Monday, 21 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 21 April 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

भारत आजच्या काळात केवळ विकासाकरता ओळखला जात नसून, प्रशासन, पारदर्शकता आणि नवोन्मेष यामध्ये नवीन मापदंड स्थापित करत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. १७ व्या नागरी सेवा दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. २०१४ पासून देशातल्या प्रशासकीय सेवेत पद्धतशीर बदल सक्रियपणे राबवले जात असून, आपण स्वतःला मोठ्या वेगाने बदलत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारताचा आकांक्षी समाज अभूतपूर्व स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा बाळगतो, या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, आपल्याला प्रगतीचा तितकाच अभूतपूर्व वेग आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले

बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास, आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबवले जाणारे विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात.

१९४७ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी आजच्याच दिवशी प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केलं होतं. त्यानिमित्त हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यानिमित्त नागरी सेवेतल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सार्वजनिक सेवा, धोरणनिर्मिती आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये नागरी सेवकांचं काम, नागरिकांच्या कल्याणात आणि देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, राष्ट्राची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यात आणि प्रभावी प्रशासनात नवीन मापदंड स्थापित करण्यात नागरी सेवा महत्त्वाची असल्याचं, राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

****

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॅान्स भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असून, आज सकाळी त्यांचं नवी दिल्लीत आगमन झालं. विमानतळावर त्यांचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वागत केलं. यावेळी जे डी व्हॅान्स यांना मानवंदना देण्यात आली.

****

भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इसरोच्या महत्वाकांक्षी स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत, अंतराळात दोन उपग्रहांच्या दरम्यानची जोडणी म्हणजेच डॉकिंगची दुसरी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. केंद्रीय अंतराळ मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या ३० डिसेंबरला श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन पीएसएलव्ही सी - 16 या प्रक्षेपकाद्वारे या उपग्रहांचं महत्वाकांक्षी प्रक्षेपण करण्यात आलं होतं. या मोहिमेत इस्रोचे HDHC झिरो वन आणि HDHC झिरो - टू हे दोन उपग्रह प्रक्षेपक वाहनातून झेपावले. हे उपग्रह आपापल्या कक्षेत स्थिरावले आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ४७० किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेमध्ये स्थापित झाले. त्यांनतर त्यांच्यातील अंतर कमी करून ते एकमेकांना जोडण्याची चाचणी करण्यात आली. या उपग्रहांचं पहिलं डॉकिंग १६ जानेवारीला पूर्ण करण्यात आलं आणि १३ मार्च ला या उपग्रहांचं अनडॉकिंग म्हणजेच ते वेगळे करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. पुढील दोन आठवड्यात असे आणखी प्रयोग करण्याचं नियोजन असल्याचं, जितेंद्र सिंह यांनी सांगितलं.

****

झारखंड जिल्ह्यातल्या बोकारो इथं पोलिस आणि सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी मारले गेले. आज सकाळी ही चकमक झाली. यामध्ये एक कोटी रुपे बक्षीस असलेल्या विवेक या जहाल नक्षलवाद्याचा समावेश आहे. चकमकीच्या ठिकाणाहून एक ए के सिरीज रायफलसह इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती, पोलिस महासंचालक अनुराग गुप्ता यांनी दिली.

****

पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जागतिक वसुंधरा ‍दिनानिमित्त २२ एप्रिल ते १ मे या काळात राज्यात पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवाहा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं, असं आवाहन, या विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. २२ एप्रिलला मुंबईतल्या पवई तलावाच्या स्वच्छता मोहिमेत मुंडे सहभागी होणार आहेत. २२ एप्रिल या जागतिक वसुंधरा दिनाचं औचित्य साधून एक मे पर्यंत वसुंधरेचा आराधना करण्यासाठी ९ दिवस विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. २२ ते २४ एप्रिल दरम्यान सर्वांनी आपापल्या भागातील जलस्रोत स्वच्छ करावेत, यामध्ये ग्रामसेवकांपासून खासदार, आमदारांनीही सहभागी व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं.

****

No comments: