Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 19 April 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ एप्रिल २०२५ दुपारी १.०० वा.
****
पाणी टंचाईग्रस्त भागात उपाययोजना
करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी सांगितलं आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यातील अनेक भागातली पाणी
टंचाई सोडवण्यासाठी आराखडा तयार केला जात असून उपाययोजनाही करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितलं. टंचाईग्रस्त जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना
उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. राज्यात मराठी भाषा अनिवार्य असून ती
सर्वांनी शिकायला हवी, यासह अन्य भाषा
शिकायला हव्या असंही ते म्हणाले. नाशिक दंगल सुनियोजितपणे घडवण्याचा प्रयत्न झाला असून
या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई केली असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी एनटीएनं
आज सकाळी संयुक्त प्रवेश परीक्षा जे ई ई मेन २०२५ सत्र २ चे निकाल जाहीर केले आहेत.
यंदा देशभरातून एकूण २४ विद्यार्थ्यांनी १०० उत्कृष्ठ एनटीए गुणांकन प्राप्त केलं आहे.
सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या आयुष रवी चौधरी याच्यासह राजस्थानच्या
मोहम्मद अनस आणि आयुष सिंघल, दिलीच्या दक्ष आणि
हर्ष झा तसंच पश्चिम बंगालच्या देवदत्त माझी या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कट ऑफसह
संपूर्ण निकाल jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे.
****
चार धाम यात्रेच्या धर्तीवर
३० एप्रिल रोजी यमुनोत्री धाम आणि गंगोत्री धामचे दरवाजेही भाविकांसाठी उघडले जाणार
आहेत तसंचे श्री केदारनाथ धामचे दरवाजे
दोन मे रोजी आणि श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे चार मे रोजी उघडणार आहेत, अशी माहिती श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या वतीनं देण्यात
आली.
****
आज जागतिक यकृत दिवस आहे. यकृताच्या
आजारांबद्दल जागरुकता वाढवणं आणि तेलकट तसंच शरीराला नुकसानदायक खाद्य पदार्थांचं सेवन
टाळून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याच्या उद्देशानं आजचा जागतिक यकृत दिवस साजरा केला
जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार, भारतात यकृतासंबंधीचे आजार हे मृत्युचं दहावं सामान्य कारण आहे.
हेपेटायटस बी, सी आणि हेपेटोसेलुलर कार्सिनिमा हे आजार चुकीची
जीवनशैली, मद्यपान, अमली पदार्थांचं अतिसेवन, नुकसानदायक खाद्यपदार्थांचं
नियमित सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळं होतात. आहार हेच औषध हे आजच्या यकृत दिनाचं
ब्रीदवाक्य आहे.
****
आधार केंद्र चालकांच्या मानधनात
वाढ करण्यात आली असून आता त्यांना एका आधार नोंदणीसाठी २० रुपयांऐवजी ५० रुपये मिळणार
असल्याचं, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं
आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यातील सुमारे १०० आधार
केंद्र चालकांना आज शेलार यांच्या हस्ते आधार संच सुपूर्द करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. शुन्य ते पाच वयोगटातील बालकांची नोंदणी
तर ५ ते १७ वयोगटातील मुला-मुलींच्या बायोमेट्रिकमध्ये वाढ होण्यासाठी तीन महिन्यांत
या नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आधार केंद्र चालकांना बक्षीस योजना जाहीर केल्याचं
आशिष शेलार यांनी सांगितलं.
****
जंगलातील वनसंपदा वणवा लागून
नष्ट होऊ नये, यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास
करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी ड्रोन, हेलिकॉप्टरसह इतर अत्याधुनिक यंत्रणाचा वापर करावा, असे निर्देश वन मंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. वनविभागातील
योजना तसंच उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महाबळेश्वर इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते.
वन विभागाच्या ज्या जमिनीवर झाडं उगवत नाहीत अशा जागांवर सोलर पार्क उभारण्याचा राज्य
शासनाचा मानस असून वन विभागातील सर्व रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय
आयुक्त दिलीप गावडे यांनी आज शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या जायकवाडी समांतर
पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी केली. यावेळी जॅकवेलचे काम अपूर्ण असल्याचं विभागीय
आयुक्त गावडे यांच्या निदर्शनास आलं. मजुरांचा अभाव आणि उंची वाढल्यामुळे मजूरांना काम करण्यास अडचण येत असल्याची बाब त्यांनी लक्षात घेतली.
मजुरांची संख्या वाढवावी, २०० एमएलडी पाणी
पुरवठा करण्यासाठी आवश्यक भाग प्रथम पूर्ण करुन जॅकवेलच्या तिन्ही बाजूनं तळापर्यंत
मातीचा भराव करावा, आदी निर्देश त्यांनी दिले आहेत.
****
एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या
आठवड्यात उन्हाचा पारा आता ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. उन्हाच्या या वाढत्या
तीव्रतेमुळं पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत
आहे. या बाष्पीभवनामुळं धरणातील जलसाठा झपाट्यानं कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
****
No comments:
Post a Comment