Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 05 May 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ मे २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
पहिल्या वेव्ह्ज परिषदेचा समारोप-राज्य सरकारचे आठ हजार
कोटी रुपयांचे सामंजस्य करार
·
पर्यटन वाढीसाठी नागरी सुविधा विकसित करणं आवश्यक-‘महापर्यटन
उत्सवाच्या समारोप सत्रात मुख्यमंत्र्याचं प्रतिपादन
·
राज्य शिक्षण मंडळाच्या १२ वी परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन
जाहीर होणार
·
सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेला प्रारंभ-२८
क्रीडाप्रकारांत साडेआठ हजार खेळाडूंचा सहभाग
आणि
·
मराठवाड्यात पुढच्या तीन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता
****
पहिल्या
वर्ल्ड ऑडियो व्हिजुअल आणि एंटरटेनमेंट समिट - वेव्ह्ज २०२५ चा काल मुंबईत समारोप झाला.
वेव्ह्ज बाजार मध्ये एक हजार ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची उलाढाल झाली. वेव्ह्ज
एक्स च्या माध्यमातून ५० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. राज्य सरकारने या परिषदेत
सुमारे आठ हजार कोटी रुपयांचे करार केले. माहिती प्रसारण खात्याचे सचिव संजय जाजू यांनी
आकाशवाणीशी बोलताना या परिषदेबद्दल समाधान व्यक्त केलं. ते म्हणाले...
बाईट: माहिती प्रसारण सचिव संजय जाजू
परिषदेच्या
काल अखेरच्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या संख्येने वेव्ज परिषदेतल्या प्रदर्शनांना भेट
दिली. या परिषदेत झालेल्या विविध स्पर्धेतल्या अंतिम फेरीतल्या विजेत्यांचं सादरीकरणही
काल करण्यात आलं. वाह उस्ताद, सिंफनी ऑफ इंडिया, बॅटल ऑफ बॅण्ड्स आणि ईडीएम या सांगितिक स्पर्धेतल्या सादरीकरणाला प्रेक्षकांचा
मोठा प्रतिसाद मिळाला.
सोशल मीडिया
जाहिरातींसाठी सर्वोत्तम पद्धती या विषयावर एक सत्र काल पार पडलं, याशिवाय ओटिटी
प्लॅटफॉर्म, कंटेट पायरसी तसंच मनोरंजन स्टार्टअप मध्ये गुंतवणूक
या विषयावरही विविध चर्चासत्रं घेण्यात आली.
या परिषदेत
नेटफ्लिक्सचे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी टेड सारँडोस यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भारतातल्या वाढत्या डिजिटल बाजारपेठेसह, महाराष्ट्रातल्या
ग्रामीण संस्कृतीला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेण्यावर विशेष चर्चा झाली.
****
राज्यात
पर्यटन वाढीसाठी नागरी सुविधा आणि पर्यटन संस्कृती विकसित करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या महाबळेश्वर इथं ‘महापर्यटन
उत्सव-२०२५’ च्या समारोपप्रसंगी ते काल बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी
उपस्थित होते. पर्यटन संस्कृती विकसित करुन स्थानिकांचं सहकार्य पर्यटकांना सुखद अनुभव
येण्यासाठी महत्वाचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पर्यटन विभागाने वर्षाभारतील पर्यटनाचं
वेळापत्रक तयार करून त्यात राज्याच्या विविध भागात वर्षभरात आयोजित उत्सव सोहळ्यांचा
समावेश करावा, यासोबतच देशातल्या टूर ऑपरेटर्स सोबत कार्यशाळा घेऊन त्यांना इथल्या
पर्यटन सुविधांची माहिती द्यावी, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग
करून एकाच पोर्टलवर सर्व पर्यटन सुविधांची माहिती द्यावी, आदी
सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
****
रुग्णालयांचं
व्यवस्थापन आणि नियमन करणाऱ्या शासकीय यंत्रणांनी योग्य नियंत्रण ठेवलं तर, रुग्णालयांच्या
मनमानीला चाप बसू शकेल, असं सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण
मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलं आहे. ते काल कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत
होते. यादृष्टीनं सरकार एक मोबाईल ॲप विकसित करत असून, त्यामुळे
रुग्ण किंवा नातेवाईकांकडून आलेली तक्रार थेट आरोग्य विभागाला मिळेल, असं ते म्हणाले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात तसंच रुग्णालयांबद्दल
गेल्या पाच वर्षात एक हजारांहून अधिक तक्रारी आल्या असून, त्यावर
काम सुरु असल्याचं आबिटकर यांनी सांगितलं.
****
भारत निवडणूक
आयोग लवकरच विविध कामांकरता उपयोगी पडेल असं ईसीआय नेट हे मोबाईल ॲप सुरु करणार आहे.
आयोगाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या विविध ४० मोबाईल आणि वेबसाईट ॲप्सचा समावेश या
एकाच अॅपमध्ये असेल. या ॲपचा उपयोग मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष आणि समाजातले इतर विविध संबंधित घटक करू शकतात. या नवीन ॲपवर मिळणारी
माहिती ही आयोगाकडून दिली जाणारी अधिकृत माहिती असल्यानं त्याची विश्वासार्हताही अधिक
असेल, असं याबाबातच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारतीय
कृषी संशोधन परिषदेनं विकसित केलेल्या भारतातल्या पहिल्या जीनोम एडिटेड तांदुळाच्या
दोन वाणाचं अनावरण काल नवी दिल्लीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या
हस्ते झालं. भारतासाठी हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचं सांगत तांदुळाच्या या दोन्ही जाती
उत्पादन खर्च कमी करतील आणि देशात तांदुळाचं उत्पादन वाढवतील, असा विश्वास
कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला. ही वाणं विकसित
करण्यात सहभागी कृषी शास्त्रज्ञांचं त्यांनी अभिनंदन केलं.
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता
१२ वी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर
होईल. उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती, राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.
****
वैद्यकीय
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा काल देशभरात पार पडली. राज्यात ३५ शहरांमध्ये
दोन लाख ७९ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. छत्रपती संभाजीनगर इथं १९ हजार ५००, तर नांदेड
जिल्ह्यात २० हजार विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. लातूर जिल्ह्यात ५१ परीक्षा
उपकेंद्रांवर नीट परीक्षा घेण्यात आली.
****
सातव्या
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य
प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन झालं. बिहारमध्ये पाटणा इथं झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित
होते. बिहारमधल्या पाटणा, राजगिर, गया, भागलपूर
आणि बेगुसराय या ठिकाणी ही स्पर्धा खेळवण्यात येत असून, विविध
२८ क्रीडाप्रकारांमध्ये देशातले सुमारे साडेआठ हजार खेळाडू सहभागी होतील. यातल्या नेमबाजी,
जिम्नॅस्टिक्स आणि ट्रॅक सायकलिंगच्या स्पर्धा नवी दिल्लीत होणार आहेत.
****
महिला क्रिकेटमधे, तिरंगी एकदिवसीय
मालिकेत काल कोलंबो इथं झालेल्या सामन्यात श्रीलंकेनं भारतावर तीन गडी राखून विजय मिळवला.
भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघादरम्यान सुरु असलेल्या
या तिरंगी मालिकेत भारत आणि श्रीलंकेचा महिला संघ चार गुणांसह अनुक्रमे पहिल्या आणि
दुसऱ्या स्थानावर आहेत.
****
हवामान
मराठवाड्यात
पुढच्या तीन दिवसांत काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. छत्रपती
संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये आज, जालना जिल्ह्यात उद्या, तर सात मे रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह
गारपीट होण्याची शक्यता आहे. या काळात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचं आवाहन वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ कैलास डाखोरे यांनी केलं आहे.
बाईट: हवामान तज्ज्ञ कैलास डाखोरे
दरम्यान, राज्यात काल
सर्वाधिक ४४ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान अकोला इथं नोंदवलं गेलं. धाराशिव इथं
४२, परभणी इथं ४२ पूर्णांक चार, तर छत्रपती
संभाजीनगर इथं ४० पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
प्रशासकीय
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासासाठी, "टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग
वीक" या सप्ताहाचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात उद्घाटन
होणार आहे. राज्य शासनाने आयोजित केलेल्या या पहिल्या डिजिटल वारी मध्ये आधुनिक तंत्रज्ञान
आणि नवीन कल्पनांचा संगम असून, ही वारी मंत्रालयातून सुरू होऊन
राज्यभरात तंत्रज्ञानाचा प्रसार करणार आहे.
**
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर
इथं जनसहयोग संस्थेनं विकसित केलेल्या ‘संपूर्ण वन’ उपक्रमाची काल उपमुख्यमंत्री पवार
यांनी भेट देऊन पाहणी केली. जनसहयोग संस्थेच्या वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्याचं पवार
यांनी कौतु केलं. याठिकाणी साकारलेल्या भारत उद्यान, नक्षत्र
उद्यान आणि बांबू उद्यानांचीही पवार यांनी पाहणी केली. ‘संपूर्ण वन’ या प्रक्षेत्रावर
विविध चारशे प्रजातींची २२ झाडं लावण्यात आली आहेत.
****
सामाजिक
सलोखा आणि सद्भाव वाढीस लागावा यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या
नेतृत्वाखाली काल परभणी जिल्ह्यात नृसिंह पोखर्णी ते परभणी पर्यंत सद्भावना पदयात्रा
काढण्यात आली. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात भूमिका
मांडली.
दरम्यान, परभणी शहरात
आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान
बचाव यात्रा आणि संविधान संमेलन होणार आहे.
****
भारतीय
कुटुंब व्यवस्थेची शाश्वत मूल्य आजही कायम असल्याचं मत निवृत्त प्राध्यापक डॉ. स्मिता
अवचार यांनी व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं साहित्य भारतीच्या कुटुंब व्यवस्थेवर
आधारित कथा लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. अशा स्पर्धेत
नव्या पिढीचा सहभाग अपेक्षित असेल तर स्पर्धेचं माध्यम बदलावं लागेल, असंही डॉ.
अवचार यांनी नमूद केलं. साहित्य भारतीचे प्रदेश संघटनमंत्री नितीन केळकर यांच्यासह
मान्यवरांच्या हस्ते कथा स्पर्धेतल्या विजेत्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment