Friday, 18 May 2018

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 18.05.2018 17.25



Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 18 May 2018

Time - 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.

****

कर्नाटक विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप आमदार के जी बोपय्या यांची निवड करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं भाजप सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर, उद्या सकाळी अकरा वाजता राज्य विधीमंडळाचं एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यपाल वजुभाई वाला यांनी बोपय्या यांची नियुक्ती केली.

****

काँग्रेस पक्षातर्फे आज देशभरात लोकशाही वाचवा दिवस पाळण्यात आला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असताना कमी संख्याबळ असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावलं, या निर्णयाविरोधात काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आलं.

मुंबई इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावण्याचा घेतलेला निर्णय हा केंद्र सरकारच्या दबावामुळे घेतल्याचा आरोप चव्हाण यांनी यावेळी केला.

नांदेड इथंही राज्यपालांच्या निर्णयाच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. पक्षाचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलिकर, आमदार अमर राजूरकर, माजी मंत्री डी पी सावंत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीरमधल्या लडाखच्या दौऱ्यावर जाणार आहेत. जोजिला पास इथं १४ पूर्णांक दोन किलोमीटर बोगद्याचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पाला यावर्षीच्या जानेवारी महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती.

****

औरंगाबाद शहरात गेल्या आठवड्यात उसळलेल्या दंगलीत ज्या नागरिकांचं आणि व्यापाऱ्यांचं  आर्थिक नुकसान झालं आहे अशा दंगलग्रस्तांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आर्थिक मदत करण्यात येत आहे. या दंगलग्रस्तांसाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी १० लाख रूपयांचा निधी जाहिर केला होता. त्यानुसार ३५ दंगलग्रस्तांना निधीचं वाटप आजपासून करण्यात येत असल्याची माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत दिली. या दंगलीचं राजकारण न करता शहर शांत राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

दरम्यान, या दंगलीतले संशयीत आरोपी शिवसेनेचे शिवाजीनगरचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना औरंगाबाद जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर पोलिसांनी आज हजर केलं असता न्यायालयानं त्यांना दोन जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जंजाळ यांनी जामीनासाठी अर्ज केला असून उद्या या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. 

****

महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेल ट्रस्ट आणि जालना जिल्हा प्रशासनाच्यावतीनं आयोजित जालना महोत्सव २०१८ ला आज सकाळी शोभायात्रेनं सुरुवात झाली. शोभायात्रेतल्या विविध देखाव्यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही शोभायात्रेत सहभाग घेतला. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते महोत्सवाचं उदघाटन होणार आहे. २२ मे पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात मंगल गाणी दंगल गाणी, महामूर्ख संमेलन, ग्राहक प्रदर्शन, खाद्य महोत्सव आदी कार्यक्रमांचं तसंच मिस जालना -मिस्टर जालना-श्रीमती जालना तसंच जालना आयडॉल आदी स्पर्धांच आयोजन करण्यात आलं आहे.

****

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत औरंगाबादच्या जिल्हा केंद्रावर महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा २०१८ येत्या २० मे रोजी घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्रसिद्धी पत्राद्वारे ही माहिती देण्यात आली. या परीक्षेसाठी पाच हजार ६१६ उमेदवारांना प्रवेशपत्रं पाठवण्यात आली असून, यासाठी ६६६ अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

****

कोकणातल्या कृषी सेवक आणि इतर सर्वच नोकर भरतीत स्थानिक उमेदवारांना ७० टक्के आरक्षण द्यावं, अशी मागणी कोकण विभाग कृषी पदविकाधारक संघर्ष समितीनं केली आहे. याबाबत समितीनं मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना निवेदन दिलं आहे. राज्यात कृषी सेवक पदाच्या ९०५ जागांसाठी मार्च महिन्यात परीक्षा घेतल्या होत्या. यात कोकण विभागातल्या एकशे शहात्तर पदांसाठी कोकणातल्या केवळ २० उमेदवारांनाच नोकरी मिळू शकणार असल्याचं गुणवत्ता यादीवरुन स्पष्ट झालं आहे.  त्या पार्श्वभूमीवर समितीनं ही मागणी केली आहे.

****

राज्यात आज सर्वात जास्त ४७ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. परभणी इथं ४४ अंश सेल्सिअस, नांदेड ४३, तर उस्मानाबाद आणि औरंगाबाद इथं सरासरी ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढचे दोन दिवस राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची, तर विदर्भात एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.

//*********//

No comments:

Text - آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 07 اپریل 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 07 April-2026 Time: 09:00-09:10 am آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں...