Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 21 April 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ एप्रिल २०२५ सायंकाळी ६.१०
****
· प्रशासन,
पारदर्शकता आणि नवोन्मेष यामध्ये भारत नवीन मापदंड स्थापित करत
असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
· महाराष्ट्रात विविध क्षेत्रातल्या कायापालटाचं श्रेय प्रशासकीय अधिकाऱ्यांना-मुख्यमंत्र्यांचे
गौरवोद्गार
· राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदी ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांची नियुक्ती
· रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांचं व्हॅटिकन सिटी इथं निधन
आणि
· बीड इथल्या सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर महाविद्यालयातल्या १६ एनसीसी कॅडेट्सची
संरक्षण दलाच्या विविध क्षेत्रात निवड
****
भारत आजच्या काळात केवळ विकासाकरता ओळखला
जात नसून, प्रशासन,
पारदर्शकता आणि नवोन्मेष यामध्ये नवीन मापदंड स्थापित करत असल्याचं
प्रतिपादन,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. १७ व्या नागरी सेवा
दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. २०१४ पासून देशातल्या
प्रशासकीय सेवेत पद्धतशीर बदल सक्रियपणे राबवले जात असून, आपण
स्वतःला मोठ्या वेगाने बदलत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. भारताचा आकांक्षी समाज अभूतपूर्व
स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा बाळगतो, या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी, आपल्याला
प्रगतीचा तितकाच अभूतपूर्व वेग आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट – पंतप्रधान नरेंद्र मोदी
****
गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील
डव्वा ग्रामपंचायतीनं राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२३-२४ अंतर्गत देशातून प्रथम क्रमांक
पटकावला आहे. हवामान बदलामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या
उल्लेखनीय कायार्साठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
****
महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात झालेल्या
कायापालटाचं श्रेय प्रशासकीय अधिकाऱ्यांना असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज मुंबईत राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानाचं पारितोषिक
वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. छत्रपती
शिवरायांनी घालून दिलेले अनेक नियम आजही कालजयी असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त
केलं. ते म्हणाले –
बाईट - मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस
आपल्या गेल्या सुमारे तीन दशकांच्या कारकिर्दीत
या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून आपल्याला बरंच काही
शिकण्याची संधी मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार
उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी आज मराठवाड्यातील पाणी प्रश्नाचा दूर दृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सुरू असलेल्या पाणी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
या बैठकीत चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी ज्येष्ठ
पत्रकार राहुल पांडे यांना आज राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली. या समारंभाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सदस्य परिणय फुके, मुख्य
सचिव सुजाता सौनिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते.
यावेळी रवींद्र ठाकरे,
प्रकाश इंदलकर आणि गजानन निमदेव यांना देखील राज्यपाल राधाकृष्णन
यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.
****
रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख पोप फ्रान्सिस
यांचं आज व्हॅटिकन सिटी इथं निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही आठवड्यांपासून
ते आजारी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल दु:ख
व्यक्त केलं आहे. पोप फ्रान्सिस यांना जगभरातील लोक करुणा, नम्रता
आणि आध्यात्मिक धैर्याचे दीपस्तंभ म्हणून नेहमीच लक्षात ठेवतील, अशा
शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पोप फ्रान्सिस यांच्या कार्यकाळाचा संक्षिप्त
आढावा घेणारा हा वृत्तांत –
पोप म्हणून निवड झालेली व्यक्ती आजन्म या पदावर राहते. मात्र १२ फेब्रुवारी २०१३
हा दिवस ख्रिश्चन धर्मियांसाठी वेगळा सूर्य घेऊन उगवला. तत्कालीन पोप बेनेडिक्ट सोळावे
यांनी आपण चालू महिन्याच्या शेवटी पोप पदाचा राजीनामा देत असल्याचं तडकाफडकी जाहीर
केलं. व्हॅटिकन सिटीत पोप पदाच्या सहाशे वर्षांच्या इतिहासातला हा पहिलाच राजीनामा.
त्यानंतर पुढचा पोप निवडण्याची प्रक्रिया तातडीने सुरू झाली, आणि निवड समितीने होर्हे मारियो बेर्गोलियो यांची २६६ वे पोप म्हणून निवड केली.
व्हॅटिकन चर्चचा हा निर्णयही ऐतिहासिक ठरला, कारण पोप पदी निवड होणारे हे पहिलेच अमेरिकी नागरिक होते. १३ मार्च २०१३ रोजी होर्हे
मारियो बेर्गोलियो यांनी पोप फ्रान्सिस या नव्या नावासह पोप पदाची सूत्रं स्वीकारली.
२०२२ मध्ये त्यांनी कॅनडाला दिलेल्या भेटीत चर्चकडून गेल्या
शतकात तिथल्या स्थानिकांवर विशेषत: बालकांवर झालेल्या अनन्वित अत्याचाराबद्दल माफी
मागितली, दु:खितांचे कैवारी अशी त्यांची
असलेली ओळख यानंतर आणखी दृढ झाली.
आकाशवाणी बातम्यांसाठी, हर्षवर्धन दीक्षित, छत्रपती संभाजीनगर
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं दुसऱ्यांदा
स्पेस डॉकिंग प्रयोगाअंतर्गत अवकाशात उपग्रहांची जोडणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.
येत्या दोन आठवड्यात असे आणखी प्रयोग करणार असल्याची माहिती, केंद्रीय
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी समाज माध्यमांवरील संदेशात
दिली आहे.
****
निलंबित प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा
खेडकर यांच्याविरुद्ध कोणतीही दंडात्मक कारवाई न करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने
२१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यांच्यावर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आरक्षणाचा
गैरवापर केल्याचा आरोप आहे. न्यायालयाने खेडकर यांना २ मे रोजी चौकशीसाठी दिल्ली पोलिसांसमोर
हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या खरीप
हंगामासाठी संरक्षित खतसाठा पुरवठा कालमर्यादेचे पालन करावं असे निर्देश जिल्हाधिकारी
दिलीप स्वामी यांनी नियुक्त पुरवठादार संस्थांना दिले. जिल्हास्तरीय संरक्षित खत साठा
संनियंत्रण समितीची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी
ते बोलत होते. यासाठी ८००० मेट्रिक टन युरिया तर १५०० मेट्रिक टन डी.ए.पी मे महिना
अखेर उपलब्ध करुन द्यावा असे निर्देश स्वामी यांनी दिले. जिल्ह्यातील तापमान वाढ, पाणीटंचाईवर
कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी कृषी विभागानं मृद, जल
संधारण, वृक्ष लागवड यासारखे उपक्रम मोहीम स्वरुपात राबवावे, असे
निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
****
बीड इथल्या सौ.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना-एनसीसीच्या १६ कॅडेट्सची संरक्षण दलाच्या विविध
क्षेत्रात निवड झाली आहे. यात लष्करी दल, निम लष्करी दल, नौदल, महाराष्ट्र
पोलीस, महाराष्ट्र होमगार्ड सेवा, महाराष्ट्र सुरक्षा बल या क्षेत्रात या विद्यार्थ्यांची
निवड झाली आहे. संस्थेच्या प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर, उपाध्यक्ष
डॉक्टर योगेश क्षीरसागर,
५१ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील बी. रेड्डी
यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
****
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद दलामार्फत
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन परिचय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत
प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी विनोद
खिरोळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. योवळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना
आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. नैसर्गिक आपत्ती दरम्यान
करण्यात येणाऱ्या उपाययोजनांविषयी यावेळी माहिती देण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यातील तहसिलदार कार्यालयात २४
आणि २५ एप्रिल रोजी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ७८५
सरपंच पदासाठी १६० जागा अनुसूचित जातीसाठी, २१ जागा अनुसूचित जमाती, तर
मागास प्रवर्गासाठी २११ जागा राखीव असून ३९३ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असतील.
यात ३९४ ठिकाणी महिला सरपंच राहणार आहेत.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट
रायडर्सविरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना कोलकात्यात होणार आहे. काल एका सामन्यात रॉयल
चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्स इलेव्हन संघाचा तर मुंबई इंडियन्सने चेन्नई
सुपर किंग्ज संघाचा पराभव केला.
****
No comments:
Post a Comment