Thursday, 24 April 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 24.04.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 24 April 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ एप्रिल २०२ दुपारी १.०० वा.

****

देशात ग्रामपंचायतींच्या विकासासाठी तंत्रज्ञानाच्या वापरासह अनेक उपाययोजना करण्यात येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बिहारमधल्या मधुबनी इथं आज राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामपंचायतींना वेळेवर निधी मिळावा ही सरकारची प्राथमिकता असून, गेल्या दहा वर्षात दोन लाख कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दोन लाखांहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटशी जोडल्या गेल्या असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, जमिनींच्या डिजिटल नोंदी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना, गावांचा विकास, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आदींचा उल्लेख केला.

या कार्यक्रमात १३ हजार ४८० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी तसंच रेल्वे आणि वीज क्षेत्रातल्या काही प्रकल्पाचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यात, जयनगर ते पाटणा दरम्यान धावणाऱ्या नमो भारत रॅपिड रेल्वे आणि सहरसा ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसचा समावेश आहे.

****

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतल्या बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये इंडिया स्टील २०२५ या सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्टील प्रदर्शनाचं दूरस्थ माध्यमातून उद्घाटन होणार आहे. तीन दिवसांच्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेत जागतिक पोलाद मूल्य साखळीतील आघाडीचे देश एकत्र येऊन, भविष्यातील वाटचालीवर चर्चा करणार आहेत.

****

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना हल्ल्या संदर्भातील माहिती तसंच या हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानविरुद्ध जी पावलं उचलली आहेत त्याची माहिती देणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

जम्मू काश्मीरमधल्या ठिकठिकाणी राज्य पोलीस दल आणि सुरक्षादलांनी संयुक्त शोधमोहिमा तीव्र केल्या आहेत.

उधमपूर जिल्ह्यात आज सुरक्षा बलाचे सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका सैनिकाला वीरमरण आलं. डुडु वसंतगड क्षेत्रात सुरक्षा दल राबवत असलेल्या शोधमोहिमेदरम्यान ही चकमक झाली.

बारामुल्ला इथं झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. यावेळी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी उधळून लावला आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त केली. कुलगाम जिल्ह्यातल्या तंगमार्ग भागातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक  झाली.

****

जम्मू काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या पर्यटकांची पहिली तुकडी आज सकाळी विशेष विमानाने मुंबई विमानतळावर पोहोचली. आणखी शंभर पर्यटकांना घेऊन एअर इंडियाचं विमान आज मुंबईला येईल, तर इंडिगोचं विमान आज संध्याकाळपर्यंत ८३ पर्यटकांना मुंबईत परत आणेल. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार उचलत आहे.

या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांची पार्थिवं आज पहाटे पुणे विमानतळावर पोहोचली, जिथे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आरोग्यमंत्री दत्ता भरणे, आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. सकाळी वैकुंठधाम इथं त्यांच्या पार्थिवांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

दरम्यान, हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि बळी पडलेल्या नागरिकांच्या प्रति संवेदना व्यक्त करण्यासाठी डोंबिवली शहरात शांततापूर्ण बंद पाळला जात आहे. राज्यभरातल्या नागरिकांनी या हल्ल्यातल्या निष्पाप मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहिली.

या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी परभणी शहरातही आज विविध संघटनांच्यावतीने बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. हा बंद शांततेत पार पडावा, असं आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केलं आहे.

****

छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या कारेगुट्टा टेकड्यांवर नक्षलवाद्यांचे म्होरके असल्याची माहिती मिळाल्यावर तेलंगणा आणि महाराष्ट्र पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमधल्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत उद्या काढण्यात येणार आहे. २०२५ ते २०३० दरम्यान नांदेड जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी हे आरक्षण लागू असेल.

****

बीड जिल्ह्यातल्या परळी वैद्यनाथ तालुक्यात येत्या एक ते नऊ मे दरम्यान फिरत्या श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. महाबोधी बहुउद्देशिय संस्था आणि नालंदा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचं आवाहन आयोजिका तथा उपासिका सिमा कांबळे यांनी केलं आहे.

****

संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतल्या लाभार्थ्यांना थेट ला हस्तांतरण प्रक्रियेद्वारे अर्थसहाय्याचं वितरण केलं जाणार आहे. बीड जिल्ह्यातल्या ताडसोन्ना इथं आज, नाथापूर इथं २६ एप्रिलला, कुर्ला इथं २८ एप्रिलला, पेंडगाव इथं ३० एप्रिलला तर ५ मे रोजी कुक्कडगाव इथं डीबीटी कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे, लाभार्थ्यांनी या डीबीटी कॅम्पला उपस्थित राहण्याचं आवाहन, आमदार विजयसिंह पंडित यांनी केलं आहे.

****

No comments: