि इतर पदांसाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या शासकीय रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या नसल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना न्यायालयानं हे निर्देश दिले.

****

अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव आणि शिर्डी परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या किरण हजारे याच्या टोळीविरुद्ध मोक्का लावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे. अहमदनगर, पुणे, नाशिक जिल्ह्यात या टोळीविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या टोळीतला किरण हजारे याच्यासह १४ जणांविरुद्ध संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९-मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातल्या आणखी सात ते आठ टोळ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

****

औरंगाबादच्या मोतीकारंजा, शहागंज, राजाबाजारसह इतर ठिकाणी झालेल्या दंगलीनंतर जनतेमध्ये अफवा पसरु नये म्हणून शहरातली इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे. पोलिस नियंत्रण कक्षाकडून ही माहिती देण्यात आली. काल रात्री दोन गटात झालेल्या वादानंतर दगडफेक आणि जाळपोळ झाल्यामुळे या भागात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आज शहरात शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

****

भंडारा -गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक काळात सामाजिक माध्यमांचा वापर काळजीपूर्वक करण्यासाठी पोलीस विभागाचा सायबर सेल करडी नजर ठेवून असल्याचं पोलिस प्रशासनानं कळवलं आहे. जिल्ह्यात आचारसंहिता असल्यामुळे आपल्याला येणारे संदेश काळजीपूर्वक वाचून खातरजमा करुनच पुढे पाठवावेत, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. निवडणूक काळात वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रानिक माध्यमांमधील पेड न्यूज आणि जाहिरातीचं सूक्ष्मपणे सनियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा पोटनिवडणूक, तसंच पलूस-कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या २८ मे रोजी मतदान होणार आहे.

****

अहमदनगर जिल्हा कारागृहाच्या वतीनं रेडीओ स्टेशन सुरू करण्यात आलं आहे. हे रेडिओ केंद्र या कारागृहात असेलेले कैदी चालवतात. या रेडीओ केंद्राच्या माध्यमातून कैद्यांचा व्यक्तिमत्व विकास, त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल घडवून चांगले नागरिक तयार करण्याचं काम होत असल्याचं जिल्हा कारागृह अधीक्षक एन जी सावंत यांनी सांगितलं.

****

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारतीय बॅडमिंटनपटू मनु अत्री आणि बी. सुमीत रेड्डी यांना पराभव पत्करावा लागला. आज झालेल्या सामन्यात इंडोनेशियाच्या जोडीनं अत्री आणि रेड्डी यांचा २१-१७, २१-१५ असा पराभव केला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 18.06.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 18 June 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपत...