Friday, 18 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 18.04.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 18 April 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक १८ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      वक्फ कायद्यासंदर्भात पुढील सुनावणीपर्यंत वक्फ बोर्ड किंवा वक्फ परिषदेवर कोणतीही नियुक्ती नाही-केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयासमोर ग्वाही

·      संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर

·      राज्यसेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मे दरम्यान घेण्याचा एमपीएससीचा निर्णय

·      राज्यशासनाचे चित्रपट पुरस्कार जाहीर; चित्रपती व्ही शांताराम पुरस्कार महेश मांजरेकर यांना तर भीमराव पांचाळे यांना लता मंगेशकर पुरस्कार

आणि

·      उष्णतेच्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांचं आवाहन

****

वक्फ कायद्यासंदर्भात पुढील सुनावणीपर्यंत वक्फ बोर्ड किंवा वक्फ परिषदेवर कोणतीही नियुक्ती करणार नाही, अशी ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे. वक्फ सुधारणा कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने काही प्रश्न विचारले, केंद्र सरकारने याबाबत आपलं उत्तर सादर करण्यास, सात दिवसांची मुदत मागितली आहे. पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही वक्फ मालमत्ता बेदखल केली जाणार नाही, असंही सरकारनं सांगितलं. या प्रकरणी पुढची सुनावणी पाच मे रोजी होणार आहे.

दरम्यान, दाऊदी बोहरा समाजाच्या एका शिष्टमंडळानं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन वक्फ सुधारणा कायद्याबद्दल त्यांचे आभार मानले.

****

देशातल्या नागरिकांच्या वित्तीय सक्षमीकरणासाठी सरकार कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. मुंबई शेअर बाजाराच्या दीडशेव्या स्थापना दिनानिमित्त काल मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनी संपत्ती निर्मितीचं दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवावं, त्यासाठी संयमाने निर्णय घेण्याचा सल्ला सीतारामन यांनी दिला.

****

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साडेचार वाजता विशेष विमानाने ते शहरात पोहोचतील, सिडको परिसरात कॅनॉट इथल्या उद्यानात उभारण्यात आलेल्या वीरशिरोमणी महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमानंतर संरक्षणमंत्री उद्योजकांशी संवाद साधतील. त्यानंतर ते विशेष विमानाने लखनऊ कडे रवाना होणार आहेत.

दरम्यान या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहरात तसंच संबंधित परिसरात वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी याची नोंद घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

राज्यसेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मे दरम्यान घेण्याचा निर्णय राज्य लोकसेवा आयोग - एमपीएससीनं घेतला आहे. या परीक्षा २६ ते २८ एप्रिल दरम्यान घेण्याचे नियोजन होतं, मात्र तयारीला कमी वेळ मिळाल्याचं कारण देत उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

****

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे चित्रपट पुरस्कार काल जाहीर झाले. चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना, स्वर्गीय राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना, तर गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना, तर स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री काजोल यांना जाहीर झाला आहे. येत्या २५ एप्रिलला मुंबईत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहेत.

****

गुडफ्रायडे आज पाळला जात आहे. प्रेषित येशू ख्रिस्ताला आजच्या दिवशी सुळावर चढवल्याचं मानलं जातं. या निमित्तानं विविध ठिकाणच्या चर्चमधून विशेष प्रार्थनेसह अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

जागतिक वारसा दिन आज साजरा होत आहे. या निमित्तानं भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं देशभरातल्या सर्व वारसा स्थळांवर आज मोफत प्रवेशाची घोषणा केली आहे. आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात असलेला वारसा, ही यंदाच्या या दिनाची संकल्पना आहे.

****

उष्णतेच्या समस्येविरुद्ध लढण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज, पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी व्यक्त केली आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं उष्णतेशी लढा, या कार्यशाळेत ते बोलत होते. देशात २८१ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा धोका असल्याकडे देऊळगावकर यांनी लक्ष वेधलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी बोलतांना, वृक्षारोपण आणि जलपुनर्भरण या उपायांद्वारे भावी पिढ्यांचं जगणं सुखकर करणारं पर्यावरण आपए देऊ शकतो, असं नमूद केलं. ते म्हणाले..

बाईट – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

****

आगामी काही दिवसांमध्ये संभाव्य उष्णतेच्या लाटेची शक्यता पाहता, नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांवर भर द्यावा, असं आवाहन बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केलं आहे. उष्मघातावरील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात सज्जता ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहे.

****

राष्ट्रीय पोषण पंधरवडा सध्या राबवला जात आहे. माता बालमृत्यूदर कमी करण्यासह कुपोषण निर्मुलनासाठी हा पंधरवडा पाळला जातो. लातूर जिल्ह्यातल्या साई गावचे उपसरपंच अमोल पवार यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले...

बाईट – अमोल पवार

या गावच्या अंगणवाडी सेविका अनिता शिंदे यांनी या पंधरवड्यात राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली...

बाईट – अनिता शिंदे

 

****

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०२४-२५ मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातल्या आरोग्‍य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्‍या हस्‍ते काल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्ह्यात माता आणि बालमृत्यू दर कमी करण्याचं आवाहन कावली यांनी यावेळी केलं.

****

नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी इथं पाणीपुरी खाल्याने ३१ महाविद्यालय विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या सर्वांवर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

****

धाराशिव जिल्ह्यातही जेवणातून ७९ जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उमरगा तालुक्यातल्या कराळी इथं जागरण गोंधळ कार्यक्रमाच्या जेवणातून ही विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांपैकी २४ रुग्णांवर उमरगा उपजिल्हा रुग्णालयात, ४५ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार तर मूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दहा जणांवर उपचार केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

बीड जिल्ह्यातले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बाबासाहेब आगे यांच्या निर्घृण हत्येनंतर पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आगे यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली आहे. लोकसभा निवडणुकीत बुथ विस्तारक म्हणून आगे यांनी मोठी मेहनत घेतली होती, अशा मनमिळावू कार्यकर्त्याची अशा प्रकारे हत्या होणं हे वेदनादायी असल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली.

****

परभणी जिल्ह्यातल्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या वतीने शिक्षकांची गुणवत्तापूर्ण शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा घेण्यात आली. उत्कृष्ट चित्रफीत तयार करणाऱ्या शिक्षकांना तालुका आणि जिल्हा स्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक देऊन गौरवण्यात आलं. विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन तंत्रज्ञानासोबतच संस्कारांची रुजवणूक होणं गरजेचं असल्याचं मत, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्वतयारी आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प दोन अंतर्गत घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेला काल उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. खरीप हंगामासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पाणलोट क्षेत्रातले विविध उपाय, स्थळनिश्चिती आणि योजनांची अंमलबजावणी यावर सविस्तर मांडणी करण्यात आली.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेत रस्ते, पाणंद रस्ते मोकळे करुन देण्यासाठी तालुका पातळीवर सस्ती अदालत उपक्रम राबवण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी इथं बनावट जन्मदाखले देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महसूल अधिकाऱ्यांनी चौदा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली.

****

हवामान

राज्यात काल सर्वाधिक ४३ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात धाराशिव इथं ४० पूर्णांक दोन अंश, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक चार अंश, परभणी इथं ४१ पूर्णांक पाच अंश तर बीड इथं ४२ पूर्णांक चार सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: