Monday, 5 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 05.05.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date 05 May 2025

Time 11.00 to 11.05 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ०५ मे २०२ सकाळी .०० वाजता.

****

अमेरिकेत वॉशिंग्टन इथं आजपासून आठ मे पर्यंत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक बँक भूमी संमेलनामध्ये भारत भूमी सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व करणार आहे. पंचायत राज मंत्रालायचे सचिव विवेक भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालील भारताचं प्रतिनिधी मंडळ यात भाग घेणार असून, भूमी स्वामित्व योजनेचं सादरीकरण करणार आहे. ‘हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर भूमीचं रक्षण आणि स्वामित्व हक्क याबाबत जागृतीकडून कृतीकडे’ ही यावर्षीच्या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. भारतात जमिनीचा मालकी हक्क सुरक्षित करण्यासाठी स्वामित्व ही योजना राबवण्यात आली. यामध्ये ड्रोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागातील मालकी हक्काच्या शेतजमीन आणि इतर जमिनीची मोजणी करण्यात आली.

****

जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने काल पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. भारतीय सैनिकांनी या हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं. कुपवाडा, बारामुला, पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अख्नूर परिसरात हा गोळीबार करण्यात आला.

****

देशातल्या जनतेच्या सर्व अपेक्षा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होतील असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दिल्लीत संस्कृती जागरण महोत्सवाला संबोधित करताना ते काल बोलत होते. संपूर्ण जग भारताला ओळखत असून, आता जागतिक व्यासपीठावर भारताचं म्हणणं ऐकलं जातं, असं सिंह यांनी नमूद केलं.

****

भारतातलं सर्व प्राचीन ज्ञान संस्कृत भाषेत असल्यानं लोकांनी संस्कृत भाषा शिकायची आणि तिचा सराव करायची गरज असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. संस्कृत भारती आयोजित संस्कृत संभाषण शिबिरांच्या समारोप कार्यक्रमाला ते काल संबोधित करत होते. २३ एप्रिल ते तीन मे या कालावघीत संस्कृत भारतीनं नवी दिल्लीत संस्कृतची संभाषणांची १००८ शिबिरं आयोजित केली होती. या शिबिरांमध्ये २५ हजार जणांनी भाग घेतला होता.

****

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वी परीक्षेचा निकाल आज जाहिर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होईल. उद्यापासून महाविद्यालयात गुणपत्रिका मिळणार असल्याची माहिती, राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.

****

मुंबईहून रत्नागिरीला जाणाऱ्या एका खासगी बसला काल रात्री दहाच्या सुमारास कर्नाळा अभयारण्याजवळ झालेल्या अपघातात एक जण ठार तर साधारण ३२ जण जखमी झाले. जखमींना एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नवी मुंबई नियंत्रण कक्षानं दिली.

****

अहिल्यानगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातल्या राजूर इथं काविळीची साथ सुरू असून, यामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला, तर कावीळच्या रूग्णांची संख्या २६३ झाली आहे. या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली आणि डॉक्टरांकडून उपचारांची माहिती जाणून घेतली. राजूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रामस्थ आणि रूग्णासाठी उभारलेल्या विशेष उपचार कक्षालाही त्यांनी भेट दिली. राजूरच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेवून जिल्ह्यातल्या सर्वच पाण्याचे स्त्रोत तपासण्याचे निर्देश विखे पाटील यांनी यांनी यावेळी दिले.

****

महाराष्ट्र राज्य दहशतवादविरोधी पथकानं रायगडमध्ये प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप नावाच्या एका नक्षलवाद्याला अटक केली आहे. शहरी नक्षलवादी प्रकरणाशी तो संबंधित असून २०११ पासून त्याचा शोध सुरू असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी वाटपासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमदार आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत येत्या १६ मे रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. पक्षाच्या वतीने १३ एप्रिलपासून पाणी वाटपासंदर्भात आंदोलन सुरु आहे.

****

बिहारमध्ये सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत काल पहिल्या दिवशी तिरंदाजीत महाराष्ट्राच्या खेळाडुंनी प्रथम स्थान प्राप्त केलं. मुलींच्या गटात कंपाउंड पात्रता प्रकारात तेजल साळवेनं ६९७ गुणांसह पहिला क्रमांक पटकावला.

****

दुबई इथं झालेल्या ११व्या बुडोकन आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारताच्या अनर्घ्य अभिषेक पंचवतकर नं सुवर्णपदक जिंकल आहे. अनर्घ्यनं कुमिते प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत अव्वल स्थान मिळवलं. तसंच त्याने काटामध्ये ही कांस्यपदक मिळवलं. या स्पर्धेत १७ देशांच्या ९०० हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला होता.

****

भारत-ऑस्ट्रेलिया महिला हॉकी संघादरम्यान काल पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर एक-शून्य असा विजय मिळवला. उपकर्णधार नवनीत कौरने २१ व्या मिनिटाला एकमेव गोल करत संघाचा विजय साकारला. याआधीच्या सर्व चारही सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं  होतं.

****

छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यामध्ये आज, जालना जिल्ह्यात उद्या, तर सात मे रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. या काळात शेतकर्यांनी पिकांची काळजी घेण्याचं आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी आणि हवामान तज्ज्ञ कैलास डाखोरे यांनी केलं आहे.

****

No comments: