Tuesday, 22 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 22.04.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 22 April 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: २२ एप्रिल २०२५ सकाळी ११.०० वाजता.

****

आज जागतिक वसुंधरा दिन आहे. पर्यावरणाबाबतची जागरुकता वाढवण्यासाठी १९७० पासून दरवर्षी २२ एप्रिल रोजी वसुंधरा दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. आपल्या पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी कृतीशील राहाण्यासाठी प्रेरणा देणं तसंच स्वच्छता आणि वृक्षारोपण यासारख्या सामुदायिक प्रयत्नांना चालना देणं हा यामागचा उद्देश आहे. ‘आपली वसुंधरा, आपली ऊर्जा’ ही या वर्षीच्या वसुंधरा दिनाची संकल्पना आहे.

राज्यात पर्यावरण, हवामान बदल विभागातर्फे आजपासून एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापर्यंत वसुंधरेची आराधना करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये राज्यातल्या प्रत्येक गावातले पाण्याचे विविध स्त्रोत तसंच नद्या, नाले, तलाव यांची स्वच्छता केली जाणार आहे. 

****

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दिल्लीत होणाऱ्या हवामान बदलांसंदर्भातल्या सेव्ह अर्थ परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. हवामान बदलांना तोंड देणं आणि आर्थिक विकासाला चालना देणं यादृष्टीने बांबूच्या क्षमतेची चाचपणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. यावेळी हरित नवोपक्रमात परिवर्तनकारी बदल घडवून आणणाऱ्या १५ अग्रदूतांना इंडिया सस्टेनेबिलिटी पुरस्कार २०२५ ने गौरवण्यात येणार आहे. 

****

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या विषयावर आज संयुक्त संसदीय समितीची बैठक होणार आहे. बैठकीच्या पहिल्या सत्रात, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्याशी संवाद साधला जाईल. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एसएन झा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भारताच्या २१ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष डॉ. न्यायमूर्ती बीएस चौहान, आणि राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी बातचीत होईल. 

****

शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, लागवडीचा खर्च कमी करणं तसंच उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीनं, कृत्रिम बुद्धीमत्ता, ड्रोन आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. त्यादृष्टीने ‘दिशा कृषी उन्नतीची- २०२९’ हा उपक्रम कृषी क्षेत्राला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. या पंचवार्षिक कार्यक्रमाचं उद्घाटन काल पुण्यात पवार यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. पुण्यात राबवण्यात येणारा ॲग्री हॅकॅथॉन उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यभरात राबवण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. 

****

देशभरातल्या विमानतळांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विशेष व्यक्तींसाठी दिल्या जाणाऱ्या अपुऱ्या सुविधांविषयी मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. विमानतळांवर व्हीलचेअरच्या कमतरतेमुळे या व्यक्तींना त्रास होऊ नये यासाठी नागरी विमान वाहातूक संचालनालय, विमानतल संचालक आणि विमान कंपन्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. यासंदर्भात दाखल दोन याचिकांवर काल सुनावणी झाली. 

****

कृत्रिम बुद्धिमत्ता - एआय चा उपयोग करुन जनसंपर्क क्षेत्रातली कामं अधिक चांगली आणि प्रभावीपणे करावीत,असं माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त काल मुंबईत पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया, च्या वतीने आयोजित "कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर : जनसंपर्काची भूमिका" या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.  जरी ‘ए आय’ ला मानवी भावना समजत नसल्या तरीही,  भावना विश्लेषण आणि प्रतिक्रिया संकलनात त्याची कार्यक्षमता खूप आहे, तंत्रज्ञान सतत बदलतंय, जो नवीन गोष्टी शिकत राहतो,  तोच टिकतो, असं मत सिंह यांनी व्यक्त केलं.

****

जलजीवन योजनेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्रीय अर्थमंत्रालयानेच भ्रष्टाचार झाल्याचं मान्य करून एका नळाचा खर्च ३० हजारावरून एक लाख ३७ हजारांवर कसा गेला याचं स्पष्टीकरण मागवलं असल्याचं, सपकाळ यांनी सांगितलं. या योजनेचा फायदा फक्त अधिकारी आणि कंत्रादारांनाच झाला असल्याची टीका त्यांनी केली. 

****

नागरी सेवा दिनानिमित्त काल दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना, पंतप्रधान नागरी सेवा सर्वोत्कृष्टता पुरस्कार २०२३ प्रदान करण्यात आला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासातील उल्लेखनीय योगदानासाठी शर्मा यांना हा पुरस्कार ‘जिल्ह्यांचा समग्र विकास’ श्रेणीत मिळाला.

****

मुंबई इथं झालेल्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता - प्रगती अभियान २०२३-२४ च्या राज्यस्तरीय समारंभात जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल नगरपरिषदेच्या ‘पुस्तकांचा बगीचा’ या उपक्रमास राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. तत्कालीन मुख्याधिकारी विकास नवले आणि सद्यस्थितीत कार्यरत मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. नागरिकांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला आहे. 

****

नांदेड शहरातल्या हिंगोली गेट भागात असलेल्या पांपटवार सुपर मार्केटला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत कोट्यावधी रुपयांचं साहित्य जळून खाक झालं असून, तब्बल सात तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन विभागाने ही आग आटोक्यात आणली. आग विझवण्यासाठी २२ अग्निशमन बंबाचा वापर करण्यात आला. भीषण आगीतून दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.  

****


No comments: