Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 21 April 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ एप्रिल
२०२५ सकाळी ११.०० वाजता.
****
१७ वा नागरी सेवा दिन आज साजरा
होत आहे. १९४७ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी आजच्याच दिवशी प्रशिक्षणार्थी प्रशासकीय
अधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केलं होतं. त्यानिमित्त हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून
साजरा केला जातो.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी
यानिमित्त नागरी सेवेतल्या अधिकारी कर्मचार्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सार्वजनिक
सेवा, धोरणनिर्मिती आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये नागरी
सेवकांची भूमिका नागरिकांच्या कल्याणात आणि देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत
आहे. राष्ट्राची महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यात आणि प्रभावी प्रशासनात नवीन
मापदंड स्थापित करण्यात नागरी सेवक महत्त्वाची भूमिका बजावतात, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
यानिमित्त आज नवी दिल्लीत होणाऱ्या
कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार असून, नागरी सेवेतल्या कर्मचाऱ्यांना संबोधित करणार आहेत. याशिवाय
प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री पुरस्कारानं
सन्मानित केलं जाणार आहे. जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास, आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राबवले जाणारे विकास कार्यक्रम आणि
नवोन्मेष या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विविध श्रेणींमध्ये हे पुरस्कार
प्रदान केले जातात.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
प्रेरणेने देशात सुरु केलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींना त्यांच्या
बँक खात्यात थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे पैसे देण्याच्या योजनेमुळे देशाचे आतापर्यंत
तीन लाख ४८ हजार कोटी रुपये वाचले आहेत, आणि पैशाची गळती रोखण्यात मोठं यश मिळालं आहे. यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या धोरणात्मक
अहवालाचा संदर्भ देत, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव
यांनी समाज माध्यमाद्वारे ही माहिती दिली. या डीबीटी अर्थात थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे
पैसे देणाच्या योजनेमुळे प्रशासनात पारदर्शकता वाढली असून, २०१३ पूर्वी पेक्षा व.विध योजनांचे लाभार्थी १६ पटीने वाढले
असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं.
****
जम्मू आणि काश्मीरच्या रामबन
जिल्ह्यात सेरी बागन इथं झालेल्या मुसळधार पावसानंतर भूस्खलन झालं असून, त्यात तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश
असून १०० नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. भूस्खलनानंतर या भागातले अनेक रस्ते वाहतुकीसाठी
बंद ठेवले आहेत.
लडाखमध्येही जोरदार हिमवृष्टी
आणि गारपीटीमुळे अनेक ठिकाणचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुढचे काही दिवस हिमवादळाची
शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली असून सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
****
वक्फ सुधारणा कायदा भाजपने समाजात
फूट पाडण्यासाठी आणला आहे, असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी
केला. बक्सरमधे आयोजित जाहीर सभेत ते काल बालत होते. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालचं
जेडीयू आणि भाजपचं आघाडी सरकार हे संधीसाधू गठबंधन आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
****
समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला
जगवण्याची जबाबदारी समाजाची आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. भारत विकास परिषदेचं दिव्यांग पुनर्वसन केंद्र
आणि ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीनं दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवण्याचा विक्रम केला
आहे; या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली
असून; त्याचं प्रमाणपत्र काल प्रदान करण्यात आलं; या सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर
मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
विचारांना जागतिक व्यासपीठावर नेण्याचा संकल्प असल्याचं सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष
शेलार यांनी सांगितलं. संविधानाचा अमृत महोत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीनिमित्त सादर करण्यात आलेल्या जागर संविधानाचा गौरव विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचा; या सांगीतिक कार्यक्रमात ते काल बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांनी संविधानातून दिलेली मूल्य, तत्व आणि विचार
जगाला मार्गदर्शक आहेत; त्यामुळे अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात या
संदर्भात चर्चासत्र, शोधनिबंध सादर करण्यात येतील, असं शेलार म्हणाले.
****
जॉर्डन इथं कालपासून सुरू झालेल्या
१५ आणि १७ वर्षांखालच्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशीप स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतानं
दोन विजय मिळवले. हार्दिक दहिया आणि रुद्राक्ष सिंग यांनी प्राथमिक फेरीत विजय मिळवत
भारताची दमदार सुरुवात केली. या स्पर्धेत भारताचे ५६ मुष्टीयोद्धे सहभागी झाले आहेत.
यात १५ वर्षांखालच्या ३०, आणि १७ वर्षांखालच्या २६ खेळाडूंचा समावेश आहे.
****
पेरु मध्ये सुरु असलेल्या आयएसएसएफ
नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत १० मीटर एयर रायफल मिश्र सांघिक प्रकारात भारताच्या रुद्रांक्ष
पाटील आणि आर्या बोरसे यांनी रौप्य पदक जिंकलं. काल झालेल्या अंतिम फेरीत रुद्रांक्ष
आणि आर्या यांच्या जोडीला नॉर्वेच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. या स्पर्धेत भारत
दोन सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई करत तिसर्या
स्थानावर आहे.
****
No comments:
Post a Comment