Friday, 18 May 2018

Text - AIR News Bulletin, Aurangabad 18.05.2018 - 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 18 May 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ मे २०१ दुपारी १.०० वा.

****

सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांना उद्या संध्याकाळी चार वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीकडे पुरेसं संख्याबळ असताना राज्यपालांनी, कमी संख्याबळ असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलावलं, याविरोधात या दोन्ही पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी करताना न्यायालयानं, बहुमत चाचणीसाठी सोमवारपर्यंत वेळ देण्याची भाजपची मागणी फेटाळून लावली. विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०४, काँग्रेस ७८ आणि जनता दलाचे ३८ सदस्य निवडून आले आहेत.

दरम्यान, विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करु असा विश्वास मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी व्यक्त केला आहे. मुख्य सचिवांशी बोलून उद्या अधिवेशन बोलवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनीही भाजप बहुमत चाचणी जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.

****

बिटकॉईनसारख्या आभासी चलनाबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेनं घातलेल्या निर्बंधाच्या परिपत्रकाशी संबंधित कोणत्याही याचिकेवर सुनावणी करु नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व उच्च न्यायालयांना दिले आहेत. बिटकॉईनची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलावीत, तसंच या खटल्यात महाअधिवक्ता के के वेणूगोपाल यांनी मदत करावी, असा आदेशही न्यायालयानं दिला आहे. या खटल्याची पुढची सुनावणी २० जुलैला होणार आहे.

****

स्वच्छतेमुळे आरोग्य सुनिश्चित राहतं, तसंच समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण होते, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात ते बोलत होते. नागरिकांनी स्वत: पुढे येऊन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत, असं सांगून नायडू यांनी, निवासी, व्यापारी आणि बांधकामाच्या जागेवरच्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याची गरज व्यक्त केली.

****

पुढच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत दररोज ४० ते ५० किलोमीटर रस्ते बांधले जातील अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला चार वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल आकाशवाणीवर ‘चार साल मोदी सरकार’ या कार्यक्रमाची मालिका प्रसारित करण्यात येत आहे. या मालिकेअंतर्गत ‘कनेक्टिंग इंडिया’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात गडकरी बोलत होते. महामार्ग बांधणीसाठी सहा लाख कोटी गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

उत्तर प्रदेशात वाराणसी इथं झालेल्या पूल दुर्घटनेप्रकरणी सात वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. या सात अधिकाऱ्यांमध्ये महानगरपालिकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य प्रकल्प व्यवस्थापकांचा समावेश आहे. गेल्या मंगळवारी बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा खांब कोसळल्यामुळे ही दुर्घटना झाली होती. याप्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या तीन सदस्यीय उच्चस्तरीय तपास समितीनं आपला अहवाल सादर केल्यानंतर या सात अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले.

****

महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेल ट्रस्ट आणि जालना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित जालना महोत्सव २०१८ ला आज सकाळी शोभायात्रेनं सुरुवात झाली. शोभायात्रेतल्या विविध प्रकारच्या देखाव्यांनी नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनीही शोभायात्रेत सहभाग घेतला. सायंकाळी सहा वाजता सांस्कृतिक कार्य आणि शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. २२ मेपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 

****

‘सागर’ चक्रीवादळाबाबत हवामान खात्यानं महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा आणि लक्षद्वीप यांच्यासाठी सूचना जारी केली आहे. यावेळी हे चक्रीवादळ एडनच्या खाडीवर केंद्रित असून, येत्या १२ तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एडनची खाडी आणि लगतच्या पश्चिम मध्य, तसंच अरबी समुद्रात जाऊ नये असा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे. सद्यस्थिती पाहता एडनच्या खाडीत मोठ्या लाटा उसळणार असून, या संपूर्ण सागरी क्षेत्रात अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे.

****

दरम्यान, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काल मुसळधार पावसानं हजेरी लावली.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यात मुसळधार पावसासह झालेल्या चक्रीवादळात अनेक ठिकाणी पडझड होऊन लाखो रुपयांचं नुकसान झालं. घराची कौले अंगावर पडून नावळे इथले दोघेजण गंभीर जखमी झाले. वैभववाडी शहरासह कणकवली तालुक्यातल्या खारेपाटण, कनेडी, असलदे, फोंडाघाट इथल्या वीज केंद्रांनाही चक्रीवादळाचा फटका बसला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 31 May 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रपती...