Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 20 April 2025
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २० एप्रिल २०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यात सर्वत्र कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ होत आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान तर, कोकण आणि मराठवाड्यात कोरडं हवामान राहील. तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे, वीजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
ईस्टर संडे आज सर्वत्र भक्तीभावात साजरा होत आहे. ख्रिस्ती धर्मानुसार, प्रेषित येशू ख्रिस्ताने सुळावर चढवल्यानंतर तिसऱ्या दिवशी मृत्यूतून पुनरुत्थान केल्याचं मानलं जातं. त्याची आठवण म्हणून ईस्टर संडे साजरा केला जातो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यानिमित्त सर्वांना, भेच्छा दिल्या आहेत. ईस्टरनिमित्तानं ठिकठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं छावणी, शांतीपुरा आणि परिसरात ढोल, ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढून तसंच विविध उपक्रमांनी ईस्टर संडे साजरा करण्यात येत आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून अमेरिका आणि पेरु या देशांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत.तर,पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नियोजित सौदी अरेबिया दौऱ्यासाठी परवा मंगळवारी जेद्दाह इथं पोहोचतील. भारताच्या पंतप्रधानांची या शहराला गेल्या जवळपास चार दशकांतली ही पहिलीच भेट असणार आहे.
****
पाकिस्तान मुस्लिम सहकार्य संघटना अर्थात ओ.आय.सी. या व्यासपीठाचा भारताविरुद्ध अपप्रचार करण्यासाठी गैरवापर करत असल्याबद्दल भारतानं तीव्र टीका केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी काल संध्याकाळी नवी दिल्ली इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना ही पाकिस्तानची जुनीच खोड असल्याचं नमूद केलं. याबाबत भारतानं अनेकदा पाकिस्तानला हे बोलूनही दाखवलं आहे, तसंच ओ.आय.सी.तील मित्र आणि भागीदार देशांकडेही हा मुद्दा उपस्थित केला आहे. भारत आपले दृष्टिकोन आणि पाकिस्तानची या सवयीबद्दल भारताला नेमकं काय वाटतं हे अन्य सदस्य देशांच्या नजरेस आणून देत राहील असंही मिस्री यांनी सांगितलं.
****
छत्तीसगडच्या नारायणपूर इथं चार महिलांसह पाच नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून, वीस नक्षलवाद्यांनी शस्त्र समर्पण केल्याची माहिती इंडो- तिबेटीयन बॉर्डर पोलिस- आ.य.टी.बी.पी.ने दिली. तर,छत्तीसगडच्या सुकमा इथं पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या उपस्थितीत नऊ महिलांसह २२ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. आत्मसमर्पण केलेल्यांना सरकारच्या धोरणांतर्गत सर्व लाभ मिळणार आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला दंतेवाडा इथं २६ माओवाद्यांनी पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल- सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली होती. दरम्यान, गडचिरोली पोलिसांनी काल चार जहाल नक्षलवाद्यांना अटक केली.
****
अहिल्यानगरमधून १४ टन डाळिंबांची सागरी मार्गानं अमेरिकेत न्यूयॉर्क इथं निर्यात करण्यात आली. कृषी आणि प्रक्रियाकृत खाद्यान्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण- अपेडाच्या माध्यमातून भारतीय डाळिंबाची पहिली व्यावसायिक निर्यात आहे. भारतीय डाळिंब जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या वतीनं हा उपक्रम राबवला जात असून, त्या अंतर्गत भगवा या जातीच्या डाळिंबाची खेप पाठवण्यात आली.
****
यंदा राज्यात ८० लाख टन साखरेचं उत्पादन झालं असून वर्षीच्या तुलनेत ते तीस लाख टनांनी घटलं आहे.यंदा साखर उताऱ्यातही पाऊण टक्क्याची घट झाली आहे. सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झालं आहे. तसंच, मागिल वर्षीच्या २०७ साखर कारखान्यांऐवजी यंदा दोनशेच कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला.
****
मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात भारतानं प्रिस्टिना कोसोवो इथं १४ व्या युरोपियन गर्ल्स मॅथेमॅटिकल ऑलिंपियाड २०२५ मध्ये २ रौप्य आणि २ कांस्य पदकं पटकावलेल्या विद्यार्थिनींना काल गौरवण्यात आलं. यामध्ये केरळच्या संजना चाकोनं रौप्य पदक, मुंबईच्या श्रेया मुंधडानं रौप्य पदक, पुण्याच्या सई पाटीलनं कांस्य पदक आणि कोलकताच्या श्रेया रे हिनं कांस्य पदक मिळवलं आहे. त्यांना राष्ट्रीय उच्च गणित मंडळाच्या सदस्य सचिव डॉ. जया मुखर्जी यांनी सन्मानित केलं.
****
नुकत्याच मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यामुळे होणाऱ्या फायद्यांविषयी, विशेषतः मुस्लिमांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष उद्यापासून पाच मे पर्यंत देशव्यापी मोहीम राबवणार आहे.
****
भारताचा नेमबाज अर्जुन बाबूटा यानं आई.एस.एस.एफ.- विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं आहे. पेरूची राजधानी लीमा इथं दहा मीटर एयर राइफल प्रकारात थोडयाशा फरकानं अर्जुनचं सुवर्ण पदक हुकलं.या स्पर्धेत भारताच्या सुरुचि इंदर सिंह हीनं सौरभ चौधरीसह मिश्र सांघिक प्रकारात एक आणि दहा मीटर एयर राइफल प्रकारात दुसरं अशी दोन सुवर्ण पदकं पटकावली आहेत.यासह या वैयक्तिक प्रकारात मनु भाकरनं रौप्य पदकाची कमाई केली आहे.
****
आयपीएल टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेत अहमदाबाद इथं काल झालेल्या एका सामन्यात गुजरात टायटन्सनं दिल्ली कॅपिटल्स संघाचा सात गडी राखून पराभव केला. तर,जयपूर इथं झालेल्या अन्य सामन्यात, लखनौ सुपर जायंट्सनं राजस्थान रॉयल्सला दोन धावांनी हरवलं. स्पर्धेत आज दुपारी साडेतीन वाजता चंदीगड इथं पंजाब किंग्ज आणि रॉयल चँलेजर्स बंगरुळू तर,रात्री साडेसातला मुंबईमध्ये मुंबई इंडीयन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज असे सामने होत आहेत.
****
No comments:
Post a Comment