Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 24 April 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ एप्रिल २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानसोबतचा
सिंधू जलवाटप करार स्थगित करण्यासह अनेक महत्त्वाचे निर्णय
·
दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर देणार- संरक्षणमंत्र्यांचं
प्रतिपादन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनगरमध्ये घेतली राज्यातल्या
पर्यटकांची भेट
·
दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या सहा पर्यटकांच्या
कुटुंबांना राज्य शासनाकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर
·
तूरीची खरेदी किमान आधारभूत दरानं करण्यास केंद्र सरकारची
मान्यता
आणि
·
पोषण पंधरवडा उपक्रमात हिंगोली जिल्ह्याचा राज्यात दुसरा
क्रमांक
****
पहलगाम
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. भारताने पाकिस्तानसोबत
१९६० पासून असलेला सिंधू जलवाटप करार स्थगित केला असून, तत्काळ प्रभावाने
अटारी वाघा सीमा बंद केली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. परराष्ट्र
सचिव विक्रम मिस्त्री यांनी या बैठकीतनंतर ही माहिती दिली. सध्या देशात आलेल्या पाकिस्तानी
नागरीकांना येत्या एक मे पर्यंत परत जाण्यास सांगण्यात आलं असून, पाकिस्तानी नागरीकांना यापुढे व्हिसा न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानच्या
दिल्लीतल्या उच्चायुक्त कार्यालयातल्या संरक्षण, लष्कर,
नौदल आणि हवाई दलाच्या संपर्क अधिकाऱ्यांना एका आठवड्याच्या आत भारत
सोडण्याचा आदेश देण्यात आल्याचं मिस्त्री यांनी सांगितलं.
दरम्यान, दहशतवादी
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
****
पहलगाम
हल्ल्यातल्या गुन्हेगारांना लवकरच सडेतोड प्रत्यूत्तर दिलं जाईल, असं संरक्षण
मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं काल आयोजित हवाई दल मार्शल अर्जन
सिंह स्मृती व्याख्यानात बोलताना ते म्हणाले,
बाईट
– केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह
****
दरम्यान, या हल्ल्यात
मरण पावलेल्या महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी
पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. जम्मू काश्मीर राज्य प्रशासनानंही या हल्ल्यातल्या
मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर केली आहे. डोंबिवलीचे संजय
लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने, पुण्याचे
कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे तसंच नवी मुंबईचे दिलीप डिसले या पर्यटकांचा या हल्ल्यात
मृत्यू झाला. या सर्वांचे मृतदेह काल राज्यात आणण्यात आले. डोंबिवलीतल्या पर्यटकांवर
काल अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मृतांना श्रद्धांजली
अर्पण केली.
****
काश्मीरमध्ये
अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना राज्यात सुखरुप परत आणण्याला शासनाचं प्राधान्य असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी
म्हटलं आहे.
उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांनी काल श्रीनगर इथं विमानतळाच्या जवळच असलेल्या कॅम्पमध्ये जाऊन राज्यातल्या
पर्यटकांची भेट घेतली. यावेळी त्यांची विचारपूस करून त्यांना लवकरात लवकर मुंबईला जाण्यासाठी
लागेल ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन दिलं.
****
या दुर्घटनेत
जखमी झालेल्या चार पर्यटकांशी संपर्क झाला असून, ते सुखरूप असल्याचं
राज्य प्रशासनानं सांगितलं आहे. आतापर्यंत २७५ पर्यटकांशी संपर्क झाला असून,
स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने या पर्यटकांची निवासव्यवस्था आणि पुढील
प्रवासासाठी आवश्यक ते समन्वय केले जात असल्याचंही, राज्य आपत्ती
व्यवस्थापन कक्षाकडून सांगण्यात आलं.
दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये
आपले परिचित गेलेले असतील, तर संबंधित जिल्हा प्रशासनाला त्याची
माहिती देण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
छत्रपती
संभाजीनगर इथं ७३ ५० ३३ ५१ ०४ आणि ०२४० २ ३३ १० ७७ या क्रमांकावर, बीड इथं ९०
११ २० ९० ०८, परभणी इथं ९९ ७५ ०१ ३७ २८ आणि ७० २० ८२ ५६ ६८ या
क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
लष्कर ए
तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या द रेझिस्टन्स फ्रंट या गटानं या हल्ल्याची जबाबदारी
घेतली आहे. हल्ला झालेल्या परिसरात सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं असून, शोधमोहीम
राबवण्यासाठी सैन्याचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
****
वर्ष २०२४-२५
साठी राज्यात शेतकऱ्यांनी पिकवलेली सगळी तूर किमान आधारभूत दरानं खरेदी करायला केंद्र
सरकारनं मान्यता दिली आहे. महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश, छत्तीसगड,
गुजरात, हरयाणा, कर्नाटक,
मध्य प्रदेश, तेलंगण आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधली
एकूण १३ लाख २२ हजार टन तूर याअंतर्गत खरेदी केली जाणार आहे. आयातीवरचं अवलंबित्व कमी
करण्यासाठी देशांतर्गत डाळींचं उत्पादन वाढवण्यात योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन
देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं
प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
राज्यभरात
राबवण्यात आलेल्या पोषण पंधरवड्यामध्ये हिंगोली जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे.
हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने एक हजार १९७ अंगणवाड्यांमधून
तब्बल ७४ हजार उपक्रम राबवले. विशेष म्हणजे या उपक्रमात कर्करोग संशयित महिलांच्या
आरोग्य तपासणी बाबत जनजागृतीवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आला. जिल्ह्यातल्या अंगणवाडी
सेविका खामार जहा अजमत फारुखी यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं…
बाईट
– खामार जहा अजमत फारुखी
****
या पोषण
पंधरवड्यात नांदेड जिल्ह्याचा राज्यात अकरावा क्रमांक आला. जिल्ह्यात तीन हजार ७२३
अंगणवाड्यात एक लाख ५४ हजार २३७ उपक्रम राबवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी मेघना कावली यांनी याबाबत अधिक माहिती दिली:
बाईट
– मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली
****
मुख्यमंत्री
शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत राज्यातल्या सर्व शासकीय, निमशासकीय
कार्यालयांमध्ये १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राबवण्यात आली होती.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात धाराशिव जिल्हा परिषद प्रथम क्रमांकावर आली
आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाने यासंदर्भात धाराशिव जिल्हा परिषदेच्या विविध सेवांची
आणि कामकाजाची तपासणी केली होती.
****
छत्रपती
संभाजीनगर इथल्या अजिंठा अर्बन सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेतला
आर्थिक गैरव्यवहार आणि त्या प्रकरणी अध्यक्ष सुभाष झांबड यांच्या अटकेनंतर आता, बँकेकडे अपुरं
भांडवल आणि उत्पन्नाची शक्यता नसल्याने बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. महाराष्ट्र
सहकारी संस्था निबंधक यांना सदर बँक बरखास्त करून बँकेवर अवसायक नेमण्याचे आदेश देण्यात
आले आहेत.
****
परभणी जिल्ह्याच्या
जिंतूर तालुक्यात बोरी इथल्या उच्चशिक्षित रहिवासी विनया देशमुख यांनी शेणापासून आकर्षक
आणि पर्यावरण पूरक रंग तयार केला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या सहकार्याने त्यांनी
हा व्यवसाय सुरू केला. यासाठीचं प्रशिक्षण त्यांनी जयपूर इथं घेतलं आणि, पंतप्रधान
रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत भारतीय स्टेट बँकेकडून २३ लाख रुपये कर्ज घेऊन आपला प्रकल्प
उभारला. या अनोख्या रंगाला गुजरात, उत्तराखंड, उत्तरप्रदेश अशा राज्यातून चांगली मागणी असल्याचं, त्यांनी
आकाशवाणीला सांगितलं..
बाईट
– विनया देशमुख
****
धाराशिव
इथं वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासोबतच ५०० खाटांच्या नवीन जिल्हा रुग्णालयासाठी
सरकारने आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागासाठी मंजूर निधीमधून
२७६ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या जनतेला आता
जवळपास एक हजार खाटांची सोय होणार असल्याची माहिती, मित्र चे उपाध्यक्ष
आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
****
पहलगाम
इथल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी
खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह माजी नगरसेवक तसंच महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती
होती. लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथंही शिवसेनेच्या वतीनं, तसंच अहिल्यानगर
इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं.
****
संजय गांधी
निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतल्या लाभार्थ्यांना
थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेद्वारे अर्थसहाय्याचं वितरण केलं जाणार आहे. बीड जिल्ह्यातल्या
ताडसोन्ना इथं आज डीबीटी कॅम्पचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
हवामान
राज्यात
काल सर्वाधिक ४५ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमान चंद्रपूर इथं नोंदवलं गेलं. मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर इथं सुमारे ४१ पूर्णांक सहा अंश, धाराशिव ४२ पूर्णांक
पाच, तर परभणी इथं ४३ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
झाली.
****
No comments:
Post a Comment