Monday, 21 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 21.04.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 21 April 2025

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २१ एप्रिल २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      पिंक ई-रिक्षा योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं महत्वाचं पाऊल असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन, भविष्यात दोन हजार महिलांना ई - रिक्षांचं वितरण करणार

·      राज्यात विद्यार्थ्यांना हिंदी भाषा अनिवार्य केली नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, नवीन शैक्षणिक धोरणानुसार तीन भाषा शिकण्याची संधी

·      वेव्ह्ज परिषदेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचा प्रसार माध्यमांतल्या वरिष्ठांशी संवाद

·      'स्थळ', 'स्नो फ्लॉवर', खालिद का शिवाजी' आणि 'जुनं फर्निचर' या मराठी चित्रपटांची कान महोत्सवासाठी निवड

·      विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून दहा लाख रुपये करण्याची सरकारची घोषणा

आणि

·      मराठवाड्यात उष्णतेचा पारा वाढला, परभणी इथं ४३ अंश सेल्सिअस तापमानची नोंद

****

राज्य सरकारच्या महिला सक्षमीकरण उपक्रमाअंतर्गत विविध योजना कार्यान्वित केल्या जात असून, पिंक ई - रिक्षा हा उपक्रम देखील याचाच एक भाग असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिलांना पिंक ई - रिक्षांचं वितरण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. पिंक ई-रिक्षा या योजनेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या सुरक्षेच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल पडल्याचं ते म्हणाले. भविष्यात दोन हजार महिलांना ई - रिक्षांचं वितरण करत त्यांना रोजगार मिळवून देण्याचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं,

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या उपक्रमातून महिलांना आपल्या पायावर उभं राहण्याचा एक मार्ग उपलब्ध करुन दिला आहे, त्याशिवाय महिलांनीच चालवलेल्या रिक्षांमुळे प्रवासी महिलांना अधिक सुरक्षित वाटेल, तसंच या ई - रिक्षा असल्यामुळे कोणतंही प्रदूषण होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

या योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर या आठ जिल्ह्यांत शासनाकडून इच्छुक महिलांना रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य आणि ई-रिक्षा चालवण्यासाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी काळात विमानतळ, पर्यटन स्थळं अशा ठिकाणीही पिंक ई-रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं, महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी सांगितलं.

****

दरम्यान, पुण्यात एका कार्यक्रमानंतर वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यातल्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा अनिवार्य केली नसल्याचं स्पष्ट केलं. नवीन शैक्षणिक धोरणानुसार तीन भाषा शिकण्याची संधी दिलेली असून, त्यामध्ये दोन भारतीय भाषा अनिवार्य असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतू कोणाला हिंदिशिवाय अन्य भाषा शिकायची असेल, तर तशी मुभा विद्यार्थ्यांना दिली जाईल, याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

****

राज्यात काँग्रेसच्या दोन नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भोर विधानसभा मतदारसंघातले माजी आमदार संग्राम थोपटे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, भाजपामधे प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. अहिल्यानगर इथं काल कार्यकर्त्यांबरोबर बैठक घेतल्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनीही पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे पाठवला आहे.

****

१७ व्या नागरी सेवा दिनानिमित्त आज नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून, नागरी सेवेतल्या कर्मचाऱ्यांना संबोधित करणार आहेत. याशिवाय प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास, आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबवले जाणारे विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात.

****

मुंबईत आगामी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट - वेव्ह्ज २०२५ च्या निमित्तानं, माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल देशभरातल्या प्रसार माध्यमांतल्या वरिष्ठांशी संवाद साधला. बदलत्या तंत्रज्ञानानुसार नवनवीन गोष्टी आपल्यासमोर येत आहेत, या नव्या गोष्टींसाठी तयार राहण्याकरता एकत्रित प्रयत्न करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. चांगल्या दर्जाच्या कलाकृतीची निर्मिती आता देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून होऊ शकते आणि त्याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

दरम्यान, माध्यम समुदायाकडून मिळालेल्या चांगल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर वेव्ह्ज २०२५ साठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी मुदत तीन दिवस वाढवण्यात आली आहे. आजपासून बुधवार पर्यंत ही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. वेव्ह्ज - २०२५ चं आयोजन येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत करयात आला आहे.

****

राज्य चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे फ्रान्समधल्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' या तीन चित्रपटांचा समावेश आहे, तर 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ मे २०२५ या कालावधीत कान चित्रपट महोत्सव होणार आहे.

****

विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून दहा लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा, राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरी जिल्ह्यातलं मालगुंड हे गाव काल सामंत यांच्या उपस्थितीत कवितांचं गाव म्हणून घोषित करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. तसंच मालगुंडच्या कवी केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. शासनाचा साहित्याकडे बघण्याचा दृष्टीकोन डोळस पद्धतीने असला पाहिजे, असं मतही सामंत यांनी यावेळी व्यक्त केलं.

या उपक्रमात मालगुंडमधल्या ३०, तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या पाच घरांचा समावेश करण्यात आला असून, या घरांमध्ये पुस्तकं ठेवली जाणार आहेत. त्यापैकी दोन दालनांचं काल प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन झालं.

****

अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली असून, बीडपर्यंत रेल्वे रूळाचं काम पूर्ण झालं आहे. बीड ते परळी या महत्वाच्या टप्याचं काम देखील आता वेगात सुरू असून, काल सकाळी बीड ते वडवणी रेल्वे इंजिनची चाचणी सुरू करण्यात आली. बिंदुसरा नदीवरील रेल्वे पुलावरून हे इंजिन वडवणीकडे रवाना झालं. परिसरातल्या नागरिकांनी ही चाचणी पाहण्यासाठी गर्दी केली होती, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

परभणी जिल्हा परिषदेतल्या विविध योजनांची माहिती आता क्यू आर कोडवर मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांच्या संकल्पनेतून, तसंच मिशन शंभर दिवस कार्यक्रमाअंतर्गत हे क्यू आर कोड तयार करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर,

बाईट – सुदर्शन चापके, परभणी

****

रोजगार हमीच्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. पैठण तालुक्यातल्या ११० गावांपैकी ३० गावांची हे पथक तपासणी करणार आहे. अभिलेखे, सोई सुविधा उपलब्ध आहेत की नाही याची चौकशी या दौऱ्याअंतर्गत केली जाणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

****

बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि क्रीडा परिषदेतर्फे दहा ते १९ वर्ष वयोगसाठी आजपासून उन्हाळी प्रशिक्षण शिबीर घेण्यात येत आहे. येत्या ३० एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या शिबीरात विविध १६ क्रीडा प्रकारांचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

****

पेरु मध्ये सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एयर रायफल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या रुद्रांक्ष पाटील आणि आर्या बोरसे यांनी रौप्य पदक जिंकलं. काल झालेल्या अंतिम फेरीत रुद्रांक्ष आणि आर्या यांच्या जोडीला नॉर्वेच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत भारत दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्य पदकासह तिसर्या स्थानावर आहे.

****

हवामान

राज्यात काल सर्वात जास्त ४४ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक सहा, बीड ४२ पूर्णांक एक, तर छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: